Ninth Durga Karnavati, the queen of Garhwal | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

नववी दुर्गा गढवालची राणी कर्णावती (नाक कापणारी राणी)

नववी दुर्गा गढवालची राणी कर्णावती (नाक कापणारी राणी)

नववा दिवस
आजची देवी : श्री सिद्धिदात्री
आजचा रंग : मोतिया रंग
     मोतिया:-
नववा रंग हा शितलतेचा,
मातेच्या अमृतमय दुग्धरसाचा,
शिंपल्यातील सुंदर मोत्याचा,
सुंदर भव्य राजेशाही थाटाचा…
         …ज्योती.

     पवांर वंशाचे राजा महिपतशाह यांचा विवाह राणी कर्णावतींबरोबर झाला होता. राजा महिपतशाह यांच्या सैन्यात माधोसिंहसारखे सेनापती होते. माधोसिंह यांच्या साहस व पराक्रमाच्या कथा सर्वदूर पसरल्या होत्या. डोंगर फोडून त्यांनी आपल्या गावाला मथेलाला पाणी आणले होते.
14 फेब्रुवारी 1628 रोजी जेव्हा शाहजहानचा राज्याभिषेक झाला तेव्हा बहुतेक सर्व राजांनी तिथे उपस्थिती लावली होती परंतु राजा महिपतशाह हे मात्र गेले नव्हते. यामुळे शाहजहानचा राजा महिपतशाहवर राग होता. तसेच गढवाल राज्याची राजधानी श्रीनगरमध्ये सोन्याच्या खाणी आहेत, असेही म्हटले जाई. त्यासाठी युद्ध झाले त्यात महिपतशाह आणि त्यांचे अनेक वीर सेनापती मृत्युमुखी पडले. राजा महिपतशाह आणि पत्नी राणी कर्णावती यांचा पुत्र पृथ्वीपतिशाह तेव्हा फक्त 7 वर्षांचा होता. त्याला राजसिंहासनावर बसविले पण तो वयाने खूपच लहान असल्यामुळे सर्व राज्यकारभार राणी कर्णावतीच चालवित होती.
ही संधी साधण्याचे शाहजहानने ठरविले आणि आपला सेनापती नजाबत खानावर या लढाईची जबाबदारी सोपविली. 30हजार घोडेस्वार आणि पायदळ घेऊन नजाबत खानने गढवालकडे कूच केले. राणीने त्यांना आपल्या राज्यात घुसायला तर दिले पण जेव्हा हरिद्वार व नंतर लक्ष्मणझुल्यावरून पुढे आल्यानंतर पुढून मागून दोन्हीकडचे रस्ते बंद केले. राणीने युक्तीनेच यांना जिंकायचे ठरविले कारण या मुघल सैन्यापुढे राणीचे सैन्य नगण्य होते. तिने नजाबत खानला खलिता पाठविला की दोन महिन्यात वीस लाख सुवर्ण मुद्रांचा नजराणा पाठविला जाईल व हे राज्यही मुघल रियासतमध्ये विलीन केले जाईल, असे आश्वासन दिले. हे त्याला खरेच वाटले आणि सैन्यासह दोन महिने संपण्याची वाट पाहू लागला. दीड महिन्यांनी राणीने फक्त एक लाखच सुवर्णमुद्रा पाठविल्या. नजाबतखानच्या सैन्याची रसद संपत आली होती, गंगा नदीचे किनारे आणि डोंगरातील अवघड घनदाट अरण्यातील रस्ते हे सर्व या मुघली सैन्याला नवीन होते, याबद्दल ते अनभिज्ञ होते, या अशा वातावरणात सैनिक ज्वराने आजारी पडून कमकुवत झाले होते आणि इथल्या वातावरणाला कंटाळलेही होते. नजाबत खानाने दोन महिने होताच राणीला तिचा पत्राची आठवण देत आत्मसमर्पण करण्याचा संदेश पाठविला पण राणीने तो धुडकावून लावला आणि नजाबत खानच्या सैन्याला चारी बाजूने वेढा घातला. युद्ध झाले, गढवाली सैन्याने खानाच्या युद्धतळावरची सर्व युद्ध सामग्री, घोडे यावर कब्जा केला, उरलेल्या सैनिकांचे नाक व कान कापून त्यांना पळवून लावले. नजाबत खानाचेही नाक कापले तो प्राण वाचविण्यात यशस्वी झाला व पळून गेला. सगळ्या जगात शत्रूचे नाक-कान कापण्याची ही पहिलीच घटना होती आणि ‘नाक कापणारी राणी’ अशी राणी कर्णावतीची इतिहासात नोंद झाली. यामध्ये राणीबरोबरच सेनापती माधोसिंह व मित्र बेग मुगल यांचा मुख्य सहभाग होता. जिथे मुघल सैन्याचा हा असा नि:पात केला त्या जागेचे नाव फतेहपूर ठेवले. फतेह म्हणजे फत्ते म्हणजेच विजय म्हणून फतेहपूर.
अशा या गढवालच्या राणीच्या विजयाने आणि नाक-कान कापण्याच्या घटनेच्या दहशतीने पुन्हा कोणत्याच शत्रूने, यवनाने-मुघलाने गढवालकडे वाकड्या नजरेने पाहिलेही नाही, आक्रमण करणे तर दूरच. त्यानंतर मात्र राणीने आपले लक्ष लोककल्याण व सोयीसुविधांकडे देत गढवाल राज्याचा राज्यकारभार पाहिला. गढवालच्या इतिहासातील वीरांगना राणी कर्णावतीचे स्थान ध्रुव तार्‍यांसारखे अढळ आहे आणि नेहमीच रहाणार. या महाराणीस त्रिवार मुजरा.

@ ज्योती हलगेकर जाधव,
 कोपरखैरणे, नवी मुंबई.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts