West Maharashtra Festival 2020 organized in Navi Mumbai ... !! | Aaplaa Vyaaspith news

Saturday, February 22, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

नवी मुंबईत पश्चिम महाराष्ट्र महोत्सव २०२० चे आयोजन…!!

नवी मुंबईत पश्चिम महाराष्ट्र महोत्सव २०२० चे आयोजन…!!

नवी मुंबई (प्रतिनिधी) : उद्या १४ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२० दरम्यान नवी मुंबईतील सानपाडा येथे झाशीची रानी मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व जनविकास प्रबोधिनी यांच्या सयुंक्त विद्यमाने पश्चिम महाराष्ट्र महोत्सव २०२० चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. महाराष्ट्रात नवी मुंबई मध्येच फक्त असा पश्चिम महाराष्ट्र महोत्सव घेण्यात येतो. या महोत्सवात पुणे,सातारा,सांगली,कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांतील वस्त्र,खाद्य,नृत्य,संगीत,कला व संस्कृतीचा प्रचार-प्रसार व्हावा, त्याचबरोबर नवी मुंबईकरांना पश्चिम महाराष्ट्राची ओळख व्हावी यासाठी केलेला हा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे आयोजक गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

        या महोत्सवात प्रामुख्याने काही गोष्टी आकर्षणाचे केंद्रबिंदू असतील जसे कुस्त्यांचे जंगी सामने, शाहीरी लोकरंग, कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा, सोलापूर चादरी, कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी मिसळ, सातारचे कंदी पेढे, पुणेरी मिसळ, झुणका भाकर आणि इतर खास आकर्षणे. दहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने नारदीय भजन-कीर्तन, ओव्या, भारुड, पोवाडे, शिवव्याख्यान, लावणी, खेळ पैठणीचा, लोकनृत्य, हळदी कुंकू समारंभ यांचा समावेश असेल.

   सदर महोत्सवाचे उद्घाटन मनसे नेते संदीप देशपांडे, एबीपी माझा वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर, बिव्हीजी ग्रुपचे संस्थापक हणमंतरव गायकवाड, मुळशी पॅटर्न फेम अभिनेते रमेश परदेशी, सुलेखनकार अच्युत पालव यांच्या हस्ते होणार असून दररोज या महोत्सवाला विविध क्षेत्रातील मान्यवर, सिनेकलाकार भेटी देणार आहेत. महोत्सवाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील नैपुण्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या लोकांना “पश्चिम महाराष्ट्र भूषण पुरस्कार” त्याचबरोबर राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधत नवी मुंबईतील कर्तुत्वान महिलांचा “राजमाता जिजाऊ पुरस्काराने” सन्मान करण्यात येणार आहे.

        नवी मुंबईकरांनी सहकुटुंब व सहपरिवार या महोत्सवास येत्या दहा दिवसात भेट देऊन पश्चिम महाराष्ट्रातील जत्रेचा अनुभव घ्यावा असे आवाहन स्वागत समिती सदस्य विलास घोणे, सुरेश मढवी, दिनेश पाटील, योगेश शेटे, देवेन्द्र पिल्ले, संजय पाटील, शोभा मढवी, सुनंदा दळवी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts