Must learn to deny ... | Aaplaa Vyaaspith news

Saturday, February 22, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

नकार पचवायला शिकायला हवे…

नकार पचवायला शिकायला हवे…

७ फेब्रुवारीपासून सगळीकडे प्रेम सप्ताह साजरा केला जातो, या सप्ताहाची इति प्रेम दिवसात होते ती १४ फेब्रुवारी रोजी. प्रेम ही एक अशी भावना आहे जी एखाद्या व्यक्तीला पाहिल्यानंतर ती आवडू लागते मग ते तिचे दिसणे असो, कर्तृत्व असो, वागणे-बोलणे, स्वभाव असो. त्याच व्यक्तीचा विचार आपण करू लागतो, तीच व्यक्ती आपल्या डोळ्यांसमोर नेहमी असावी असे वाटू लागते, तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न मन करीत राहते. दोघांनाही परस्परांबद्दल तीच भावना असेल तर ती डोळ्यांनी कबूल करून मनात उतरविलेली एक गुलाबी संवेदना असते.
एकमेकांसाठी प्राणही देण्याइतके हे नाते उदात्त, निर्व्याज, निरलस असते. यामध्ये खरेतर जबरदस्तीचा भाग नसतो. परंतु गेल्या आठवड्यातील एकतर्फी प्रेमात एका तरूणीला भररस्त्यात पेट्रोल टाकून पेटवून दिले. हिंगणघाट येथे घडलेली ही घटना मन सुन्न करून जाते. प्रोफेसर असलेली ही तरूणीने त्या तरूणाच्या प्रेमाला नकार दिला त्यामुळे चिडून त्या तरूणाने तिला भररस्त्यात पेट्रोल टाकून पेटवून दिले. ही आपल्याकडे घडलेली पहिलीच घटना नाही. रिंकू पाटील दुर्घटनेपासून सुरू झालेल्या या घटनेचे दुष्टचक आजही सातत्याने सुरूच आहे. प्रेमास नकार दिला म्हणून पेट्रोल टाकून पेटवून देणे, अॅसिड हल्ला करून तिच्या चेहर्‍यावर टाकून तिला विद्रूप करणे, चाकूने हल्ला करून, बंदूक चालवून तिची हत्या करणे हे नित्याचे झाले आहे.
आपल्याकडे पुरूषप्रधान संस्कृती आहे. कुटुंबात पाहिले तर घरच्या पुरुषाचाच शब्द अंतिम मानला जातो. त्याचा घरावर आणि घरातील माणसांवर एक धाक असतो. हाच संस्कार मुलांवरही होत असतो. घरात स्त्रियांना दिले जाणारे नगण्य स्थान, त्यांना केली जाणारी मारहाण हे घरातील स्त्रीला अधिकच कमजोर आणि पुरूष व मुलांच्या पुरूषप्रधान संस्कृतीला बळकटी देते. मुली, स्त्रिया घरातील भाऊ, नवरा, दीर, सासरा यांनाही घाबरत असलेल्या आपण पाहतो. घरातच हे असे थोरामोठ्यांकडून हिंसेचे धडे मुलांना लहानपणापासून मिळत जातात. घरातील आई, बहिणी कशा घरातील पुरूषांना घाबरून राहतात, हे ही मुले पाहत असतात, हाच संस्कार मग त्यांच्यावर होत राहतो सतत. दहशत निर्माण केली की कोणीच आपल्याला विरोध करीत नाही, करणार नाही ही वृत्ती वाढत जाते. दहशत बसवली की आपण काहीही कोणाकडूनही मिळवू शकतो असा गैरसमज बोकाळतो आणि आपली सत्ता निर्माण करू लागतो. स्त्रियांकडे फक्त मालकीची आणि उपभोगाचे साधन म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन असतो अशांचा.
दुसरे म्हणजे आजच्या विभक्त कुटुंबपद्धतीत तीन किंवा चार माणसे एका कुटुंबात. पालक दिवसभर अर्थार्जनासाठी घराबाहेर असतात. मुले लहान असली तर पाळणाघर किंवा मोठी असतील तर शाळा-काॅलेज संपल्यावर दिवसभर घरातच एकटी दुकटी असतात. त्यांना आपल्याला वेळ देता येत नाही ही अपराधीपणाची भावना पालकांच्या मनात असते. मग याच भावनेच्या आहारी जात मुलांनी मागितलेली प्रत्येक लहानमोठी वस्तू लगेच त्यांना विकत आणून दिली जाते जरी खिशाला ताण पडला तरीही. ‘आमच्यावेळी आम्हाला मिळाले नव्हते पण आमच्या मुलांना काही कमी पडू द्यायचे नाही. आम्ही मन मारून राहिलो पण मुलांच्या इच्छा पूर्ण करणार,’ असा पालकांचा यामागचा विचार असतो. त्यांचा प्रत्येक हट्ट पुरविला जातो. आणि इथेच एक वाईट बीज मुलांच्या मनात मूळ धरू लागते, ते म्हणजे आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात, प्रत्येक मागणी पूर्ण होते, नकार कधीच मिळत नाही. मुले जसजशी मोठी होऊ लागतात तसे या बिजाचा विषवृक्ष होतो. त्यांच्या मागण्याही वाढू लागतात आणि त्याचे स्वरूपही बदलू लागते. घरापासून सुरू झालेला हा हट्टीपणा, हेकेखोरपणा बाहेर वावरतानाही त्यांच्या स्वभावात दिसू लागतो. मागितले की मिळालेच पाहिजे ही वृत्ती अजमावू पाहतात.
या दोन्ही प्रकारात येणाऱ्या पुरुषांना जर एखाद्या महिलेकडून नकार मिळाला मग तो प्रेमात असो, एखाद्या कामासाठी असो तर त्यांचा पुरुषी अहंकार दुखावतो. एका स्त्रीने आपल्याला नकार दिला हे त्यांना पचनेच कठीण जाते. मागे हैदराबादमध्ये एका महिला सरकारी अधिकारीच्या अंगावर एकाने ज्वालाग्राही पदार्थ टाकून तिची हत्या केली तीही तिच्याच ऑफीसमध्ये. एका कडक, शिस्तप्रिय, कर्तव्यनिष्ठ, नियमांचे काटेकोरपालन करणार्‍या महिला पोलीस अधिकारीचीही हत्या तिच्याच पुरूष सहकार्‍यांनी केली होती. एका प्रामाणिक, लोकप्रिय नगरसेविकेची अशीच तिच्याच राहत्या सोसायटीच्या प्रांगणात हत्या केली होती, अशी कितीतरी उदाहरणे आहेत.
स्त्रीच्या अधिपत्याखाली काम करणे, वावरणे, राहणेही अनेकांना रूचत नाही. तिचे वर्चस्व आजही पुरूषप्रधान संस्कृतीचा पगडा असलेल्या पुरुषांना खटकत असते. तिच्या वागण्या, बोलण्या, कामावर नको इतकी टिका, चुका करीत राहतात. आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहे किंबहुना एक पाऊल पुढेच आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधानापासून ते सरपंचापर्यंत, संशोधनात, वैद्यकीय क्षेत्रात, चांद्रयान मोहीम, कार्पोरेट क्षेत्रात सगळीकडे तिने आपले स्थान निर्माण केले आहे. तरी आजही तिला घरात, समाजात अशी दुय्यम वागणूक दिली जात आहे.
प्रत्येक घरातूनच मुलांवर स्त्री-पुरूष समानतेचे संस्कार व्हायला हवेत आणि मुलांचे हट्ट पुरवण्यावर पालकांनीच बंधन घालायला हवे. प्रत्येक हट्ट, मागणी पूर्ण करताना त्या वस्तूची खरेच कितपत गरज आहे, घेणे योग्य आहे का, त्या वस्तूमुळे मुलांवर काय परिणाम होईल, याचा सारासार विचार पालकांनी करून ती मागणी पूर्ण करायला हवी. मुलांनी नकार देताना आपली बाजू, तिचे फायदे तोटेही मुलांना पटवून द्यायला हवेत. एकतर्फी प्रेमाच्या बाबतीत बरेचदा पालकांपर्यंत हे अगदी उशिराच कळून येते. प्रेम हे एखाद्यावर लादता येत नाही, जबरदस्तीने एखाद्याच्या मनात ते रूजवता येत नाही ते अलवार नकळत समोरच्याही मनात आपोआप फुलावे लागते. आपली आवडती व्यक्ती नेहमी सुखात राहावी, आनंदात राहावी हा खर्‍या प्रेमात उदात्त विचार असतो. आपल्याला जरी ती मिळाली नाही तरी ती असेल तिथे सुखी असावी इतके निर्व्याज, निरलस प्रेम असते. परंतु सध्या हे सर्व बदलले आहे. मला जर ती मिळाली नाही तर तिला कोणाचीच होऊ द्यायची नाही, मग तिला अॅसिड टाकून विद्रूप करून टाकतील, तिची हत्या करतील किंवा हिंगणघाटमध्ये झाले तसे पेट्रोल टाकून पेटवून देतील….अशी विकृती आजकाल पुरुषांच्या मनात निर्माण झाली आहे.
घरातूनच पहिल्यापासून जर योग्य संस्कार झाले. स्वतः काय आहोत हे प्रथम जाणून घ्यायला, नकार पचवायला शिकविले गेले तर बरीचशी परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.

@ सौ. ज्योती शंकर जाधव,
कोपरखैरणे, नवी मुंबई.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts