महाराष्ट्राची मायबोली

महाराष्ट्राची मायबोली

अमृताशी पैजा जिंकणारी तसेच ज्ञानेश्वर माऊलीने संपन्न व समृद्ध केलेली अशी ही महाराष्ट्राची बोली अर्थात आपली मायमराठी.  प्रत्येक भाषेचे स्वतःचे असे एक सौन्दर्य असते.  स्वतःची एक वेगळी ओळख असते.  याला मराठीही अपवाद नाही.  संत साहित्य, ललित साहित्य, काव्य इत्यादी साहित्य प्रकारांची महाराष्ट्रात म्हणजेच मराठी भाषेत मोठ्या प्रमाणात रेलचेल आहे.  काळाच्या ओघात तावून सुलाखूननिघालेले साहित्य व त्या साहित्याची निर्मिती करणारे शब्दांचे किमयागार तसेच भाषाप्रभू यांची थोर परंपरा आपल्या मराठीसलाभली आहे.   महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले हे सर्व साहित्य व त्यातल्या त्यात संत साहित्य हे मराठी भाषेच्या सागरात विहरणाऱ्यासाहित्यिकांना दीपस्तंभासारखे मार्ग दाखविणारे आहे. मराठी भाषेप्रमाणेच इतर भाषांतील साहित्य प्रथितयश साहित्यिकांनी मराठी भाषेत अनुवादित करून मराठी भाषा अधिकाधिक संपन्न करण्यास हातभार लावला आहे.   भाषा शब्दप्रभूंनी मराठी तसेच इतर भाषेतील अजरामर साहित्यकृती अनुवादित करून आपली दर्जेदार व सकस साहित्य वाचनाची भूक वाढवली व वाढवीत आहेत.

या सर्व गोष्टींमुळे मराठी भाषेला आपला असा एक आगळा वेगळा चेहरा मोहरा प्राप्त झाला आहे.  प्रथितयश साहित्यिकांबरोबरच काही नवोदित साहित्यिकही आपल्या दर्जेदार साहित्याने एक वेगळा ठसा उमटवित आहेत. काळाबरोबर माणसाची विचार करावयाची पद्धत बदलू शकते या नव्या विचाराने प्रेरीत होऊन काही साहित्यिक नित्य नवीन प्रवाह देऊन आपली विचार करण्याची प्रवृत्ती वाढवित आहेत.  प्रथितयश साहित्यिकांचे विचार व नवोदित साहित्यिकांचे विचार आपल्याला वाचावयास मिळाल्यामुळे वाचकांची सद्सदविवेकबुद्धीजागृत होऊन विचार करण्याची प्रवृत्ती जास्त प्रगल्भ होऊ लागली आहे.  इतर भाषांप्रमाणेच मराठी भाषा आपण कशी बोलतो अथवा मराठीत आपण कसे लिखाण करतो यावर त्या भाषेचे सौन्दर्य अवलंबून असते. लिहिताना किंवा बोलताना आपण जे शब्द वापरतो त्यावरून आपण करत असलेल्या विचार प्रणालीचे आकलन होते. आपल्या बोलण्यातून अथवा लिहिण्यातून आपले शिक्षण आपले संस्कार अथवा आपला विचार करण्याचा आवाका किंवा वैचारिक क्षमता / श्रीमंती याचे प्रतिबिंब दिसत असते.  कठीण व जड तसेच कारण नसतांना अलंकारिक शब्द वापरून ते सर्वाना कळतीलच याची ग्वाही देता येणे शक्य नाही.  साध्या सोप्या शब्दांनी नटलेली भाषाच चांगल्या तऱ्हेने संवाद साधू शकते अथवा असेही म्हणता येईल कीसोप्या शब्दांनीच आपल्या मनातील विचार समोरील व्यक्तीला चांगल्या तऱ्हेने आकलन होऊ शकतात.

