Congratulations to the people !: Congress President Ashok Chavan | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

जनतेचा कौल मान्य!: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण

जनतेचा कौल मान्य!: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण

मुंबई (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्ही खुल्या मनाने स्वीकारत असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून पराभवाची जबाबदारी मी स्वीकारत असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाने मागील पाच वर्षे सातत्याने लोकांचे प्रश्न मांडले. रस्त्यावर उतरून संघर्ष केला. त्याआधारे लोकसभा निवडणुकीला सामोरे गेलो. परंतु, काँग्रेसला यश मिळू शकले नाही, ही आमच्यासाठी मनःस्वी दुःखाची बाब आहे. या निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेणारे कार्यकर्ते व काँग्रेस पक्षावर विश्वास दर्शवणाऱ्या लाखो मतदारांचे त्यांनी आभार मानले.

लोकशाहीत जनमताचा निर्णय सर्वोच्च आहे. त्याचा आम्ही आदर करतो आणि या निवडणुकीत विजयी झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे आणि सर्व उमेदवारांचे अभिनंदन करतो. नवे सरकार मतदारांच्या अपेक्षेवर खरे उतरेल, अशी आशा ठेवतो व त्यांना शुभेच्छा देतो, असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. या पराभवाने खचून न जाता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही पक्षाला नव्याने उभे करू आणि सत्यासाठी, जनतेच्या प्रश्नांसाठी लढा यापुढेही कायम ठेवू, असे सांगून काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते यामध्ये सहकार्य करतील, अशी अपेक्षाही प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केली. 

नांदेडच्या निकालाबाबत बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, येथील जनतेने चव्हाण कुटुंबियांवर कायमच प्रेम केले आहे. अनेक निवडणुकींमध्ये नांदेडकरांनी आमच्यावर विश्वास दाखवून सेवेची संधी दिली. यावेळी कदाचित त्यांना बदल हवा होता. त्यामुळे नांदेडच्या जनतेने घेतलेल्या निर्णयाचा मी आदर करतो. मात्र, लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या या निवडणुकीत वंचित बहूजन आघाडीने धर्मनिरपेक्ष विचारधारेचे नुकसान करून जातीयवादी पक्षांना मदतच केली. त्यामुळे अनेक मतदारसंघात काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना अपयश पत्करावे लागले,अशीही भावना अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात पक्षनेतृत्व जो निर्णय घेईल, तो आपल्याला मान्य असेल असे सांगून आपण कायम काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी कटिबद्ध राहू, असेही त्यांनी म्हटले आहे.  

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts