Breaking News

भारताचा न्यूझीलंडवर विजय, मालिका ४-१ ने खिशात

भारताचा न्यूझीलंडवर विजय, मालिका ४-१ ने खिशात

वेलिंग्टन (भास्कर गाणेकर) : विराट कोहलीच्या अनुपस्थित रोहित शर्माच्या भारतीय संघाने येथील पाचव्या व अंतिम सामन्यात यजमान न्यूझीलंड संघाला ३५ धावांनी पराभूत करीत पाच सामन्यांची मालिका ४-१ अशी जिंकत विश्व चषकाची जय्यत तयारी केली. ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात देशात पहिल्यांदाच पराभूत केल्यानंतर भारतीय संघाने न्यूझीलंडलाही तब्बल १० वर्षांनी त्यांच्याच देशात पराभूत करण्याचा अनोखा पराक्रम केला.

चौथ्या सामन्यात नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने भारताला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले होते आणि भारत केवळ ९२ धावांत गारद झाला होता. या सामन्यात रोहितने नाणेफेक जिंकत पुन्हा एकदा फलंदाजी स्वीकारली आणि १८ धावांत आघाडीचे चार फलंदाज तंबुत परतले. पुन्हा एकदा भारत शंभरी गाठेल की नाही असे वाटत असताना अंबाती रायडू व विजय शंकर यांनी चिवट फलंदाजी करताना पाचव्या गड्यासाठी ९८ धावांची भागीदारी रचित भारताला पुन्हा एकदा सामन्यात आणले. मॅट हेन्री व ट्रेंट बोल्ट यांचं घटक गोलंदाजीसमोर पुन्हा एकदा भारतीय फलंदाज नतमस्तक झाले. शंकर (४५) व रायडू (९०) बाद झाल्यांनतर केदार जाधव (३४) व हार्दिक पंड्याची विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर भारताने समाधानकारक २५२ धावांचा पल्ला गाठला. हेन्रीने ४ तर बोल्टने ३ गडी बाद करण्यात यश मिळवले.

धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या न्यूझीलंड संघाला भारतीय गोलंदाजांनी स्थिरावून दिले नाही. येथील मैदानावर २५० धावांचा पल्ला गाठणे काहीसे कठीण असते हे भारतीय गोलंदाजांनी जाणल्यानंतर टिच्चून गोलंदाजी करीत मोठी भागीदारी रचण्यासाठी झुंजणाऱ्या किवी फलंदाजांना चांगलेच रडवले.

हेन्री निकोलस (८), रॉस टेलर (१) हे स्वस्तात परतल्यानंतर भारत गोलंदाजांनी उरलेल्या किवी फलंदाजांना जास्त काळ तग धरू दिला नाही. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन काहीसा सेट झालेला दिसला असताना पार्ट टायमर केदार जाधवने त्याचा अडथळा दूर करीत भारताला मजबूत स्थितीत आणले. भारतासाठी मागील काही वर्षांत जसप्रीत बुमरानंतर यशस्वी वेगवान गोलंदाज ठरलेल्या मोहम्मद शमीने आजही आपली सुरेख गोलंदाजी पेश केली. ३५ धावांत दोन गडी टिपल्यानंतर उरलेली कमी हार्दिक पंड्या (२ बळी) व युझवेन्द्र चहल (३ बळी) यांनी पूर्ण केली. भारताने सामना ३५ धावांनी जिंकला. रायडूला सामनावीर तर शामिल मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!