Rainy season | Aaplaa Vyaaspith news

Friday, August 23, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

पावसास पत्र

पावसास पत्र

प्रिय पावसा, 

पाऊस वेळेवर व व्यवस्थित पडणे हे निसर्गाने आपल्यावर केलेले अनंत उपकार आहेत.   जून महिना सुरु झाला की पशु-पक्ष्यांसह आम्ही मानवही तुझ्या आगमनाची वाट पाहत असतो.  वसंतातील रखरखाटामुळे मरगळ आलेल्या तरू वेलींना नव संजीवनी देण्यासाठी तुझ्या शीतल शिडकाव्याची आवशक्यता असते.  आम्ही सगळे तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असतो.  उत्कंठेने प्रियतमेची वाट पहाणारा प्रियकर जसा वारंवार घड्याळाकडे बघून सुस्कारे टाकतो तशीच काहीशी आमची परिस्थिती तुझ्या बाबतीत होते. आम्हीही चातकाप्रमाणे वारंवार आकाशाकडे पाहून पावसाच्या आगमनाची आतुरतेने वाट पहात असतो.   एप्रिल मे च्या दाहक वातावरणात मरगळ आलेल्या तन-मनाला जून महिन्याची सुरुवात तुझ्या आगमनाच्या जाणिवेने आशेचा किरण घेऊन येते. उन्हामुळे मरगळलेले तन-मन पुन्हा उभारी घेतं व आपोआप मनातील मरगळ दूर होऊन ताजेपणाचा स्पर्श होऊन तन-मन टवटवीत होऊ लागते.  तू आठवडाभरात येणार अशी वर्दी जरी मिळाली तरी प्रसन्नता वाटते.  

अरे पावसा तू जरी आमच्यावर पाण्याचा वर्षाव करीत असलास तरी प्रत्येकाच्या मनातील पाऊस वेगळाच असतो.  प्रत्येकाचा पावसाकडे पहाण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो.  बळीराजा म्हणजेच शेतकरी मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून पावसाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेला असतो.   भेगाळलेल्या जमिनीला पाण्याची आस लागलेली असते.  तापलेल्या जमिनीला शांत करण्याची ताकद तुझ्यातच आहे.  तप्त जमिनीतून कोंब बाहेर येण्यासाठी पाणी जमिनीत खोलवर गेलेच पाहिजे.   त्यामुळे हे कोंब टरारून येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज असते व ती गरज तूच भागवू शकतोस.  कोंब जर टरारून आले तरच दर्जेदार पीक येऊ शकतं.  त्या जमिनीतून उगवणाऱ्या पिकावर / अन्नधान्यावर त्याचा व त्याच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो.  पाऊस चांगला पडून पीक चांगले आले तर त्याचा वर्षभराचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटतो.  आधीच कर्जबाजारी असलेला शेतकरी पावसाच्या अभावी पीक चांगले न आल्यास आणखी कर्जबाजारी बनण्याचा धोका असतो.   म्हणून ए पावसा निदान आमच्या बळीराजासाठी तरी लवकर धावून ये व त्या सर्वांचा  उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडव.  त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला की आपोआप सर्वांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल. शहरी / नागरी वस्तीतील लोकांना  शेतीची तर काळजी असते पण त्याचबरोबर त्यांची अशी ईच्छा असते की सर्व लहान मोठी धरणे पूर्णपणे भरावीत व पुढील वर्षाचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटावा. हे दोन्ही महत्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी हे पावसा तू वेळेवर ये व आमच्यावर पुरेसा तसेच समाधानकारक वर्षाव कर.  

एप्रिल / मे मध्ये झालेली शरीराची लाही लाही / दाहकता यावर उपाय म्हणजे पावसात भिजणे.  पावसात भिजण्यासाठी वय हे परिमाण असूच शकत नाही.  आयुष्यातील कोणत्याही टप्प्यावर या पावसाचा आनंद मनापासून व भरभरून घेता येतो.   पहिल्या पावसात भिजल्याने उष्णतेने झालेले सर्व विकार बरे होतात असे म्हणतात.  त्याकरिता तरी तू लवकर येऊन होत असलेल्या त्रासावर शीतल पाण्याचा वर्षाव कर व सर्वांना दाहकतेपासून वाचव.  लहान मुलांना तर पावसाचे अप्रूपच असते.  ती मुले तर कवितेतून पावसाला पैसा देण्याची लालूच ही दाखवतात व लगेच पैसा खोटा झाल्याचेही सांगतात. लहान मुले पावसाचा आनंद खूप छान रीतीने घेतात.  स्वतः रेनकोट-टोपी घालून हाता – पायाने पाणी उडवण्याचा आनंद त्यांच्या डोळ्यात दिसतो.   त्यांच्या पाण्यात कागदी होड्या सोडतानाचा अवर्णनीय आनंद पहाण्यासारखा असतो.  वहाणाऱ्या झऱ्यात हात-पाय बुचकळणे, पाणी उडविणे, झऱ्याचा मार्ग बदलणे ईत्यादि बालगोपाळांच्या अवीट आनंदासाठी तरी तू लवकर यावेस असे वाटते.  जीवनातील तारुण्य या टप्प्यावर तर या पावसाचा आनंद घेणे ही पर्वणीच असते.  पावसाळी सहलीला तर उधाण येते.  वेगवेगळे पावसाळी सहलीचे कार्यक्रम आखले जातात.  सहलीकरिता नवनवीन ठिकाणे शोधली जातात.  पुरुष स्त्री हा विचार न करता मनसोक्त भिजतात.  यावर कडी म्हणजे ते जर प्रियकर प्रेयसी असतील तर पावसामुळे त्यांच्या आनंदाला एक वेगळीच झिंग येते. तसे पहावयास गेले तर पावसाळा हा तरूण ऋतू मानतात.  पावसामुळे नदी, नाले, ओढे, जाते इत्यादी दुथडी भरून वहात असतात तसेच धरणी हरित दुलई पांघरून नव्या नवरीसारखी नटलेली असते.  आसमंतात घुमत असलेल्या कालरव कानावर पडताच मन साहजिकच त्यात गुंग होते.  तरुवेलींवर उडणारी विविध रंगी फुलपाखरे तसेच अनेक प्रकारची पाखरे डोळ्यांना तसेच मनाला प्रफुल्लित करतात.  त्यामुळे साहजिकच अशा नयनरम्य तसेच आल्हाददायक वातावरणामुळे मनाला उभारी येते.  अशा या टवटवीत झालेल्या निसर्गामुळे प्रेमाला भरते आले नाही तरच नवल.  या सगळ्यांचा आनंद मूर्त स्वरूपात यावा म्हणून हे पावसा तुला जेव्हढ्या लवकर येत येईल तेव्हढे ये.  आम्ही तुझी चातकासारखी वाट पाहत आहोत.  

@ मिलिंद कल्याणकर

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!