Breaking News

आठवणींची गोधडी

आठवणींची गोधडी

आजी बसायची उन्हात
छोट्या स्टूलावर ओटीवर
लांबलचक केस वाळवत
हातात नेहमी असायचा चांदोबा
नाहीतर कापसाच्या वाती वळत
आम्ही सुध्दा तिच्या कापसासारख्या केसाच्या
कधी दोन वेण्या घाल
तर कधी तिचा गोरा गोरा हात
हाती घेऊन दुसऱ्या हाताने
लुसलुशीत मासाचा लोण्यासारखा गोळा
धरुन मजा करत असू.
आम्ही तिला फुलाच्या पुडीतील दुर्वा,बेल
निवडून दिल्या की पुजा झाली की
हातावर खडीसाखर तर
कधी वेलची दाणा मिळायचा
संध्याकाळी देवासमोर
शुभंकरोती ,परवचा म्हटलं की
काही ना काही हातावर टेकवायची
गुरुवारी मात्र दत्ताची ,
साईबाबांची आरती
मग हातावर पिवढा धम्मक
पेढा मिळायचा
त्यामुळे गुरुवारी सर्वाना
आरतीला चेव यायचा.
एकदा मोठ्या बहिणीने
गंमतच केली,
दत्तदिगंबर आरती बोलताना
हळू हळू सरते मीपण माझे ‘
ही ओळ येताच
ती हळू हळू सरकत पुढे गेली.
त्यावेळी वडीलांनी तिच्या पायावर
वेताच्या छडीचे दोन फटके दिले.
बापरे…तेव्हापासून
ती ओळ आली की आजतागायत तो
भितीमिश्रित प्रसंग डोळ्यासमोर येतो.
आणि हसू ओठाबाहेर येण्याचा
अवखळपणा करतं.
तेव्हा घरात टिव्ही नव्हते.
रेडीओपण कुणाकडे असेल तर बाहेर
त्यांच्या पेटीवर बसून ऐकत होतो
बुधवारची बिनाका गीतमाला
रात्री आजी रामायण , महाभारताच्या ,
पौराणिक कथा सांगायची.
ते ऐकता ऐकता कधी झोपेच्या आधीन
व्हायचं ते कळायचंच् नाही.

@ सुनिला मोहनदास.
ठाणे.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!