Marathi language building should be done in Mumbai: Vijay Vadeettywar | Aaplaa Vyaaspith news

Friday, December 13, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

मराठी भाषा भवन मुंबईतच झाले पाहिजे !: विजय वडेट्टीवार

मराठी भाषा भवन मुंबईतच झाले पाहिजे !: विजय वडेट्टीवार

मुंबई (प्रतिनिधी) : मराठी भाषा भवन केंद्र मुंबईत उभारण्यात यावे यासाठी साहित्यिकांसह अनेकांची मागणी असताना सरकारने मात्र या मागणीला हरताळ फासून मुंबईबाहेर नवी मुंबईत हलवण्याचा घाट घातला आहे. यातही भाजप-शिवसेना सरकारने बनवाबनवी करून केंद्राऐवजी उपकेंद्र उभारण्याचा घेतलेला निर्णय अन्याय करणारा असून मराठी भाषा भवन केंद्र मुंबईतच झाले पाहिजे, अशी आग्रही मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.   

मराठी भाषा भवन मुंबईबाहेर उभारण्याच्या निर्णयावर वडेट्टीवार म्हणाले की, हे भाषा केंद्र मुंबईतच उभारले जावे ही मागणी रास्त आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, या राजधानीत मराठी भाषा केंद्राला जागा उपलब्ध होत नाही हे पटणारे नाही. आधीच मुंबईतून मराठी लोकांचा टक्का कमी झाला आहे, आता मराठीसंदर्भातील कार्यालयांनाही मुंबईबाहेर हाकलण्याचा काही प्रवृत्तींचा डाव दिसत आहे. ६ जुलैच्या शासन निर्णयात या भाषा भवनला नवी मुंबईतील ऐरोली, जिल्हा ठाणे येथे जागा देऊन केंद्राऐवजी उपकेंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, हे अनाकलनीय आहे.

मराठी अस्मितेचे राजकारण करणारी शिवसेनाही मराठी भाषा भवन मुंबईतच व्हावे यासाठी आग्रही असल्याचे दिसत नाही. इतरवेळी मात्र शिवसेना मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, असा गळा काढत असते. मग मराठी भाषा भवन केंद्राच्या प्रश्नावर गप्प का ? मराठी भाषा भवन मुंबईबाहेर हलवू देणार नाही, यासाठी त्यांनी आग्रह धरला पाहिजे. पण शिवसेना फक्त मतांसाठी मराठीचा वापर करते. त्यांचे ‘खायचे दात आणि दाखवायचे दात’ वेगळे आहेत हे पुन्हा एकदा उघड झाले आहे. मराठी भाषा केंद्रासाठी मुंबईत एक इमारत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करता येत नसेल तर शिवसेनेला मराठी-मराठी करण्याचा अधिकार नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.   

राज्यात मराठी भाषा मंत्रालय आहे, त्याच्या अखत्यारित भाषा संचलनालय, साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोष निर्मिती मंडळ,राज्य मराठी विकास संस्था कार्यरत आहे. यांची कार्यालये मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. मराठी भाषा केंद्र मुंबईत उभारून ही सर्व कार्यालये एकाच छताखाली आणणे शक्य आहे. मेट्रो सिनेमाजवळची रंगभवन इमारत त्यासाठी द्यावी ही पूर्वीपासूनची मागणी आहे. पण रंगभवनला हेरिटेज दर्जा असल्याची सबब सांगून सरकार टाळाटाळ करत आहे. मुंबईत महापौर बंगल्यासह अनेक हेरिटेज इमारती आहेत, त्या जर स्मारकासाठी किंवा मॉल्ससाठी दिल्या जात असतील तर मायमराठी भाषेसाठी रंगभवन देण्यास काय हरकत आहे? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी विचारला आहे.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts