Unforgettable Bhutan trip - 2 | Aaplaa Vyaaspith news

Friday, January 17, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

अविस्मरणीय भूतान सहल भाग – २

अविस्मरणीय भूतान सहल भाग – २

दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता आम्ही सर्वजण झोपेतून उठलो. कडाक्याची थंडी असल्याने उठायला थोडाफार आळस आला होता. सर्वजण अंघोळ करण्याच्या तयारीला लागले. मी मात्र हॉटेलच्या तळाला असलेल्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याआधी स्विमिंग पूल मधले पाणी थंड आहे की, गरम आहे याची सर्वप्रथम मी पाहणी केली. साहजिकच आहे कडाक्याच्या थंडीत थंड पाण्याने अंघोळ करायला मी काही शक्तिमान नव्हतोच. सुदैवाने स्विमिंग पूल मधले पाणी हे गरम होते. त्यामुळे स्विमिंग पूल मध्ये पोहण्याचा मनसोक्त आनंद मी घेतला. त्यासाठी मला हॉटेल व्यवस्थापनाला प्रत्येक तासाला वेगळे २०० रुपये मोजावे लागले. स्विमिंग केल्यानंतर मी हॉटेल मधल्या रूममध्ये पोहोचलो. सर्वजण तयार झाले होते. मी पण लगेच तयार झालो. त्यानंतर आम्ही सर्वजण हॉटेल मधल्या रेस्टॉरंटमध्ये चहा – नाश्ता करण्यासाठी गेलो. भूक लागलेली असल्याने ब्रेड बटर, फ्रूटस, ब्रेड जाम, ब्रेड भाजी यांवर आम्ही ताव मारला. त्यानंतर पुन्हा हॉटेलच्या रूममध्ये गेलो तर रूमचा दरवाजा माझ्या मोठ्या बंधुकडून लॉक झालेला होता. मग काय, नेहमीप्रमाणे माझ्या वडिलांचा रागाचा पारा जाम चढला, त्यांनी त्याला ओरडायला सुरुवात केली. नशीब दरवाजा माझ्याकडून लॉक नाही झाला. नाहीतर, विनाकारण नेहमीप्रमाणे या दोघांनी मिळून माझी तासायला सुरुवात केली असती. त्यांनंतर स्वागत कक्षात फोन करून आम्ही रुमची चावी आत रूममध्ये राहिली असल्याची माहिती दिली. त्यांनी लगेच दुसरी चावी आणून देऊन आमच्या रूमचा दरवाजा उघडा करून दिला. यामध्ये अर्धा तासाचा वेळ निघून गेला. तोपर्यंत आमच्या खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या गाडीचा चालक हा हॉटेलच्या खाली येऊन दीड तास थांबला होता. सकाळी १० वाजून २० मिनिटांनी आम्ही आमच्या बॅग घेऊन हॉटेल मधून खाली उतरलो. आमच्या बॅग आम्ही स्वागत कक्षात ठेवल्या अन आम्ही फुंटशोलिंगच्या परमिट कार्यालयाकडे (Regional Immigration Office)जाण्यासाठी निघालो. परमिट काढण्यासाठी आम्हांला खूप वेळ लागला. दुपारी १२ वाजता आमचे सर्वांचे परमिट काढण्यात आले.

त्यांनतर आम्ही फोन करण्यासाठी भूतान या देशाचे नवीन सिमकार्ड विकत घेतले. कारण, भारतातले सिमकार्ड हे परदेशात चालत नसते. त्यानंतर आम्ही आमच्या कारचे परमिट काढण्यासाठी भूतानच्या आरटीओ कार्यालयाकडे गेलो. कारचे परमिट काढण्यासाठी बऱ्याच वेळ लागणार असल्याने कारच्या चालकाने आम्हांला पुन्हा हॉटेलवर सोडले. खूप वेळ झाला होता, दुपारचे १ वाजले होते. त्यांनतर आम्ही फुंटशोलिंगला चालत एका हॉटेलमध्ये दुपारचे जेवण करण्यासाठी गेलो. दुपारचे जेवण झाल्यानंतर पुन्हा हॉटेलवर आलो. कारचे परमिट काढल्यानंतर दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी आम्ही हॉटेल मधल्या आमच्या बॅग घेतल्या आणि भूतानची राजधानी असलेल्या थिंफु या शहराकडे खाजगी ट्रॅव्हल्सच्या कारने जाण्यासाठी रवाना झालो. सुरुवातीला आम्हांला फुंटशोलिंगचा रिंचेंडिंग हा चेकपोस्ट नाका लागला. या चेकपोस्ट नाक्यावर आमच्या गाडीच्या चालकाने परमिटची सर्व कागदपत्रे दाखवून कागदपत्रांची पडताळणी करून घेतली. त्यामध्ये वाटेतच आम्ही भूतानची संत्री विकत घेतली. हि संत्री चवीला फार जास्त गोड नसते. त्यांनतर आम्ही रस्त्याला लागून असलेल्या एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबलो. खूप कडाक्याची थंडी होती. बोलताना तोंडातून गरम वाफा बाहेर पडत होत्या. रस्त्याच्या बाजूला बर्फ पडलेला दिसत होता. या ठिकाणी आम्ही लगेच स्वेटर, कान टोप्या, हँड ग्लोज परिधान केले. हॉटेलमध्ये गरम चहा घेतला आणि पुढच्या प्रवासाला निघालो. यावेळी सायंकाळचे ४ वाजून ४५ मिनिटे झाली होती. पुढे गेल्यानंतर आम्हांला छुखाजाम हा चेकपोस्ट लागला. या चेकपोस्टवर आमच्या कारच्या चालकाने पुन्हा परमिटची सर्व कागदपत्रे दाखवून कागदपत्रांची पडताळणी करून घेतली. चेकपोस्ट नाक्यावर परमिटच्या कागदपत्रांची पडताळणी करणे हे अत्यंत आवश्यक होते. कारण, परमिटच्या कागदपत्रांची आम्ही पडताळणी करून घेतली नसती तर आम्हांला पकडले गेल्यावर एका माणसांमागे प्रत्येकी १,६५० रुपये इतका दंड भूतान सरकारला भरावा लागला असता. खूप उशीर झाला होता. सायंकाळचे ६ वाजले होते. थंडी वाढत चालली होती. रात्रीची वेळ होती. नागमोडी वळणे, छोटासा रस्ता यामुळे कार चालकाला गाडी वेगाने चालवण्यासाठी अडचणी येत होत्या. शेवटी रात्री ८ वाजता आम्ही थिंफु या शहरात एंट्री मारली. सगळीकडे लाईटिंग दिसत होती. जशी काय भूतानमध्ये दिवाळी साजरी होत आहे असे वाटत होते. रात्री ८ वाजून ३५ मिनिटांनी आम्ही आमच्या किसा व्हीला या हॉटेलवर पोहचलो. अतिशय सुंदर हॉटेल आहे, जसे की जुन्या काळातल्या राजा – राणीचा महलच जणू. हॉटेलच्या खिडक्या उघडल्या की, समोरच भूतानच्या राजा आणि राणीचा मोठा आलिशान महल. डोळ्याचे पारणे फेडणारा महल पाहून जसे काय इतिहासातच पुन्हा एकदा डोकावून पहावयास वाटत होतं. रात्री ९ वाजता फ्रेश होऊन हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवायला गेलो. त्यानंतर आम्ही आमच्या रूममध्ये झोपायला गेलो.

@ योगेश शामराव शेटे

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts