
भारताची घटना धर्म निरपेक्षवादी असल्यामुळे भारतात अनेक जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदत असतात. प्रत्येक धर्मात त्या त्या धर्मातील विविध सणांना अनन्य साधारण महत्व आहे. प्रत्येक धर्माचे सण त्या त्या धर्मातील लोक त्यांच्या रीती-रिवाजाप्रमाणे साजरा करीत असतात. धर्मातील प्रत्येक जण आपल्या आर्थिक कुवतीनुसार सण साजरा करीत असतो. सण साजरा करतांना आर्थिक उच-निचता या गोष्टीचा प्रभाव जाणवतो. धार्मिक सण साजरा करतांना त्या त्या धर्मातील विविध वयोगटातील लोक एकत्र येऊन त्या सणांचा आनंद घेतांना आपण पाहतो. इथे वयाचा विचार न करता सणांचा आंनद लुटला जातो. आपला भारत देश हा “धर्मनिरपेक्ष” देश असल्यामुळे कोणत्याही एका धर्माचा सण असेल तर बाकीच्या धर्मातील लोकही त्यांना शुभेच्छा देतात. एव्हढेच नाही तर सण साजरा करण्याच्या आनंदात सहर्ष सहभागी होतात. प्रत्येक धर्मातील प्रत्येक सणाच्या आनंद सोहोळ्याची परंपरा पुढे चालविण्यासाठी प्रत्येकजण आपल्या लहान मुलाची / मुलींची तसेच तरूण / तरूणींची तयारी करून घेत असतो, त्याला / तिला मार्गदर्शन करीत असतो. कुटुंबातील अनुभवी / वयस्कर व्यक्तींची अशी अपेक्षा असते की आपल्या नंतर आपल्या मुलाने / मुलीने आपल्या सणांची परंपरा सुरु ठेवावी. ते नवीन पिढीला शिकवीत तर असतातच पण त्यांची अपेक्षा असते की बारकाईने लक्ष देऊन तरूण वर्गांनी आपले सण समारंभ साजरे करण्याची पद्धत तसेच रीती-रिवाज, परंपरा आत्मसात करून घ्यावेत.
साहजिकच या आनंद सोहोळ्यात तरूण वर्गाचा सर्वंकष पुढाकार असतो व तो असणे ही गरज आहे. वयस्कर व अनुभवी वडीलधाऱ्या मंडळींकडून तरूण वर्ग सणांच्या आनंद सोहळ्याची माहिती करून घेतो व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आनंद सोहोळ्याला मूर्त रूप देत असतो. या अश्या आनंद सोहोळ्याच्या परंपरेची पताका पुढील पिढीने घ्यावी अशी अपेक्षा मागील पिढीची असते. असे म्हणतात की प्रत्येक पिढी ही मागच्या पिढीपेक्षा दोन पावले पुढे असते. त्याचप्रमाणे जसजसा काळ बदलतो त्याचबरोबर आधुनिक होत जातो तसतसे सणांचे आनंद सोहळे परंपरेप्रमाणे, प्रथेप्रमाणे तसेच रीती-रिवाजाप्रमाणे साजरे केले जातात आणि त्याचबरोबर त्याच्या जोडीला आधुनिक काळाच्या विकसित झालेल्या तंत्रज्ञानाची मदत घेऊन व त्याचा उपयोग करून घेऊन हा आनंद सोहळा सुलभ रीतीने पार पाडण्यासाठी केला जातो. मागच्या पिढीने पुढच्या पिढीला जर नीट मार्गदर्शन केले तरच तरुण पिढी त्यावर कटाक्षाने लक्ष तर देईलच पण आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून तो सोहळा अधिक चांगल्या रीतीने कसा साजरा करता येईल याकडेही लक्ष दिले जाते. दोन्ही पिढीत विचारांची मतभिन्नता असतेच. पुढच्या पिढीबद्दल जर अविश्वासच दाखविला तर पुढची पिढी या सर्व रीती-रिवाजांबद्दल अनभिज्ञ राहण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. आजचा तरूण काही बाबतीत बेपर्वा असेल, अनभिज्ञ असेलही पण बेजबाबदार नक्की नाही. आजच्या तरूण पिढीला त्यांच्या कुवतीची पूर्ण कल्पना आहे.
