cricket-world-cup-2019-rohits-hundred-power-win-for-india | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

रो-हिट च्या नाबाद शतकाने भारताने केला विश्वचषकाचा श्रीगणेशा

रो-हिट च्या नाबाद शतकाने भारताने केला विश्वचषकाचा श्रीगणेशा

सौथम्पटन (भास्कर गाणेकर) : विश्वचषक चालू होऊन तब्बल एका हप्त्याने आपला पहिला सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा सहा गडी व १५ चेंडू राखत विजय मिळवीत स्पर्धेचा श्रीगणेशा केला. भारतीय गोलंदाजांनी केलेली भरभक्कम कामगिरी व रोहित शर्माने केलेले नाबाद शतक या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. तर दुसरीकडे विश्वचषकासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक मानल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा हा तीन सामन्यांत तिसरा पराभव ठरला.

विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात इंग्लंडकडून मिळालेला दारुण पराभव, त्यात बांग्लादेशकडून स्वीकारावा लागलेला मानहानीकारक पराभव. आणखी भर ती काय लुंगी एनगीडी ची दुखापत व प्रमुख अस्त्र असलेला डेल स्टेन याची खांद्याच्या दुखापतीमुळे झालेली माघार. पूर्णपणे दबल्या गेलेल्या दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. आपल्या संपूर्ण ताकतीनिशी उतरलेलया भारतीय संघाने आपणही जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहोत अशी कामगिरी केली. जसप्रीत बुमराने दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात माघारी धाडल्यानंतर स्पिनर्सनी आपली कामगिरी फत्ते केली. युझवेन्द्र चहलने चार खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला तर कुलदीप यादवने किफायती गोलंदाजी करीत आफ्रिकेचे कंबरडे मोडले. मॉरिस (४२), डुप्लेसिस (३८), फेलूकवायो (३४), रबाडा (३१), मिलर (३१) अश्या नाममात्र खेळींच्या जोरावर आफ्रिकेने कश्याबश्या २२७ धावा धावफलकावर लगवल्या. भुवनेश्वरने शेवटच्या षटकात दोन गडी टिपत चांगली मदत केली.

भारतासाठी सोपं वाटणार लक्ष्य दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांसमोर काहीसं कठीणच वाटत होतं. संथ गतीने सुरुवात केलेल्या भारतीय डावाला सहाव्या षटकात पहिला धक्का बसला. रबाडाने शिखर धवन (८)ला बाद करीत आफ्रिकेसाठी उत्तम सुरुवात केली. नंतर आलेला कोहली व रोहित यांची जोडी जमली असे वाटत असताना फेलूकवायोच्या गोलंजीवर यष्टीरक्षक डी-कॉक यांने अफलातून झेल टिपत भारताला दुसरा धक्का दिला. कोहली केवळ १८ धावा करू शकला. चौथ्या क्रमांकावर संधी मिळालेल्या के. एल. राहुलने रोहितसोबत ८५ धावांची भागीदारी रचली. राहुलने २६ धावांचं योगदान दिलं. त्यानंतर आलेल्या धोनीने रोहितसोबत ७४ धावांची भागीदारी रचित विजयावर शिक्कामोर्तब केला. रोहितने शेवटपर्यंत खेळ करीत एकदिवसीय क्रिकेटमधले आपले २३वे शतक लगावले. रोहितने १४४ चेंडूंचा सामना करीत १३ चौकार व दोन षटकार खेचीत नाबाद १२२ धावा केल्या.

भारताचा पुढील सामना ९ जूनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होईल.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण आफ्रिका: २२७/९ (५०) – मॉरिस ४२(३४), डुप्लेसिस ३८(५४), चहल ४-५१ (१०), बुमरा २-३५ (१०)

भारत: २३०/४ (४७.५) – रोहित १२२*(१४४), धोनी ३४(४६), रबाडा २-३९ (१०), मॉरिस १-३६ (१०)

भारत सहा गडी व १५ चेंडू राखत विजयी

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts