Total Intelligence | Aaplaa Vyaaspith news

Sunday, August 18, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

टोटल इंटेलिजन्स

टोटल इंटेलिजन्स

एकदा ऑफिसमधल्या अतिशय हुशार व्यक्तीला अचानक काही घरगुती कामांमुळे घरी लवकर बोलावण्यात येते.घरून अर्जेंट फोन येण्यामुळे हि व्यक्ती तावातावाने मॅनेजरकडे जाते आणि मला अतिशय तातडीने घरी बोलावले आहे ,मी निघालो असे सांगते. तेव्हा मॅनेजर त्याला सांगतो
आता खूप महत्वाची मिटिंग आहे ती झाल्यावर सरांना विचारून बघ ,असे म्हंटल्यावर ती व्यक्ती चिडते आणि म्हणते ,मला एक अतिशय महत्वाचे काम आहे ,त्याची तीव्रता तुम्हाला कळत नाही का ? मी माझी कर्तव्ये दररोज चोख पार पडतो ,आणि माझ्या तातडीच्या काळात तुम्ही अशी उत्तरे कसे देऊ शकता ?? दोघांची चांगलीच जुंपते …!!
अशा प्रसंगात कोण काय कसा निर्णय घेतो यावरच आपल्या बुद्धिमत्तेचे मापन करण्यात येते .
आता त्या व्यक्तीचा केवळ IQ उत्तम असून चालेल का ??.. नाही .तर त्याला येथे थोडं सबुरीने ,समजूतदारपणे किंवा संयमाने घ्यायला हवे होते ,असे कोणाकोणाला वाटते …??
IQ या संकल्पनेमध्ये बुद्धिमान ,अव्वल क्रमांक मिळवणाऱ्या लोकांचा समावेश होतो. हे लोकं डोकं वापरून ज्ञानशाखा कोळून सहज पितात . यांना गणिती ज्ञान ,तर्कशुद्ध आकडेमोड ,अवघड कोडे यात हे तरबेज असतात. ज्ञान ,आकलन ,स्मरणशक्ती यांच्या जोरावर यश काबीज करतात .डिग्र्यांचा पुरेसा साठा करेपर्यंत IQ आपल्याला साथ देतो. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी व्यवसायाच्या उंबरठ्यावर आपण पोहोचल्यावर IQ बरोबरच आपणास आणखी काही कौशल्यांची नितांत गरज भासते.
नेतृत्व ,सांघिक कौशल्य,आदरपूर्वक बोलणे ,समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेणे आणि खूप काही ….,,
या सगळ्या गोष्टी शिक्षणातून येतीलच असे नाही ,डिग्र्यांबरोबर हे गुण फ्री सुद्धा मिळत नाहीत. आयुष्यात केवळ बुद्धिमान असून भागत नाही ,त्याबरोबर व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूंचा विकास होणे गरजेचे आहे .

    खूप वर्षांपूर्वी अनेक मानसशास्त्रद्न्य आणि विचारवंतांना देखील हाच प्रश्न पडत होता ,कि नक्की बुद्धिमत्ता म्हणजे काय ? बुद्धिमत्तेचे एकूण घटक किती ? बुद्धिमत्ता हि वेगवेगळी असू शकते .भाषिक ,सांगितिक,क्षेत्रीय ,अवकाशीय इ. सात बुद्धिमत्तेचे घटक आपण सविस्तर पाहिलेले आहेत. मग या सगळ्या बुद्धिमत्तेच्या घटकापलीकडे देखील आणखी काही तरी असेल असे मानसशास्त्रज्ञांना वाटू लागले यातूनच मग भावनिक बुध्यांक म्हणजेच

Emotional Intelligence हि संकल्पना १९९५ मध्ये डॅनिअल गोलमन यांनी मांडली. थॉर्नडाइक याने देखील याबद्दल आधीच बोलून ठेवले होते परंतु त्याच्या बोलण्याकडे फारसे कोणी लक्ष दिले नव्हते. या शतकातच बुद्धिमत्तेच्या निरनिराळ्या चाचण्या घेतल्या जात असे .परंतु या चाचण्यांमधून देखील बुद्धीचे परिपूर्ण स्वरूप उलगडले आहे असे वाटत नव्हते.
डॅनिअल गोलमन यांनी EQ म्हणजेच भावनिक बुध्यान्काची व्याख्या अगदी समर्पक सांगितलेली आहे. ” भावनिक बुध्यांक म्हणजे आपल्या भावनाबरोबर दुसऱ्यांच्या भावना समजून घेणे, त्याचबरोबर आपल्या भावनांचे इतरांशी असलेल्या संबंधांचे योग्य व्यवस्थापन करण्याची स्वयंप्रेरणा किंवा क्षमता व्यक्तीत असणे होय.

बुद्धिमत्तेचा हा घटक जगासमोर आल्यावर IQचे महत्व आयुष्यात २०% तर EQचे महत्व ८०%
वाटू लागले .
भावनिक बुध्यांक या संकल्पनेअंतर्गत
स्व जाणीव self awareness
आत्मनियमन self Regulation
प्रेरणा Motivation
सामानानुभूती Empathy
आणि
सामाजिक जाणिवा social awareness
इत्यादी घटकांविषयी ईत्यंभूतपणे उदाहरणासहित माहिती आणि स्पष्टीकरण डॅनियल गोलमन यांनी
इमोशनल इंटेलिजन्स या पुस्तकातून दिली आहे .
अत्त्युच खपानंतर याची दुसरी आवृत्ती ने देखील खपाचा नवा विक्रम नोंदवला आहे.

आयुष्यात अत्त्युच्च बुद्धिमत्तेने यशस्वी तर होता येईल परंतु सुखी ,समाधानी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर आपला इमोशनल इंटेलिजन्स अर्थात EQ वाढवणे गरजेचे आहे .
शालेय पातळीवर आज फक्त आणि फक्त IQ वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात .परंतु मनाची श्रीमंती वाढवण्याचे तंत्र अजूनही शालेय पातळीवर राबवले जात नाही .
आयुष्यात अति उच्च शिक्षित लोक सुखी असतीलच असे नाही , आज आर्थिक सुबत्ता असलेला माणूस सुखी असेलच असे नाही ..,,
पैसा आल्यावर सुख आपोआप येईल हे जणू जीवनाचं सूत्र आपल्या कित्तेक पिढ्यांचे बनत आहे . असे असून हि आज माणूस सुखी का नाही ? इंजिनियर ,डॉक्टर ,वेल सेटल माणसे आत्महत्या का करतात ?? पैशाने कंफर्ट मिळेल हि ,पण मनःशांती मिळवण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करावे लागतात .
EQ नेमके हेच सांगत आहे .एखाद्या अटीतटीच्या प्रसंगात नेमके कसे वागावे ? ताणाचे नियोजन कसे करावे ?अवघड प्रसंगामध्ये आपण काय भूमिका घ्यावी ??
आज करियर ,नाते आणि समाज या तिहेरी कसोट्यातून जाताना आज आपली तारेवरची कसरत होत आहे.या तिन्ही ठिकाणी वावरताना आपला EQ चांगला असणे गरजेचे आहे .
आज मोठमोठ्या कार्पोरेट कंपन्यांमध्ये फक्त IQ चांगला असलेल्याना प्राधान्य नसून highest EQ तपासून नोकरीवर घेतले जाते . कारण केवळ आपली गुणपत्रके आपण कसे वागणार हे ठरवू शकत नाहीत. सहकाऱ्यांबरोबर काम करणे , कलिग्सच्या नवीन कल्पना आधी ऐकून घेणे ,कामाचे व्यवस्थापन ,नियोजन ,कोणत्याही प्रश्नांचे सोल्युशन काढण्याची क्षमता असणे ,प्रसंगावधान राखून निर्णयापर्यंत पोहोचणे अशा सगळ्याच दैनंदिन घडामोडीत EQ उच्च असणे गरजेचे आहे ..,,
EQ चांगला असणे म्हणजेच सर्वप्रथम आपल्या भावना समजावून घेणे ही EQ वाढवण्याची पहिली पायरी आहे .यामध्ये आपल्या मनात चाललेला भावभावनांचा कल्लोळ समजून घेणे ,आपण स्वतःला नीटसे ओळखल्याशिवाय दुसर्यांना कसे ओळखू शकणार ? माणूस हि समाजाची छोटी प्रतिकृती आहे ., पुढच्या पायरीवर आपले सहकारी ,मित्र आणि नातेवाईकांच्या भावना समजून घेणे आवश्यक ठरते . आज आपण प्रत्येकाची ओरड ऐकतो आहे की मला वेळ नाही ,मला खूप काम आहे ,आपल्या डोक्यात विचारांचे भयानक वादळ चालले आहे ,त्यामुळे संयम न राहता रागात चुकीचा निर्णय घेतल्याने आपलेच नुकसान होते हे न कळणे म्हणजे लो EQचे लक्षण होय ..!!
आपल्या रागावर नियंत्रण असणे ,मूड रेगुलेशन करता येणे म्हणजेच आपला मूड जाणीवपूर्वक बदलता येणे हि EQ वाढल्याची पुढची पायरी आहे . या लेखाच्या सुरुवातीला वाचलेल्या गोष्टीत तो व्यक्ती घरी जाण्यासाठी मॅनेजर बरोबर सामंजस्याने ,विनंतीपूर्वक बोलला असता तर हमरीतुमरीवर गोष्टी गेल्याच नसत्या ,शिवाय वेळ ,एनर्जी वाचून गोडीगुलाबीत घरी पोहोचला असता ….,कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून आणि आपले मैत्रीपूर्वक संबंध न बिघडवता प्रसंग हाताळता येणे म्हणजे highest EQम्हणता येईल .
प्रत्येक वेळेस बुद्धीने ,तांत्रिकपणे निर्णय घेण्याने प्रश्न सुटतात असे नाही ,मन मोठे करून सारासार विचार करण्याची क्षमता वृद्धिंगत होणे गरजेचे आहे . आजच्या ९९% टक्के समस्या या लो EQ
मुळे निर्माण होतात .आपल्यासमोर दिसणारे महाभयंकर रोग ,व्याधी आणि टेन्शनरूपी महाराक्षसाने ग्रासण्याचे एकमेव कारण म्हणजे लो EQहोय …
आपल्या आयुष्यात सुख ,आनंद ,समाधान ,शांती यावी वाटत असेल तर आपल्या व इतरांच्या भावनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही .आज आपला कल विज्ञान ,बुद्धी आणि भौतिक जगाची वाढती स्वप्ने यांकडे झुकलेला आहे .परंतु EQ मुळे जे पराकोटीचे समाधान नि मनःशांती मिळते याकडे दुर्लक्ष होते आहे .पूर्वीच्या पिढ्यांचे संसार केवळ उच्च EQ मुळे टिकले होते , आज स्वतःला बदलण्याची आणि आत्मपरीक्षण करण्याची मानसिकताच राहिलेली नाही .
थोडक्यात ,

total Intelligence = IQ + EQ
म्हणजेच कर्तव्यबुद्धीने रोबोटप्रमाणे निर्णय घेणे देखील चुकीचे ठरेल आणि केवळ भावनांच्या आहारी जाऊन निर्णयाप्रत पोहोचणे हे ही चुकीचे आहे . भावना आणि बुद्धी या दोहोंच्या सहकार्यातून जो निर्णय घेईल तो टोटल इंटेलिजेंट ठरेल.

हर्षदा जोशी ,पुराणिक

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!