India's historic victory over New Zealand in the T20 series, defeated New Zealand 5-0 | Aaplaa Vyaaspith news

Saturday, February 22, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

भारताचा न्यूझीलंडमध्ये T20 मालिकेत ऐतिहासिक विजय, न्यूझीलंडला ५-० ने लोळवले

भारताचा न्यूझीलंडमध्ये T20 मालिकेत ऐतिहासिक विजय, न्यूझीलंडला ५-० ने लोळवले

भारतीय संघाने टी-२० मालिकेत न्यूझीलंडला व्हाइट वॉश दिला. रविवारी माउंट माउंगनुई येथील बे ओव्हल मैदानावर झालेल्या सामन्यात भारताने सात धावांनी विजय मिळवला. या विजयासह विराट कोहली आणि कंपनीची २०२० मधील विजयाची मालिका कायम राहिली.

आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पहिल्यांदा एखाद्या संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत ५-० असा विजय मिळवला. या मालिकेआधी दोन्ही संघांमध्ये ११ सामने झाले होते. त्यापैकी ८ न्यूझीलंडने जिंकले होते. आता या मालिकेनंतर दोन्ही संघांचे प्रत्येकी ८ विजय झाले आहेत.

भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडला एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाही. मालिकेतील दोन सामने तर सुपर ओव्हरमध्ये गेले. पण तरीही न्यूझीलंडला विजय मिळवता आला नाही. दोन्ही वेळा भारताने बाजी मारली. भारतीय संघाने दोनपेक्षा अधिक सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेत व्हाइट वॉश देण्याची ही तिसरी वेळ आहे.

पाचव्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघात विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. केएल राहुल आणि संजू सॅमसन यांनी भारतीय डावाची सुरूवात केली. पण संजू सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. तो दोन धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित आणि राहुल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागिदारी केली. राहुल अर्धशतक करेल असे वाटत होते. पण तो ४५ धावा करून बाद झाला. राहुल बाद झाल्यानंतर रोहित शर्माने अर्धशतक पूर्ण केले. पण त्यानंतर पायाला दुखापत झाल्याने रोहितला मैदानाबाहेर जावे लागले. त्याने ४१ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ६० धावा केल्या. रोहितच्या जागी आलेल्या शिवम दुबेला पुन्हा एकदा अपयश आले. तो ५ धावा करून माघारी परतला. अखेरच्या षटकात श्रेयस अय्यर आणि मनीष पांडे यांनी आक्रमक खेळ केला आणि संघाला १६३ धावांपर्यंत पोहोचवले.

भारताने दिलेले १६४ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडची आघाडीची फळी अवघ्या १७ धावात माघारी परतली. पण त्यानंतर रॉस टेलर आणि टिम सेइफर्ट यांनी शानदार खेळी केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली. विशेष म्हणजे रॉस आणि टिम यांनी दहाव्या षटकात ३४ धावा काढल्या. ही जोडी न्यूझीलंडला विजय मिळवून देईल असे वाटत असताना नवदीप सैनीने टिम सेइफर्टला बाद करत भारताला ब्रेक मिळवून दिला. त्यानंतर शार्दुल ठाकूरने एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट घेत न्यूझीलंडची अवस्था ७ बाद १३२ अशी केली. तर सैनीने न्यूझीलंडचा अखेरचा भरवश्याचा फलंदाज रॉस टेलरची विकेट घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. न्यूझीलंडला २० षटकात ९ बाद १५६ धावांपर्यंत मजल मारता आली.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts