शेतक-यांवर विषप्रयोग करणा-या युनायटेड फॉस्फरस लि. कंपनीशी भाजपची भागीदारी

शेतक-यांवर विषप्रयोग करणा-या युनायटेड फॉस्फरस लि. कंपनीशी भाजपची भागीदारी

देवनार डंपींग ग्रांऊंडच्या भ्रष्टाचाराचा पैसा भाजपच्या प्रचारासाठी काँग्रेसची सीबीआय चौकशीची मागणी

मुंबई (प्रतिनिधी ) : बोगस कीटकनाशके तयार करून विदर्भात ४० शेतक-यांच्या मृत्यूस आणि शेकडो शेतक-यांच्या विषबाधेस कारणीभूत असलेल्या युनायटेड फॉस्फरस लिमीटेड कंपनीशी भाजपची भागीदारी असल्यानेच या कंपनीच्या कार्यालयात भाजपचे प्रचार साहित्य निर्मिती सुरु होती. तसेच देवनार डंपींग ग्राऊंड मधील भ्रष्टाचाराचा पैसा भाजपच्या प्रचारासाठी वापरला जात आहे. असा आरोप करून या संपूर्ण प्रकाराची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

गांधी भवन येथे पत्रकारपरिषदेला संबोधित करताना सावंत यांनी भाजप आणि युनायटेड फॉस्फरस लिमीटेड यांच्या संबंधाचे पुरावे जाहीर करून भाजपचा पर्दाफाश केला. भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे बंधू प्रदीप गोयल हे युनायटेड फॉस्फरस लिमीटेड कंपनीचे स्वतंत्र संचालक आहेत. तसेच या कंपनीला मुंबई महानगरपालिकेने या कंपनीला देवनार कचरा डेपोच्या व्यवस्थापनाचे साडेचार हजार कोटींचे कंत्राट दिले आहे. या कामात भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हे भागीदार आहेत. भाजप नेत्याचे या कंपनीशी वैयक्तीक जवळीकीबरोबरच व्यावसायिक संबंध आहेत हे यातून स्पष्ट झाले आहे. मुंबई महानगरपालिकेने या कामात भ्रष्टाचार झाल्यामुळे या कंपनीची देयके थांबवली होती. शिवसेना खा. राहुल शेवाळे यांच्या आरोपानुसार ही देयके देण्यासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी महापालिका आयुक्तांकडे मध्यस्थी केली होती. या प्रकरणी सरकारने हस्तक्षेप केला होते असेही समजते. कचरा डेपोतील भ्रष्टाचाराचा पैसा व मध्यस्थी केल्याचा मोबदला भाजपच्या अनैतिक प्रचारासाठी वापरला जात आहे हे यातून स्पष्ट झाले आहे.

गतवर्षी विदर्भात कापसावर फवारणी करताना विषबाधा झाल्यामुळे ४० शेतक-यांचा मृत्यू झाला होता व शेकडो शेतक-यांना विषबाधा झाली होती. अनेकांना कायमचे अपंगत्व आले तर काही जणांची दृष्टी गेली होती. शेतक-यांच्या जीवावर उठलेली ही कीटकनाशके युनायटेड फॉस्फरस लिमीटेड या कंपनीने बनवली होती. सरकारने या प्रकरणाच्या चौकशीकरिता विशेष तपास पथकाची स्थापना केली परंतु चौकशी अहवालात आश्चर्यकारक पद्धतीने कंपनीला क्लीन चीट देऊन त्यांनीच बनवलेल्या कीटकनाशकाच्या मिश्रणाला दोषी ठरवले आणि मिश्रणावर बंदी घालण्यात आली. सरकारच्या दबावामुळेच कंपनीला क्लीन चीट देण्यात आली. अद्याप या शेतक-यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला नाही याचे कारण सरकारचे या कंपनीवर विशेष प्रेम आहे. त्यामुळेच शेतक-यांच्या जीवावर उठलेल्या या कंपनीचा बचाव सरकारकडून सुरु आहे असे सावंत म्हणाले.

सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या साथीने काल मंगळवार दि. ९ एप्रिल रोजी युनायटेड फॉस्फरस कंपनीच्या कार्यालयावर छापा घालून भाजपच्या पप्रचारसाहित्याचा अवैध फॅक्टरीचा भांडाफोड केला होता. सदर फॅक्टरीच्या कार्यालयात भाजपच्या प्रचाराचे तब्बल सहा कोटी अवैध प्रचार साहित्य सापडले होते. निवडणूक आयोगाच्या पथकाने या कार्यालयाला कालच सील केले आहे. या संपूर्ण प्रकारात काळ्या पैशाचा वापर होत असून राज्य व केंद्र सरकारकडून यंत्रणांवर दबाव येऊ शकतो त्यामुळे याची सीबीआयमार्फत चौकशी करावी अशी मागणी सावंत यांनी केली आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाला सविस्तर पत्र लिहू असेही सावंत म्हणाले.

या पत्रकार परिषदेला आ. भाई जगताप, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे उपस्थित होते.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!