तू सोबत चल..

काल कुठेतरी कानी आलं..
यशोधरा नसती..
तर ‘सिध्दार्थ’
‘बुद्धत्वास’ का पोहचले असते?

उगाच तरळून गेले
डोळ्यासमोरून ..
यशोधरेने महत्प्रयासाने..
आजन्म रोखून
धरलेले अश्रू..
कधीच व्यक्त
न होण्यासाठीचे..
दिलेले अबोल वचन..

न सांगता निघून गेलेल्या
पतीच्या वाटेकडे
डोळे लावून बसणारी
ती.. पतिव्रता…
अगाध विश्वास घेऊन
घुसमटणारी…
‘येतील ते पुन्हा माझ्यापर्यंत’…
स्वतःला रोज नव्याने समजवणारी..

सासू-सासऱ्यांच्या सेवेत रमून
त्यांच्या ‘मुलाचे’ कर्तव्य पार पाडणारी..
स्वतःचा त्याग.. ओठांवर न आणणारी..
अबोलतेचा शाप होता तिला..
जन्मतः

‘बुद्धत्व’ प्राप्त करणाऱ्या
पतीबद्दल..
सदैव आदर बाळगणारी
यशोधरा…
धीरोदत्तपणे स्वतःचा पुत्र
‘भिक्षां देही’..म्हणणाऱ्या..
‘गौतम बुद्धास’ ..
समर्पित करणारी…
यशोधरा…

चेहऱ्यावर आजन्म
निर्विकार..भाव
घेऊन वावरणारी..
यशोधरा..
विवाहिता असून
संन्यस्त जीवन…
जगणारी…
मुखातून …
‘ब्र’ देखील न काढणारी…
यशोधरा…

तेही फक्त..
सिध्दार्थवर असलेल्या…
नितांत प्रेमापोटी…

तिचे डोळे …
पाठलाग करत असतात…
सतत…
तिला…अभिमान आहे..
सिद्धार्थच्या ‘बुद्धत्वाचा’..
अव्हेर नाही.. नकळत मिळालेल्या..
संन्यस्त जीवनाचा…

आस आहे एकच…
तिच्याकडे पाठ करून
निघून गेलेल्या…
‘सिद्धार्थाने’…
परतून आल्यावरतरी…
म्हणावं…
हो, तुही व्यक्त..
राहू नको ‘निश्चल’…
घे तू स्वतःचा शोध…
अन, ‘माझ्यासोबत चल’…

विचार माझाही नव्हता…
तुझ्याकडून त्याग मागण्याचा…
तुला न सांगता जाण्याचा..
त्या अजाणतेपणी झालेल्या
चुकांसाठी माफ कर..
मला एकदा क्षमा कर..

©® स्नेहा कोळगे.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!