I am speaking tricolor | Aaplaa Vyaaspith news

Friday, August 23, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

मी तिरंगा बोलतोय

मी तिरंगा बोलतोय

स्वतंत्र भारत देशाचा “मी तिरंगा” बोलतोय. आज मला माझ्या मनातले तुमच्याशी मोकळेपणी बोलायचे आहे.  तसे पाहता मी म्हणजे भारत देशाची आन, बान तसेच शान आहे.  भारतीय माझा आदर ही करतात.  प्रथम  “पंडित जवाहरलाल नेहरू” यांनी २६ जानेवारी १९३० रोजी “लाहोर” अधिवेशनात तिरंगा फडकावून “पूर्ण स्वराज्य” ही घोषणा केली होती.  त्यानंतर दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले व त्याचबरोबर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून  “पंडित जवाहरलाल नेहरू” यांनी पदग्रहण केलेले  या घटनेची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिनांक “भारतीय राज्यघटना” अमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. नुकतेच स्वातंत्र्य मिळालेल्या “भारत” देशाने २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना म्हणजेच “संविधान” अमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली.  त्यामुळेच १५ ऑगस्ट तसेच २६ जानेवारी या दोन दिनांकांना माझ्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्व आहे. 

१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्याला ७१ वर्षे झाली. स्वातंत्र्याचे प्रतीक जो तिरंगा म्हणजे मी आकाशात डौलात डोलावा म्हणून असंख्य स्वातंत्र्य वीरांनी आपल्या प्राणांचीही तसेच कुटुंबाची पर्वा न करता देशप्रेमाने झपाटून जाऊन निकराचा लढा दिला.  स्वातंत्र्य संग्रामात होरपळलेली पिढी आज अस्तगत होण्याच्या मार्गावर आहे. स्वातंत्र्य लढ्यात स्वत:ला झोकून देणारी व देशप्रेमासाठी खस्ता खाणारी त्यावेळची तरुण पिढी आज जवळ जवळ ८५ ते ९० वर्षांची असेल.  माझा अपमान होऊ नये म्हणून तसेच संपूर्ण स्वातंत्र्यासाठी शीर तळहातावर घेऊन स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेल्या स्वातंत्र्य वीरांचा जाज्वल्य अभिमान वाटावा असे धाडसी लोकोत्तर कार्य या वीरांनी फक्त देशप्रेमापोटी व माझे अवहेलना होऊ नये म्हणून केले. माझ्यावरील अतीव प्रेमापोटी या लढ्यात सर्वजणांनी तळमळीने व स्वतंत्र भारताचे स्वप्न साकारण्यासाठी घर-दार, नातेवाईक, माता-पिता, बायको-मुले यांना सोडून फक्त स्वातंत्र्य प्राप्तीचा ध्यास घेऊन या धगधगत्या अग्निकुंडात उडी घेतली होती   स्वातंत्र्य प्राप्तीचे स्वप्न उराशी बाळगून ज्यांनी तुरुंगवास भोगला, शारीरिक-मानसिक छळाची परिसीमा ज्यांनी सहन केली, माणुसकीला लाजवितील असा क्रूर व अनन्वित छळ ज्यांनी निधड्या छातीने सहन केला, कित्येक स्वातंत्र्यवीरांनी छातीवर गोळ्या तर झेलल्याच पण त्याचबरोबर कित्येक स्वातंत्र्यवीरांनी “वंदे मातरम” चा घोष करीत हसत हसत फासावर चढले अशा सर्व स्वातंत्र्य वीरांचे स्मरण करून त्यांना मानवंदना देणे हे सर्व भारतीयांचे प्रथम कर्तव्य आहे. हे सर्व का तर तिरंगा आकाशात मानाने फडफडावा म्हणून.  तिरंग्याकडे म्हणजेच माझ्याकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहू नये अथवा माझी हेटाळणी करू नये या करिताच भारतीय तिन्ही सैन्य दलातील अधिकारी व जवानांनी रात्रंदिवस डोळ्यांत तेल घालून भारताचे रक्षण केले व करीत आहेत.  स्वातंत्र्य संग्रामात ज्यांनी आपल्या सर्वस्वाची होळी केली व आपले प्राण स्वातंत्र्यासाठी खर्ची घातले त्या वीरांना व विरागनांना कोटी कोटी प्रणाम. त्यांच्याचमुळे भारताला  स्वातंत्र्याची गोडी चाखता आली. सियाचीन/द्रास सारख्या अति बर्फाळ प्रदेश असो अथवा रखरखीत वाळवंट असो किंवा घनदाट जंगल असो किंवा जवळ जवळ ७,५१७ किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्र किनारा असो, आपले जवान अहोरात्र डोळ्यात तेल घालून आपल्या सीमेवर पहारा करत असल्यामुळे तुम्ही सगळे येथे सुखाने व शांततेने राहू शकता. १९६२ चा चीनने केलेला हल्ला, १९६५ व  १९७१ तसेच १९९९ मध्ये सियाचीन येथे पाकिस्तानने केलेला हल्ला माझ्यावरील प्रेमाखातरच आपल्या रणझुंजार लढवय्यांनी परतवून लावला. 
पण आता मन निराशेकडे झुकू लागले आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या सगळ्या गोष्टींकडे / स्वातंत्र्य प्राप्तीकरिता असंख्य स्वातंत्र्यवीरांच्या आत्मसमर्पणाकडे / बलिदानाकडे युवा पिढी किती गंभीरपणे पाहते याची शहानिशा करणे जास्त गरजेचे आहे.  आजच्या युवा पिढीच्या खांद्यावरच उद्याच्या भारताची भिस्त आहे.   या तिरंग्याचे रक्षण करणे व तिरंगा मानाने कसा फडफडत राहील याची काळजी घेण्याचे काम या युवा पिढीवरच आहे.  जगभरात भारताला प्रगती पथावर नेणारे कोण असतील तर ते आहेत आजच्या युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणारे युवक. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात स्वातंत्र्य वीरांनी केलेले आत्मबलिदान नक्कीच स्फूर्ती देणारे आहे यात शंका नाही. पण त्याचा गंभीरतेने विचार केला जातो का हे पाहणे गरजेच आहे. तरुण पिढीतील कित्येक तरुण प्रतिनिधींना स्वातंत्र्य प्राप्तीसाठी “वंदे मातरम” च्या घोषात हसत हसत फासावर गेलेला “भगतसिंग” माहीत नसेल पण लाखो रुपये घेऊन अजय देवगणने पडद्यावर साकारलेला “भगतसिंग” जास्त जवळचा वाटत असेल. तसेच “रंग दे बसंती” मधील अमीर खान या नटाबद्दल ही म्हणता येईल.  कमीत कमी १५ ऑगस्ट व २६ जानेवारी या दोन दिवशी तरी त्यांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली देणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. पण ही भावना आजच्या तरुण पिढीत कमी प्रमाणात जाणविते. स्वतंत्र भारताचा तिरंगी झेंडा ही प्रत्येक भारतीयाची अस्मिता आहे.  स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ज्यांनी ज्यांनी म्हणून आपला देह ठेवला, आपले रक्त सांडले त्याचे प्रतीक हा तिरंगी झेंडा आहे. त्याला वंदन करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. पण युवा पिढीतील किती जण हे कर्तव्य मनापासून पार पाडतात याची नोंद घेणे गरजेचे आहे.  १५ ऑगस्ट व २६ जानेवारी ह्या दोन दिवसाकडे केवळ सुट्टी म्हणून पाहिले जाते. या दोन तारखांपैकी स्वातंत्र्य दिन कोणता याबद्दल ही काही तरुणांमध्ये संभ्रम आहे.  एका झेंडावंदनाच्या कार्यक्रमात युवा पिढीच्या एका प्रतिनिधीने माझ्या संदर्भात दिलेले उत्तर ऐकून कोणालाही झीट येईल.  त्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने उत्तर दिले होते की १५ ऑगस्ट हा पहिला स्वातंत्र्य दिन व २६ जानेवारी हा दुसरा स्वातंत्र्य दिन.  हे असे जर उत्तर आले तर भारताचे भवितव्य काय हा प्रश्न पडतो. त्याच कार्यक्रमात अजून एका विद्यार्थ्याचे उत्तर मी माझ्या कानाने ऐकले तेव्हा तर मला खूप क्लेश झाले.   तो महाभाग म्हणाला की या दोन दिवसाचे महत्व आम्हाला माहित नाही पण हे दोन दिवस धमाल करावयास सार्वत्रिक रजेचे असतात एवढे आम्हाला माहित आहे.  हे दोन दिवस आम्ही सिनेमा बघतो, हॉटेलात जाऊन जेवतो व भरपूर मौज मजा करून घरी येतो.  कधी कधी सहलीला देखील जातो. झेंडा वंदन हा सोहळा त्यांच्या खिजगणतीतही नसतो. 
संपत्तीची/पैश्याची परिपक्वता यायच्या आधीच आजच्या युवा पिढीच्या हातात भरपूर पैसा खेळू लागला आहे. त्यामुळे खर्च करण्याच्या बाबतीत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे रजा मिळाली की मौज मजा करण्याकडे यांचा काळ असतो. त्याचे साहजिकच झेंडा वंदन या राष्ट्रीय सोहळ्याचा त्यांना विसर पडतो. जर १५ ऑगस्टच्या पुढे मागे लागून रजा आल्या तर ही मंडळी झेंडा वंदन या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष करून सहलीलाही जाण्यास मागे पुढे बघत नाहीत. “अरे छोड दो झेंडा वंदन, चल हम पिकनिक मनायेंगे” अशा सारखी वाक्ये ऐकली की तळपायाची आग मस्तकात जाते. याचकरिता का स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आत्मसमर्पण केले होते.  हा विचार मनात येऊन मन विषण्ण होते.   यातील काही विवाहित तरूण जोडपी आपल्या मुलांना महागडे झेंडे विकत घेऊन देतात पण त्या झेंड्यामागे लाखो क्रांतिवीरांनी केलेले आत्मबलिदान याची जाणीव त्या मुलांना करून देण्यात अपयशी ठरतात. यामुळे या झेंड्याचे महत्व मुलांना कधीच कळत नाही व त्यांच्या हातून नकळतपणे झेंड्याचा अपमान होतो. झेंडा वंदन सोहळा झाल्यावर काही वेळातच हे झेंडे मुलांच्या हातून खाली पडलेले दिसतात. हे पाहून मनाचा संताप होतो व शरमही वाटते.  सर्वच सरकारी कार्यालयात त्या दोन्ही दिवशी झेंडा वंदन होते.  काही कार्यालयात ते अगदी संचलनासकट सर्व पद्धतशीर होते. तबला पेटी सह राष्ट्रगीत म्हटले जाते. हे राष्ट्रगीत म्हणतांना असे म्हणतात की या झेंडा वंदन  सोहळ्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही.  आमचे काम राष्ट्रगीत म्हणण्याचे आहे ते आम्ही म्हटले आता आम्ही चाललो.  त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे यातील काही कार्यालयात झेंडा वंदनाला असलेली उपस्थिती.  या सोहळ्याला उपस्थिती.जेमतेम ४ ते ५ टक्के असते. काही कार्यालयात तसेच काही संस्थांमध्ये उपस्थित राहण्यासाठी जबरदस्ती केली जाते अथवा न आल्यास “कारणे दाखवा” असा फतवा काढला जातो. अशावेळेस ही मंडळी सोसायटीमध्ये झालेल्या झेंडा वंदनाला आम्ही उपस्थित होतो असे पत्र कार्यालयात अथवा संस्थेत देतात. त्या पत्राचा खरेखोटेपणा किती यावर न बोललेच बरे. पण झेंड्याचे महत्व मानत नसलेल्या या “भारतीय” मंडळींकडून जुलुमाचा रामराम करून घेण्यासाठी स्वातंत्र्यवीरांनी आपले रक्त खचितच सांडले नव्हते. 
हा असा माझा होत असलेला अपमान पाहून मनाला फार यातना होतात.  पण आता परिस्थिती हळूहळू बदलू लागली आहे.  स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाचे महत्व या तरूण पिढीला जाणवू लागले आहे.  स्वातंत्र्यासाठी प्राण पणास लावून लढलेल्या तसेच स्वातंत्र्य संग्रामात प्राण गमावलेल्या वीरांबद्दलची माहिती, त्यांनी देशाकरिता केलेला त्याग इत्यादींबद्दल या नवीन पिढीला जाणून घेण्याची इच्छा मूळ धरू लागली आहे.   

@ मिलिंद कल्याणकर
नेरुळ नवी मुंबई.
भ्रमणध्वनी ९८१९१ ५५३१८

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!