Caretaker government does not care about Maharashtra: MLA Balasaheb Thorat | Aaplaa Vyaaspith news

Sunday, November 17, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

काळजीवाहू सरकारला महाराष्ट्राची काळजी नाही : आ.बाळासाहेब थोरात

काळजीवाहू सरकारला महाराष्ट्राची काळजी नाही : आ.बाळासाहेब थोरात

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट
शेतकऱ्यांना दिलासा देण्याची निवेदनाद्वारे मागणी

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात काळजीवाहू सरकार आहे मात्र या सरकारला महाराष्ट्राची काळजी नाही, खोटी आश्वासने देण्यापलीकडे हे सरकार काहीच करत नाही. संकटाच्या काळात सरकारने भक्कमपणे शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याची गरज असून पावसामुळे पीक वाया गेलेल्या शेतक-यांना नुकसानभरपाई म्हणून प्रति हेक्टरी ५० हजार रू. व फळबागांना प्रति हेक्टरी १ लाख रुपये मदत करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांची भेट घेऊ घेऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली व शेतक-यांना तात्काळ मदत करावी या मागणीचे निवेदन दिले.  या शिष्टमंडळात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर, आ. अमित देशमुख, आ. धीरज देशमुख, खा. सुनील तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. नवाब मलिक,  आ. जितेंद्र आव्हाड, आ. शरद रणपिसे, आ. हुस्नबानू खलिफे, माजी आमदार मोहन जोशी आदी उपस्थित होते.

राज्यापालांची भेटीनंतर माध्यमांशी बोलताना आ. थोरात म्हणाले की, महापूर बाधित लोकांसाठी ६८०० कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा सरकारने केली होती. पण ती मदत अद्याप मिळालेली नाही. आता सरकारने दहा हजार कोटींची मदत जाहीर केली आहे पण ती कधी मिळणार? हे माहित नाही.

महाराष्ट्रात जुलै ते ऑक्टोबर 2019 या कालवधीत पडलेला पाऊस हा गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षातील उच्चांकी पाऊस आहे. या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.  प्रामुख्याने खरीप हंगामातील कापूस, भात, सोयाबीन, मका, तूर, ज्वारी, बाजरी, भुईमूग, धान, कांदा या प्रमुख पिकांसह कडधान्यांचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. याबरोबरच बागायती पिके, फळबागा आणि फुलशेतीसह भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, असेही थोरात म्हणाले.

निवडणुकीचे निकाल लागून ११ दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटल्यानंतरही राज्यात सरकार स्थापन झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना व जनतेला दिलासा द्यायला कोणी वाली नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी अनेक भागात पंचनामे सुरुही झालेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.  ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे, त्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता आहे.  राज्यावर आलेल्या या संकटकाळात राजकारण बाजूला ठेवून जनतेच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो असेही थोरात म्हणाले.

अजित पवार म्हणाले, परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकर्‍यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचा विचार करता सरकारने १० हजार कोटी रुपयांची जाहीर केलेली रक्कम अपुरी असून २५ हजार कोटीची रक्कम मिळाली पाहिजे. नुकसानीचे अजून पंचनामे सुरू आहेत, ६ तारखेपर्यंत मुदत दिली आहे. ती आम्ही वाढवून मागितली आहे.

महाराष्ट्रात दीड कोटी एकरामध्ये पिकांचे नुकसान झाले असल्याचे आम्ही राज्यपालांच्या निदर्शनाला आणले आहे. शिवाय राज्यातला ७५० किलोमीटरच्या सागरी किनाऱ्यावर मच्छीमारांचे नुकसान झालं आहे. वादळामुळे त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्याबाबतीत ही सरकारने विचार करावा आणि राज्यपालांनी याबाबतच्या सूचना कराव्यात असेही सांगितले असल्याचे अजितदादा पवार म्हणाले.

राज्यपालांना दिलेल्या निवेदनात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत, शेतक-यांचे पीक कर्ज व वीज बिल माफ करावे, नुकसानग्रस्त शेतक-यांना प्रति हेक्टरी ५० हजार रूपये मदत करावी, द्राक्ष बागांसह इतर फळबागांचे व भाजीपाल्याच्या शेतीचे नुकसान झाले आहे त्या शेतक-यांना प्रति हेक्टरी १ लाख रूपये मदत द्यावी, पशुधन व घरांची पडझड झाली आहे त्याचे पंचनामे तात्काळ करून मदत द्यावी, रब्बीच्या पेरणीसाठी शेतक-यांना बी बियाणे व खतं मोफत द्यावे. या सहा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts