Let's celebrate Independence Day ... | Aaplaa Vyaaspith news

Friday, December 13, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

असा साजरा करू स्वातंत्र्यदिन…

असा साजरा करू स्वातंत्र्यदिन…

गेल्या आठवड्यामध्ये सलग पाच-सहा दिवस पडलेल्या संततधार अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे, लाखो लोक बेघर झाले आहेत, आयुष्यभर काटकसरीने काडी काडी जमा करून उभा केलेला संसार, घर या पूराने कवडीमोल केले आहे, उध्वस्त केले आहे. शेतामधील नुकतेच उगवून आलेले पीक जाऊन तिथे पूराने वाहून आलेला कचरा, गाळ साचला आहे, काहीजण गोठ्यातील आपल्या लेकरांप्रमाणे सांभाळलेल्या गुरावासरांसाठी पूरातच घरी जीव मुठीत घेऊन थांबले होते तर  गोठ्यातील जनावारांचा जीव वाचविण्यासाठी दावी कापलेली जनावरे आज किती जीवंत आहेत आणि कुठे आहेत हेही माहीत नाही. शहरातील रस्ते नद्या झाल्या, घरे, दुकाने यामध्ये पाणी शिरून सर्वांचेच आर्थिक नुकसान झाले. वर्षभराचे धन-धान्य पूराच्या पाण्यात भिजून खराब झाले. सगळीकडे पावसाने, पूराने थैमान घालत असताना प्रशासनाने धाव घेत बरीच पूरस्थिती वेळीच चांगल्याप्रकारे हाताळली आहे. यापेक्षाही गंभीर परिणाम निर्माण झाले असते परंतु नागरीक, प्रशासनाने लष्कराची मदत घेत ती वेळ येऊ दिली नाही. जात, पात, धर्म न पाहता माणूसकीचे दर्शन घडवत एकमेकांना मदत करीत आहेत. 

     हे चित्र पाहिले की अभिमान वाटतो. ७२ वर्षे झाली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पण आजही आपल्या देशात नेहमीच दोन उभे गट पडलेले दिसतात. एक शासन कर्त्यांचा तर दुसरा विरोधकांचा. स्वातंत्र्यापूर्वीही दोन गट होतेच त्यातील एक शासनकर्ते इंग्रज हे परकीय होते आणि त्यांच्याविरूध्द, त्यांच्या अन्यायाविरूध्द लढण्यासाठी दुसरा गट होता तो भारतीयांचा, क्रांतिकारकांचा, देशप्रेमींचा. ब्रिटिश सरकार अन्याय, अमानुष अत्याचार जनतेवर करीत होते. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, या गुलामगिरीतून भारतातील जनतेला मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारक ब्रिटिश सरकारपुढे उभे ठाकले. क्रांती करीत, आंदोलने करीत, निकराने लढा देत,  आपल्या प्राणांची आहुती देत आपल्या देशाला या ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून सोडविले आणि १५ ऑगस्ट, १९४७ रोजी आपला देश स्वतंत्र झाला आणि वेगळीच दुफळी देशात तयार झाली पण ती खरेतर फक्त सत्तेच्या निवडणुकीसाठी असायला हवी होती आणि नंतर एकजुटीने एकमेकांना सहाय्य करीत एकत्र आपल्या देशाच्या विकासासाठी कार्य करणे, देशांवर आलेल्या बाहेरील संकटाला, देशांतर्गत आलेल्या नैसर्गिक आपत्तींना एकत्र सामोरे जाणे अपेक्षित होते जसे जगातील काही प्रगत राष्टांत होते. परंतु आपल्या देशात असे न होता हे दोन गट कायमचेच एकमेकांविरूध्द मांडी ठोकून सदैव तयार असतात. 

     जर शेजारील देशाने आपली कुरापत काढली तरी विरोधक शासन कर्त्यांना सहाय्य करत, जनतेच्या रक्षणासाठी, देशाच्या रक्षणासाठी एकत्र येऊन विचार विनिमय करून या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न न करता शासनकर्ते, कसे या प्रसंगास सामना करण्यास अपात्र आहेत, लायक नाहीत, हे सिध्द करण्यात आपले कर्तव्य समजतात. नैसर्गिक आपत्ती ओढविली तरी आपत्तीग्रस्तांची मदत करणे फक्त शासन कर्त्यांचेच कसे कर्तव्य आहे हे मिडियासमोर बोलत, सांगत सुटतात. अशावेळी आपल्याला शक्य तेव्हढी मदत करणे हे माणूसकीचे लक्षण आहे पण तीही हे लोक करीत नाहीत. अशावेळी प्रथम एकमेकांच्या मदतीला धावून जातो तो सामान्य माणूसच, हेच खरे माणूसकीचे दर्शन पावलापावलावर अशावेळी दिसते आणि या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थितीतही हेच चित्र पहावयास मिळाले. 

     आज अनेक गावे या पूरात पाण्याखाली गेली आहेत, घर, मंदिरे, पुरातनवास्तू, शाळा, दवाखाने, कार्यालये, वाचनालये, प्रार्थना स्थळे यांची पैशात न मोजता येणारी हानी झालेली आहे. काही पूरग्रस्तांनी आपली जवळची माणसे गमावली, पोटच्या पोरासारखी पालन केलेली गोठ्यातील गुरे गमावली, आर्थिक नुकसान झाले पण तरीही त्याही परिस्थितीत धीर एकवटून एकमेकांना आधार देत, मुलालेकरांना सांभाळत आपल्यातीलच अर्धा घास शेजारच्याला देत एकमेकांना मदत करीत आहेत. हाच आपला खरा भारत, हीच आपली भारतीय संस्कृती. भारतीय लष्कर 24 तास पूरग्रस्तांची मदत करीत आहेत, त्यांना बोटीतून सुरक्षित स्थानी हलवीले आहे, अन्न-धान्य पुरवीत होते, पोलीस यंत्रणा आपले कार्य अविरत करीत होती, हीच मानवता आणि हाच देशाचा खरा धर्म.

     याच पावसातील एक चित्रिकरण मोबाईलवर पहाण्यात आले आणि मन ३०-३५ वर्षे नकळत मागे गेले. कागल येथील आमचे विद्यालय ज्या राजवाड्याच्या इमारतीत होते त्या वाड्याचा काही भाग या पावसात कोसळला. ते पाहून एक कळ हृदयात उमटली, शाळेतील ते दिवस झर्रकन डोळ्यांसमोर आले, पटांगणावरील खेळ, रोजची प्रार्थना आणि सगळ्यात आठवणीतील क्षण म्हणजे झेंडावंदन…. स्वातंत्र्य दिनाचे आणि प्रजासत्ताक दिनाचे. हे आठवून नकळत विचार मनात आला. यावर्षी या पूरग्रस्त गावातील शाळांचे असेच नुकसान झाले असेल, आता या मुलांची शाळा कुठे आणि कशी भरेल, वह्या पुस्तके सगळं सगळं वाहून गेले असणार, काय असेल या मुलांचे आता भविष्य, उद्यावर आलेला स्वातंत्र्य दिन कसा साजरा करतील? पण पुन्हा मनात विओआर आला या नैसर्गिक आपत्तीच्यावेळी आपल्या बांधवांना, भगिनींना राजकारण न साधता, स्वार्थ न पाहता निर्हेतूक, निर्लेप, स्वच्छ मनाने जमेल तेव्हढी,  जमेल तशी मदत करणे म्हणजेच आपल्या या तिरंग्याला मानवंदना दिल्याप्रमाणेच आहे, हा स्वातंत्र्य दिन खर्‍या अर्थाने साजरा केल्यासारखा आहे….जयहिंद. 

@ ज्योती हलगेकर जाधव, 

कोपरखैरणे, नवी मुंबई. 

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts