Is BJP using Marathi artists to propagate? : Sachin Sawant | Aaplaa Vyaaspith news

Thursday, December 12, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

भाजप मराठी कलाकारांचा प्रोपगंडा करण्यासाठी वापर करतो आहे का? : सचिन सावंत

भाजप मराठी कलाकारांचा प्रोपगंडा करण्यासाठी वापर करतो आहे का? : सचिन सावंत

मुंबई (प्रतिनिधी) : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रथितयश कलाकारांनी #पुन्हानिवडणूक? हा हॅशटॅग वापरून एकाच वेळी केलेले ट्वीट हे संशयास्पद आणि गंभीर असून या ट्वीट मागील उद्देशाचे स्पष्टीकरण कलाकारांनी द्यावे तसेच पोलिसांनी या ट्वीटमागे भाजपच्या आयटी सेलचे कनेक्शन आहे का? याची चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील नामवंत कलाकार सोनाली कुलकर्णी, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव आणि सई ताम्हणकर यांनी #पुन्हानिवडणूक? असा हॅशटॅग वापरून ट्वीट केले आहेत. या हॅशटॅगचा वापर करून भाजपच्या आयटी सेलने मोठया प्रमाणात ट्वीट करून हा ट्रेंड करण्याचा प्रयत्न केला. भाजपाकडून कलाकारांचा प्रपोगंडा करण्यासाठी वापर केला जातो, हे यापूर्वीही अनेकदा स्पष्ट झाले आहे. कोब्रा पोस्ट या संकेतस्थळाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून अनेक बॉलिवूड कलाकारांना कोट्यवधी रूपयांची अमिषे दाखवून त्यांचा भाजपकडून राजकीय स्वार्थाकरिता वापर करण्याचा प्रयत्न उडकीस आणला होता. केंद्र सरकारच्या योजनांची भलामण आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांवर केली जाणारी चिखलफेक हा भाजपचा अजेंडा राबविण्याकरिता अनेक कलाकार, खेळाडू आणि सेलिब्रिटींचा वापर सातत्याने केला जातो. त्यामुळे भाजपकडून या कामासाठी मराठी कलाकारांचा वापर सुरु झाला आहे का? अशा संतप्त सवाल सावंत यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्रामधील राजकीय परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे हवालदिल झालेला शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत असताना आणि फेरनिवडणुका होतील की काय? अशी भिती असताना बेजबाबदारपणे ट्वीट करून समाजावर त्याचा भीतीयुक्त प्रभाव पडेल याची तमा या कलाकारांनी बाळगलेली नाही. भाजपविरहीत पक्षाचे सरकार राज्यात स्थापन होऊ नये हा अजेंडा असलेल्या भाजपचा हा कुटील राजकीय डाव असू शकतो अशी शंका व्यक्त केली जात आहे. सेलिब्रिटींच्या वक्तव्याचा समाजमनावर गंभीर परिणाम होत असतो. याचाच गैरफायदा देशपातळीवर भाजप उचलत आहे. २०१४ नंतर प्रथमच देशाला या कुटील नितीची ओळख झाली. परंतु भाजपने देशात गढूळ केलेल्या वातावरणापासून पुरोगामी महाराष्ट्र वाचावा. मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टी प्रतिभा आणि सर्जनशिलतेसाठी ओळखली जाते तिथे भाजपच्या अनैतिकतेची लागण होऊ नये हीच आमची अपेक्षा आहे. त्यामुळे या कलाकारांनी तात्काळ स्पष्टीकरण द्यावे अन्यथा यामागचे खरे कारण काय आहे? हे जनतेसमोर आणण्यासाठी त्यांची पोलीस चौकशी करावी असे सावंत म्हणाले.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts