कळतील ना बाबासाहेब

कळतील ना बाबासाहेब

बाबासाहेबांचा.. चष्मा..
हातात घेऊन साफ करताना
रमाई स्वतःशी म्हणाली…
“साहेबांची भविष्यवेधी नजर..
कळलं ना सगळ्यांना..
की नुसतेच रमतील..
स्वतःत..
की मिरवतील फक्त
साहेबांसारखा चष्मा लावून
आरशात बघत”..

आता तिनं ..
बाबासाहेबांनी लिहिलेलं
पुस्तक घेतलं हाती..
पुन्हा विचारात पडली..
“मला नाही कळत यातलं सगळं..
पण यातला सगळा आक्रोश..
यातली पीडा ..
सगळं सगळं कळतं मला..
घेईल न समजून येणारी पिढी..
हा आक्रोश..हे रुदन..
की ..नुसतंच संग्रही ठेवतील”..

पुस्तकाच्या बाजूला ठेवलेली
बाबांची लेखणी..
हातात घेऊन ..
एकटक पाहत होती ..
माऊली रमाई…
नकळत म्हणाली..
“खूप साथ दिली ग तू..
तासनतास अभ्यास केला
साहेबांनी .. तुझ्या विश्वासावर..
तू घेतलंस समजून साहेबांना..

तसंच खरेपणांन घेईल न समजून
हा भारत देश..जातीबद्ध तर नाही ना करणार..
होईल न जागा ..माझा झोपलेला भारत”..

काळजीत पडलेली रमाई
पाहून.. म्हणाले.. बाबासाहेब…
“नको करू विचार रामू..
जगावं कसं.. सांगितलं मी..
आता त्यांना ठरवू दे पुढचं..
लाख चुकतील… पण
एखादा आपला मुलगा
किंवा मुलगी…
बसलेला असेल..
अठरा तास त्या पुस्तकाच्या संग्रहालयात..
‘बाबासाहेब’ समजून घेण्यासाठी..
‘बाबासाहेब’ समजून घेण्यासाठी..

©® स्नेहा कोळगे

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!