बोली भाषा ही नेहमीच सुलभपणे संवाद साधण्यासाठी असते.  साधे सोपे स्वच्छ व सरळ अर्थ निघणारे शब्द वापरून केलेला संवाद हाचांगलाच परिणामकारक होऊ शकतो.  नेमका अर्थ ध्वनीत करणारे शब्द वापरून संवाद साधल्यास तो सुसंवादच होतो व त्या योगे आपल्या विचारांचे अवलोकन करण्यास समोरील व्यक्तीस प्रयास पडत नाही. मराठी भाषा वापरताना आजूबाजूच्या परिस्थितीचे भान ठेवावे लागते. मराठी भाषेवर इतर भाषांचा प्रभाव पडू लागला आहे.  हेसांगण्याचे कारण एवढेच की आजूबाजूची परिस्थिती मराठी भाषा धार्जिणी असूनही मराठी जास्त बोलले जात नाही किंवा नाईलाजाने बोलले जाते.  असेच एकदा मी मराठी पुस्तकांच्या पुस्तक जत्रेला गेलो होतो व तिथे फक्त मराठी पुस्तकेच होती त्यामुळे साहजिकच सर्वजण मराठी भाषिकच असणार.  मी पुस्तके बघत असताना एक तरुण मला “एक्सक्युज मी अंकल”  म्हणाला व तो पुढे गेला. मराठी भाषेवर इंग्रजी भाषेचे अतिक्रमण का होत आहे याचा विचार झाला पाहिजे.  याछोट्या घटनेवरून लक्षात येते की आपली मराठी आज का क्षीण होत चालली आहे.  वास्तविक त्याने हे मराठीतून बोलावयास हवे होते,  पणत्याने इंग्रजीचा आग्रह धरला.  इतर भाषा आणि प्रामुख्याने इंग्रजी भाषा बोलता येणे हे वाईट नाही किंबहुना इंग्रजीही लिहिता वाचता आलीच पाहिजे.  इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा असल्यामुळे ती शिकणे गरजेचे आहे पण मातृभाषेकडे पाठ फिरवता कामा नये.

आपल्या मायमराठीची आजकाल का पीछेहाट होत आहे याची कारणे शोधलीच पाहिजेत.  आम्हाला मराठी नीट येत नाही किंवा आम्हाला मराठी “सो सो च” येतं असे अभिमानाने बोलणारी महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेली व मराठी संस्कृतीत वाढलेली भरपूर माणसे मिळतील.  परदेशातील माणूस महाराष्ट्रात येऊन मराठी शिकतो एवढेच काय तरसंस्कृतमध्ये प्राविण्य मिळवतो.  यांच्या उलट आम्ही त्यांचे संस्कार, जीवनशैली आणि भाषा यांचे अंधानुकरण करून स्वतःला कोणीतरी वेगळे समजतो कारण का तर आम्हाला मराठी बोलण्याची लाज वाटते.  आजकाल अशी परिस्थिती आहे की कित्येक वेळा तसेच कित्येक ठिकाणी मराठी मातृभाषा असलेली माणसे एकमेकाला भेटली की ते मराठीत संवाद न साधता हिंदी भाषेत संवाद साधण्यास प्राधान्य देतात.  हे असे का घडते किंवा ते असा का संवाद साधतात किंवा त्यांना मराठीचा एवढा का तिटकारा आहे यावर विचार मंथन झाले पाहिजे.  प्रथम आपण आपली मराठी संस्कृती / भाषा जपली पाहिजे तरच पुढच्या पिढीवर त्याचे परिणाम होतील.  हल्ली गुढीपाडव्यालाकिती जण गुढी उभी करतात किंवा दसऱ्याला किती जण प्रतिकात्मक सीमोल्लंघन करतात हा एक संशोधनाचा विषय होऊ शकेल.  आपण आपला मराठी बाणा जपला नाही तर लहानपणी “आकाशात उडणाराकाऊ” मोठेपणी “चार पायाचा काऊ”  होईल व गोंधळाला सुरुवात होऊन त्याची परिणीती मराठी भाषेबद्दल अनास्था निर्माण होण्यात होऊ शकत असेल.   मराठीची उपेक्षा करणारी अशी माणसे मराठीचा उपयोग पार्टीत किंवा डिनर घेताना तोंडी लावण्याचा पदार्थ म्हणून करतात व आपण मराठीतूनच बोलले पाहिजे हे इंग्रजीतून किंवा हिंदीतून ठणकवितात.  हे जे तथाकथित मराठी भाषेचे भोक्ते असतात त्यांना आम्हाला मराठीच “सो सो च” येते असे ज्याला त्याला सांगण्यात मोठा अभिमान वाटतो.

मातृभाषेचा आग्रह धरणे हे चुकीचे नाही असे वाटते.  एखाद्या मराठमोळ्या कार्यक्रमाचा आमंत्रित अमराठी असेल तर त्याने शक्यतो मराठीतूनच आपले विचार लोकांपुढे मांडावेत ही अपेक्षा रास्त आहे.  भले त्याचे मराठी चांगल्या प्रतीचे नसेल पण त्याने कमीतकमी मराठीतून बोलण्याचा प्रयत्न करावा.   इतर राज्यातील लोक त्यांच्या मातृभाषेला जास्त महत्व देतात व समभाषिक एकमेकांना भेटले की ते त्यांच्या मातृभाषेतच बोलतात व त्यांना त्याच्यात अभिमान वाटतो.  पण महाराष्ट्रात मराठीत संवाद साधणाऱ्यांपेक्षा हिंदी, इंग्रजी भाषांत संवाद साधल्यास  प्राधान्याने त्याच्याकडे लक्ष दिले जाते व प्रतिसाद दिला जातो पण इतर राज्यात मराठीला तेवढा मान मिळत नाही.  असे का घडते याचा विचार प्रत्येक मराठी भाषिकाने  केला पाहिजे.  माझ्या मराठी भाषेला महाराष्ट्राबाहेर मान का दिला जात नाही या मागची मानसिकता आपण शोधली पाहिजे.  माझ्या माहितीतील एक गृहस्थ दक्षिण भारतात लहानाचे मोठे झाले आहेत पण ते कटाक्षाने मराठी बोलतात. 
मातृभाषेत बोलण्याची खुमारी ही फक्त मातृभाषेत संवाद साधणाऱ्यालाच कळू शकते. महाराष्ट्रात राहून मराठी बोलणे जेवढे संयुक्तिक आहे तेवढेच मराठी बोलता न येणे हे लाजिरवाणे आहे. मराठी जतन करणे जेवढे गरजेचे आहे तेवढेच मराठी वाढवणेहीनिकडीचे आहे. मराठी भाषा बोलणे ही एक कला आहे पण तीसहजसाध्य नाही. त्यावर प्रेम केले तरच ती साध्य होते. अपरिचिताशीबोलताना हिंदी किंवा इंग्रजी वापरणे ठीक वाटते पण महाराष्ट्रात जन्मलेल्या मराठी माणसाने मराठीचा वापर कटाक्षाने आपल्या संवादात करणे अत्यंत गरजेचे आहे.  तसेच महाराष्ट्रात राहण्याऱ्या परप्रांतीयाने देखील कमीतकमी मराठी बोलीभाषा तरी आत्मसात केलीच पाहिजे.  कोणतीही भाषा बोलताना चुका होणारच व ते स्वाभाविकच आहे.  मग मराठी भाषा बोलताना चूक झाली तर काहीही बिघडत नाही.  त्या चुकांमधूनच भाषा अवगत होण्यास मदत होते.   मराठी भाषा बोलताना होत असलेल्या चुका जाणीवपूर्वक तसेच मनापासून सुधारण्याचा प्रयत्न केल्यास फरक पडू शकतो व मराठी चांगले लिहिण्या, वाचण्यास व बोलण्यास येऊ शकते.  अलंकारिक शब्दांने भाषेचा गोडवा वाढतो हे जरी खरे असले तरी रोजच्या संवादाच्या भाषेत अलंकारिक शब्द वापरावेतच असे काही नाही.   सोपे तसेच सहज आकलन होणारे शब्द वापरूनही आपण आपल्या भाषेत आपले विचार मांडू शकतो व संवादाचा परिणाम साधू शकतो.  महाराष्ट्रात स्थायिक असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस मराठी आलीच पाहिजे.  आपल्या मराठीची शान आपणच राखू शकतो व ते आपले प्रथम कर्तव्य आहे.  

मिलिंद कल्याणकर
नेरुळ,नवी मुंबईdershan55@gmail.com९८१९१५५३१८

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!