ऊन्हातही कवितांनी दिला सुखद गारवा | Aaplaa Vyaaspith news

Sunday, August 18, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

ऊन्हातही कवितांनी दिला सुखद गारवा

ऊन्हातही कवितांनी दिला सुखद गारवा


नंदुरबार (प्रतिनिधी ) : महात्मा गांधी वाचनालय, नवापूर, जि. नंदुरबार येथील सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई व काव्यप्रेमी शिक्षक मंच नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यस्पर्धा व काव्यसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.

सदर संपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्या माननीय विजया जडे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ कवयित्री मृदुला भांडारकर, जेष्ठ कवी माजी प्राचार्य अशोक शिंदे सर, जेष्ठ कवी प्रा. उधावंत सर, अंकूर साहित्य संघ नंदुरबारचे अध्यक्ष विजय पाटील तसेच कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नवापूरचे अध्यक्ष विजय बागुल यांनी स्थान भुषविले. आपल्या सुमधुर आवाजात शंकर साठे यांनी ईशस्तवन सादर केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमापूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. तद्नंतर जयोस्तुते या सावरकरांच्या गाजलेल्या गीताचे सादरीकरण जया नेरे, विजया पाटील, सरला साळुंखे व जागृती पाटील यांनी केले. कार्यक्रमाचा उद्देश, स्वरूप भूमिका याबाबतची माहिती जया नेरे यांनी आपल्या प्रास्ताविकात विदित केली.

प्रा. उधावंत सर यांनी सावरकरांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारे मनोगत श्रोत्यांसमोर सादर केले.

दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनकार्यावर आधारित कवितांची स्पर्धा घेण्यात आली. यात विजय बागूल, जागृती पाटील, अशोक शिंदे, प्रा. उधावंत सर यांच्यासह बऱ्याच कवींनी सहभाग नोंदवला. सावरकरांच्या कार्यास उजाळा मिळाला. त्यांच्या कार्याची व्यापकता एवढी आहे की मोजक्या शब्दांत मांडून काव्यात सादर करणे शक्य नाही तरी कवींना आपल्या कल्पकतेने सावरकरांच्या कार्याला उजाळा मिळणाऱ्या कवितांचे वाचन करून स्वातंत्र्यवीर सावरकरांना काव्यरूपी आदरांजली वाहिली.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात काव्यसंमेलन घेण्यात आले. यात महेश पूरकर, अविनाश जगताप, करणसिंग तडवी, स्काॕलर गावीत, उज्वला वडनेरे, संगिता साळुंखे, माधवी पाटील यासोबत उपस्थित सर्व मान्यवर व कवींनी विविध विषयांवरील कविता सादर केल्यात.

आपल्या अध्यक्षिय मनोगतात मा. जडे यांनी कवितेच्या माध्यमातून, समाजापुढे असलेल्या प्रश्नांना सोडवित समाजसेवेचे, देशप्रेमाचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार जया नेरे यांनी तर सूत्रसंचालन सरला साळुंखे व विजया पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व यशस्वीतेसाठी जया नेरे, विजया पाटील, सरला साळुंखे, एन. वाय. नेरे, राहुल साळुंखे, कपिल नेरे, देवेन साळुंखे तसेच वाचनालयाचे ग्रंथपाल सुधीर साळुंखे, श्री. सांगळे यांनी प्रयत्न केले. सदर काव्यसंमेलनाचा आस्वाद परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी घेतला.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!