आपण जेव्हा भारतीय सणांबद्दल बोलतो तेव्हा ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती ही की तरूण पिढी खरोखरच सण मनापासून साजरा तर करतातच पण त्याचबरोबर त्या सणांचा आनंदही पुरेपूर घेतात. सण साजरा करतांना पारंपारिकतेचे भान ठेऊन त्याला आधुनिकतेची जोड ही देण्याच्या प्रयत्नात असतात. याचे एक छान उदाहरण म्हणजे हिंदू पंचांगाप्रमाणे वर्षारंभाचा सण चैत्री पाडवा म्हणजेच “गुढी पाडवा”. एक दशकापेक्षा जास्त काळ या सणाच्या दिवशी नूतन वर्षाच्या स्वागतानिमित्त ठिकठिकाणी “स्वागत यात्रेचे” आयोजन केले जाते. या स्वागत यात्रेत साहजिकच तरूण वर्गाचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. ही तरूण मंडळी घरच्या गुढीची पारंपारिक पद्धतीने पूजा करून व्यवस्थित तयार होऊन परिसरातील प्रसिद्ध मंदिरात जमा होतात व श्रद्धा भावनेने देवाचे दर्शन घेऊन स्वागत यात्रेकरिता सज्ज होतात. पारंपारिक वेष परिधान केले तरूण / तरूणी स्वागत यात्रेची शोभा अधिकच वाढवितात. धोतर, कोट, टोपी घातलेले तरूण तसेच नऊवारी साडी नेसून नथ व इतर दागिन्याने सजलेल्या तरूणी जेव्हा मोटर बाईक वरून स्वागत यात्रेत सामील होतात तेव्हा त्या यात्रेत पारंपारिकता आणि आधुनिकतेचा मेळ जमल्याचे आगळे दृश्य पहायला मिळते. या यात्रेत उंच गुढी हे आकर्षण तर असतेच पण त्याच बरोबर आपला सण ही जाणीव असलेले तरूण / तरूणी डोक्याला शेंदरी रंगाचा फेटा बांधून लेझीम खेळत असतात व त्याचबरोबर मनापासून आनंद घेऊन वाजवणारे तरूण / तरूणींचे ढोल पथक ही असते. सर्वात मुख्य म्हणजे या स्वागत यात्रेची तयारी आजचा तरूण वर्ग कित्येक दिवस आधीपासून समरसून करीत असतो. त्यानंतर अजून एक महत्वाचा सण म्हणजे दहीहंडी चा सण. गेल्या दोन दशकांपासून उंचच उंच हंड्या बांधण्याची चढाओढ लागलेली आहे. साहजिकच दहीहंडी च्या परंपरेप्रमाणे मानवी मनोरा रचून हंडी फोडणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळेच सर्वात वर चढणाऱ्या मुलाला / मुलीला डोक्यावर “हेल्मेट” घालण्याची सक्ती करतात आणि त्याचबरोबर त्याचा / तिचा विमाही उतरविला जातो. याच्या आधी असे कधीच झाले नसेल. मला वाटते हा विचार म्हणजे पारंपारिकतेला दिलेली आधुनिकतेची जोड आहे. होलिकोत्सव या सणाबद्दल ही असे सांगता येईल की होळीत लागणाऱ्या लाकडांकरिता बेसुमार वृक्षतोड केली जाते व पर्यायाने पर्यावरणाचा नाश होण्याचे संकट समोर उभे राहते. वृक्षतोड थांबविण्यासाठी तसेच पर्यावरणाच्या रक्षणाचा विचार करून “एक गाव एक होळी” ही संकल्पना लोकांच्या मनात रुजविणारी ही तरूण पिढीचं आहे हे ही लक्षात घेतले पाहिजे. तसेच दिवाळी या महत्वाच्या सणाचेही म्हणता येईल. फटाके वाजवितांना धुरामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी व पर्यायाने पर्यावरणाच्या ऱ्हास थांबविण्यासाठी फटाके वाजविण्याचे प्रमाण कमी करावे असे आवाहन या तरुण पिढीनेच केले आहे. धुराबरोबरच आवाजामुळेही पर्यावरणाला धोका पोहोचतो या विचाराचा पाठपुरावा करण्याचे काम या तरूण पिढीनेच केले आहे. या आवाजाचा त्रास पशू पक्ष्यांना ही जास्त प्रमाणात होतो. आवाज सहन न झाल्यामुळे ते भयभीत होऊन पक्षी आकाशात भरकटत जातात तर पशू वाट फुटेल तिकडे सैरावैरा पळत सुटतात. त्यामुळे अपघात होऊन जीव गमावतात अथवा कायमचे अपंग होतात. आवाजामुळे कानाचे पडदे फाटून कायमचे बहिरे होतात तर धूर नाकातोंडात गेल्यामुळे पशूंप्रमाणे पक्षीही जीवाला मुकतात. काही तरुण मंडळींनी तर फटाकेच वाजवणे कधीच सोडून दिले आहे व ते या आपत्तीत सापडलेल्या पशू-पक्ष्यांची शुश्रूषा करण्यात धन्यता मानीत आहेत. मकर संक्रांतीच्या दिवशी रंगीबेरंगी पतंग उडविण्यासाठी धारदार मांजा वापरू नये असे आवाहन या तरुण वर्गानेच केले होते. धारदार मांज्यामुळे पक्षी जखमी होतात हा विचार डोळ्यासमोर ठेवूनच असा विचार त्यांच्या मनात आला असेल. हे ही लक्षात घेण्यासारखे आहे की नागपंचमी या सणाचाही जरा वेगळा विचार या तरूण पिढीने केला आहे. जंगलातून साप पकडून आणून आणि नागपंचमी या सणाच्या दिवशी त्या सापांचे हाल करून पैसे कमविण्याचा धंदा शहरी भागांत फार मोठ्या प्रमाणावर होत असे. पण त्या सापांच्या होणाऱ्या हालाला वाचा फोडली ती तरूणांनीच. त्याचे परिणाम म्हणजे अश्या तथाकथित गारूडी मंडळींचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे.
गणेश उत्सवाच्या काळात तर एक वेगळीच परंपरा तरूण वर्गाच्या मनावर बिंबविले जात आहे. तरूण वर्गानेही ही परंपरा उचलून धरली आहे. गणेश उत्सवाच्या विसर्जन सोहोळ्यात मोठी मिरवणूक काढून वाजत गाजत गणपतीची मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाते. काही विसर्जन सोहोळ्याचा मिरवणुकी दरम्यान मिरवणूक ज्या “मशिदी” वरून जात असेल तर मशिदीतर्फे गणपतीच्या मूर्तीची यथासांग व मनोभावे पूजा केली जाते. हा परिपाठ गेले कित्येक वर्षे सुरू आहे. यामुळे हिंदू-मुस्लिम यांच्यातील ऐक्य / सलोखा वाढण्यास मदत होते. यापासून प्रेरणा घेऊन काही मुस्लिम धर्मीय देखील गणपतीच्या मूर्तीची स्थापना करून गणेश उत्सव आनंदात साजरा करीत आहेत.
अर्थात सर्व तरूण काही अशा विचारांचे नसतात. “उडदामाजी काळे गोरे” या उक्तीप्रमाणे विरुद्ध विचारांचेही असतात. पण जास्तीत जास्त प्रमाणात तरूण वर्ग पर्यावरणाचा तोल बिघडू नये या विचारसरणीचे आहेत. या सगळ्या होणाऱ्या हानीचा विचार करणारा व त्यावर मार्ग शोधून काढणारा तरूण वर्गच आहे. आजचा तरूण वर्ग मौज मजा करीत असला तरी अथवा त्यांची वागण्याची रीत आधीच्या पिढीपेक्षा वेगळी असली तरी आजची तरूण पिढी बेजबाबदार आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. सणांच्या जल्लोषात / आनंदोत्सवात याचा प्रत्यय आपण सर्व जण घेत असतो.
@ मिलिंद कल्याणकर
एन. एल. ६, ४/४,
हॉटेल साईबाबा समोर,
सेक्टर – १०,
नेरुळ, नवी मुंबई – ४०० ७०६.
भ्र. क्र. ९८१९१ ५५३१८