Let me live as a man! | Aaplaa Vyaaspith news

Sunday, December 15, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

मला माणूस म्हणून जगू द्या!

  मानवता हाच खरा धर्म असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सांगितलेले आहे. माणूस द्या मज माणूस द्या अशी आर्त विनवणी राष्ट्रसंतांनी केलेली आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असे साने गुरूजींनी म्हटलेले आहे.ज्या देशात जन्माला येता किंवा राहता त्या देशाशी प्रामाणिक राहून आपले निजी कर्तव्य पार पाडणे हाच खरा राष्ट्रधर्म. मनुष्य जन्माला येतो तेंव्हा तो विशिष्ट देशात जन्माला येतो. मानवाला मानव म्हणून संबोधने हीच आजची खरी गरज. जन्मताच जात लावणे हीच भारतीय परंपरा. यास सरकारची मान्यता मिळने ही सरकारची घोडचुक किंवा अपरिहार्यता. जुने जाऊ द्या मरनालागूनी, जाळून किंवा पुरून टाका असे कवी केशव सुत कृष्णाजी केशव दामले यांनी म्हटलेले आहे. याचा विचार करण्याची वेळ आज आपल्यावर आलेली आहे.आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनि मज द्यावे पसायदान हे. अवघाचि संसार सुखाचा करीन,आनंदें भरीन तिन्ही लोक असे संत ज्ञानेश्वरांनी म्हटलेले आहे.
               माणसाला माणसासारखी वागणूक देने ही सहजता. माणसाला जात, धर्म व पक्ष पाहून वागणूक देने हा झाला मानवी दोष. या दोषांचे निरसन करणे हीच खरी माणुसकी व मानवता. आज जातीधर्माच्या भिंती तोडण्याचे काम कुणीही करीत नाहीत. आपली जात अजून कशी घट्ट होईल आणि एकगठ्ठा मतांमध्ये याचे रूपांतर कसे होईल याकडे लक्ष पुरविण्यात आम्ही स्वतःला धन्य समजत असू तर यासारखे दुर्देव नाही. माणूस म्हणून स्वतःला आम्ही सिध्द करू शकण्यात कुठेतरी कमी पडलेलो आहोत. संत,महात्मे यांचे सांगणें कुणीही मनावर घेत नाहीत. थोर मंडळींना, संतांना आपल्या सोईनुसार वापरून घेणे हीच आपली आजची गरज झालेली आहे. मला माणूस म्हणून स्वाभिमानाने जगू द्या आणि माझ्या जातीचा उल्लेख सरकारी दस्तावेजातून काढून टाका अशी मागणी कुणीही करीत नाहीत. सामाजिक दबाव यास कारणीभूत असून तो झिडकारण्याचे धाडस आजतरी कुणीही करीत नाहीत.
                माणूस म्हणून जगणे आज कठीण झालेले आहे. मनुष्य प्राणी हा बुध्दीजीवी असून सुद्धा मानवाच्या कल्याणासाठी तो आपली बुध्दी वापरत नसून स्वहित जपण्यातच तो आपले संपूर्ण सामर्थ्य खर्च करीत आहे. जात, धर्म व भाषा यांचे सामर्थ्य आजही भिषण रूप धारण करून आहेत. मंदिर प्रवेशावरून आजही वादंग माजतो आहे. महिलेला आजही मंदिर, मस्जिद मध्ये प्रवेश नाकारला जातो आहे. मग माणूस म्हणून आपले सरकार दरबारी काय स्थान आहे याची शहानिशा करण्याची वेळ आज आपल्यावर आलेली आहे. धर्म ही अफूची गोळी आहे असे म्हणून धर्माची भलावण करणे आजही चालूच आहे. धार्मिक कट्टरतेत वाढच झालेली दिसून येते आहे. आरक्षणाच्या नावाने जातीचे बंधन हे अजून घट्टच होवू पहात आहे. आजही आपले खाण्याचे व दाखविण्याचे दात हे वेगवेगळे आहेत. माणूस म्हणुन जगणे हे आम्हांला आजही मान्य नाही. माणूस द्या मज माणूस द्या ही भीक मागता प्रभू दिसला अशी म्हणण्याची वेळ राष्ट्रसंतांवर कां आली याचा विचार करणे भाग पडलेले आहे.
@ मिलिंद गड्डमवार, राजुरा
     भ्र.क्र. ९५११२१५२००

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts