Romance | Aaplaa Vyaaspith news

Saturday, February 22, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

रोमान्स

रोमान्स

रोमान्स हा नुसता शब्द जरी उच्चारला तरी मनात एक गोड जाणीव निर्माण होते.  सर्वांना हवीहवीशी वाटणाऱ्या या भावनेला लोकलाजेखातर थोडीशी मुरड घातली जाते.  मनातल्या मनात उड्या मारावाश्या वाटतात.  काळाच्या कुपीत जपून ठेवलेल्या आठवणींवर हळुवार फुंकर घातली जाते.  मनाला नकळत तरतरी येते.  एकामागून एक आठवणी उलगडत जातात.   मनात जपून ठेवलेल्या आठवणी एका पाठोपाठ एक बाहेर पडतात व एक आनंददायक क्षणांचा गोफच तयार होतो.  अंगावर अलगद मोरपीस फिरवल्यासारखे अथवा ऐन उन्हाळ्यात थंडगार झुळूक अंगावर आल्यामुळे जशी रोमांचकारी जाणीव होते ती भावना  रोमान्स  या शब्दात एकवटली आहे.  रोमान्स म्हणजे जादुई भावनेचा सर्वोच्च बिंदू.    रोमान्स  म्हणजे फक्त शारीरिक जवळीक असा अर्थ होत नाही.  जोडीदाराबरोबर मारलेल्या गप्पाही  रोमान्सचाच एक भाग आहे.  गप्पा कितीही टुकार असल्या तरी त्या क्षणी त्या दोघांनाही त्या गप्पा हसवतात भावतात हेच तर खरे परस्परांतील  रोमान्सचे भावनिक दुवे.  एखाद्या विनोदावर दोघांनी केलेले खळखळून हास्य व मधून मधून कळत नकळत होणार स्पर्श यातच  रोमान्सची मजा आहे.  पारिजातकाच्या झाडाजवळ धवल सुवासिक सडा शिंपलेला असतो.   त्या सड्यात बसून शुभ्र सान गंधित फुले अंगावर घेत जोडीदाराचा हात हातात घेऊन अगदी बाष्कळ गप्पा मारणे हा सुद्धा रोमान्सचा एक आल्हाददायक प्रकार आहे.  सागरकिनारी कोमट वाळूतुन जोडीदाराचा हात हातात धरून  अनवाणी चालतांना जी भावना निर्माण होते ती चिरकाल मनात घर करून राहिलेली असते.  एकाच शेंगदाण्याच्या पुडीतून परस्परांकडे पहात शेंगदाणे खाणे हा अनुभव मनातील कोपऱ्यात कुठेतरी जपून ठेवलेला असतो.  जेव्हा गप्पा मारतांना अशा गोष्टींना उजाळा दिला जातो तोच  रोमान्स.  तसेच जोडीदारासह धबधब्याजवळ उभे राहिले असतांना अंगावर उडणारे पाण्याचे थेंब हा अनुभवही तेव्हढाच रोमांचक असतो.   श्रावणसरींत जोडीदाराबरोबर झाडाखालून जातांना पानातून पडणारे पावसाचे थेंब तनमनात गोड शिरशिरी निर्माण करतात.  
हळूहळू वय वाढते.  मऊ हळुवार रेशमी दिवस हळूहळू मागे पडू लागतात.  मुला-मुलींचे विवाह होतात.  यथावकाश त्यांचे संसार मुला-बाळांनी फुलतात.  ते त्यांच्या संसारात /  रोमान्सात जोडीदारासह आनंद घेत असतात.  या सगळ्या कालचक्रात जोडीदाराचा सहभाग तेव्हढाच महत्त्वाचा असतो.  काही वेळेस जोडीदार आपल्याबरोबर आहे ही भावनाही मनाला उभारी देते.  या वयात शारीरिक जवळीकीपेक्षा मानसिक आपुलकी जास्त महत्वाची / गरजेची वाटते.  या वयातही रोमान्स होत असतो.   मुले नातवंडे बाहेर पडल्यावर जोडीदाराबरोबर चहाचे घुटके घेत निरर्थक गप्पा मारणे हाही रोमान्सचाच भाग आहे.  नातवंडांना शाळेत सोडल्यावर जवळच्या दुकानातून गरमागरम सामोसे घेऊन जोडीदाराच्या डोळ्यात पहात सामोसा खाणे हा आनंद दुसरे काय दर्शवितो.  जोडीदाराबद्दलची प्रेमाची भावना डोळ्यांतून ओसंडून वाहणे अथवा जोडीदारावर लटके रागवून त्याला पथ्याची आठवण करून देणे आणि त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून सामोसा खाणे यात  रोमान्सच डोकावीत असतो.  जोडीदाराला मधुमेह असेल तर कधीतरी जिलेबीचा एखादा तुकडा अथवा एखादा गुलाबजाम खातांना त्याच्या चेहऱ्यावरील समाधान पाहणे यात आनंदच लपलेला असतो.  कधी कधी जोडीदार झोपाळ्यावर बसल्यावर त्याच्या आनंदात सहभागी होऊन झोपाळ्याला हाताने हळूच हेलकावे देणे (‘तू तीथे मी’ या चित्रपटातील अभिनेते मोहन जोशी व अभिनेत्री सुहास जोशी यांच्यावर चित्रित केलेला चित्रपटातील शेवटचा प्रसंग डोळ्यासमोर येतो).  सागरकिनारी वाळूत बसून भेळ खाणे आणि मधूनच आजूबाजूचे कोणी बघत नाही हे पाहून हळूच जोडीदाराला भेळेचा घास भरविणे.   त्याचप्रमाणे एकाच शहाळ्यात दोन स्ट्रॉ घेऊन पत्नीने लाजत लाजत नारळपाणी पिणे.  या अशा गोष्टीतून रोमान्सच डोकावीत असतो.  जिन्यावरून उतरतांना किंवा झोपाळ्यावरून उतरतांना पत्नीला हाताचा आधार देऊन उतरविणे व त्याचवेळेस पत्नीच्या चेहेऱ्यावरील लज्जेचा भाव पाहून न पाघळणारा नवरा शोधूनही सापडणार नाही.   कधी फिरायला गेल्यावर घरी येतांना बायकोच्या आवडत्या फुलांचा गजरा आठवणीने घेऊन घरी आल्यावर  बायकोच्या केसात तो गजरा माळताना बायकोचा चेहरा लाजेने चूर होऊन जातो तोच खरा रोमान्स .  जी गोष्ट गजऱ्याची तीच गोष्ट थोड्याफार प्रमाणात सुवासिक पर्फ्युमची.   त्याचबरोबर तिच्या आवडत्या रंगाचा ड्रेस / टॉप आणून तिला आश्चर्यचकित करण्यातील आनंद एक नवराच समजू शकतो.  तो ड्रेस / टॉप परिधान केल्यावर तिच्या चेहऱ्यावर जे कौतुकाचे लाडिक भाव येतात त्यातच नवरा हरवून जातो व नकळतपणे तिला कवेत घेतो यात वासनेपेक्षा परिपक्व रोमान्सच जास्त असतो.   वाढदिवसाच्या दिवशी केक कापून झाल्यावर पतीला केकचा तुकडा भरवितांना किंवा पतीकडून केक भरवून घेतांना पत्नीच्या डोळ्यात लज्जेचे हळुवार भाव उमटतात त्या भावना कधीच शब्दांत व्यक्त करता येत नाहीत.  कधी समवयस्कांबरोबर सहलीला गेल्यावर पत्नी जेव्हा दोरीच्या उड्या अथवा तत्सम खेळ खेळते तेव्हा पतीच्या डोळ्यात जे कौतुक असते त्याचे मोल करता येणे शक्य नाही.  या वयातही पत्नीला कोणीही नाव घेण्यास सांगितले तर ती आढेवेढे तर घेतेच पण नाव घेतांना चेहऱ्यावर लज्जेचे भाव असतात.  सर्वांत महत्त्वाचे म्हणजे परस्परांना आय मिस यू डार्लिंग किंवा माझे तुझ्यावर प्रेम आहे असे काही न म्हणताही पती पत्नी परस्परांच्या डोळ्यात पाहून जोडीदाराच्या मनातील भावना ओळखतात व यालाच परिपक्व रोमान्स म्हणत असावेत.  कधी कधी नवऱ्याच्या मोटारसायकलवर मागे बसतांना त्याच्या खांद्यावर हात ठेवतांना गालातल्या गालात नकळत स्मित झळकते व क्षणभर हात थरथरतो यालाच रोमान्स म्हणत असावेत.  पत्नीच्या इश्श्य या शब्दात जेव्हढा रोमान्स लपलेला आहे तेव्हढा कशातच नाही. 
पण एक मात्र खरे की विवाहाला कितीही वर्षे झाली असली तरी परस्परांचे हात हातात घेतांना मनात एक गोड भावना निर्माण होत असेल.  या संदर्भात बागबान या हिंदी चित्रपटात असलेला प्रसंग आठवितो.  त्या प्रसंगात पती म्हणी म्हणण्यात एकसारखा चुका करीत असतो आणि त्याची पत्नी त्या चुका दुरूस्त करीत असते.   नंतर एका प्रसंगात पत्नी जवळपास नाही हे पाहून तो म्हणतो की मला म्हणी येतात पण मी मुद्दाम चुकीच्या म्हणी म्हणतो कारण त्या म्हणी जेव्हा माझी पत्नी दुरुस्त करते तेव्हा तिच्या डोळ्यातील भाव मला खूप भावतात.  त्याची चूक तिला कळते पण ती पतीला काही न म्हणता किंवा त्याला न दुखविता पत्नी म्हणी दुरुस्त करीत असते.  फक्त पत्नीला बरे वाटावे म्हणून मुद्दाम चुका करून त्या पत्नीकडून दुरुस्त करून घेणे हा मला वाटते रोमान्सचा अनोखा प्रकार आहे.  याला अबोल  रोमान्स  म्हणण्यास काहीच हरकत नसावी.   असाच एक हळुवार तसेच अलवार रोमान्सचा प्रत्यय आँधी या हिंदी चित्रपटात पाहावयास मिळतो.  वडिलांच्या राजकीय ईर्षेपोटी नवऱ्याला नाईलाजाने घटस्फोट द्यावा लागतो.  पण नंतर ती राजकारणात स्थिरावल्यावर योगायोगाने तिची व तिच्या नवऱ्याची गाठ पडते.  घटस्फोट झालेला असूनही त्यांच्यातील परस्परांबद्दलची प्रेमभावना फिनिक्स पक्ष्यासारखी पुन्हा उचल घेते.  ते पती पत्नी परस्परांशी काळजी घेण्यासाठी जीवाचे रान करीत असतात.  या प्रणयात कोठेही असभ्यता जाणवित नाही.   पती पत्नी भेटल्यावर त्यांच्या संयमी व मितभाषी  रोमान्स ला जो बहर येतो त्याचे वर्णन शब्दात करता येणे शक्य नाही.  अभिनेते संजीव कुमार व अभिनेत्री सुचित्रा सेन या दोघांनी आपल्या संयत तसेच सशक्त अभिनयानी परिपक्व रोमान्स आपल्या समोर उभा केला आहे. 
शेवटी एव्हढेच सांगता येईल की वयाच्या ज्येष्ठावस्थेत रोमान्स नक्कीच बहरून येतो कारण त्यामागे काही वर्षांची तपश्चर्या असते.  हळुवार तसेच अलवार  रोमान्स करण्याची परिपक्वता अनुभवानेच येते. 

@ मिलिंद कल्याणकर
नेरुळ, नवी मुंबई

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts