शब्दांची गम्मत

शब्दांची गम्मत

प्रत्येक भाषेची आपली अशी एक भाषा शैली आहे.  भाषा शैली म्हणजे शब्दांची करामत असे म्हणायला हरकत नाही.  जरा वेगळ्या भाषेत सांगायचे म्हणजे “अभिजात शब्दांची अभिरुची संपन्न तसेच चपखल अर्थवाही कलात्मक रचना”.  प्रत्येक भाषेत असे काही शब्द असतात की ते शब्द निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या अर्थाने वापरता येतात. त्या शब्दांची किमयाच काही वेगळी असते.  त्या शब्दांचे निरनिराळे अर्थ घेऊन तसेच शब्दच्छल करून  त्यातून शाब्दिक विनोद करण्याचा प्रयत्न केला जातो.  अशा वेळेस त्या शब्दांवरील असलेली हुकूमत मदतीला येते. शाब्दिक करामती करतांना भाषेचा तोल जाणार नाही याचे भान ठेवणे खूप महत्वाचे असते. 
“हीर” म्हणजे झाडूची / खराट्याची काडी हे आपल्याला सर्वांना माहित आहेच.  काही वेळेस हा शब्द वापरून म्हटलेले वाक्य व त्या बरोबरीने डोळ्याचा कटाक्ष याचा मेळ घातला तर विचित्र अर्थ होतो.  म्हणजेच “मी तुला हिऱ्याची अंगठी करून देईन” हे वाक्य त्या झाडूकडे / खराट्याकडे पाहून म्हटले तर वेगळाच अर्थ त्यातून ध्वनित होतो.  तसाच “पण” हा ही शब्द तसा गोंधळात टाकणारा आहे.  या शब्दाची जागा बदलली की याचा अर्थ बदलतो.  जसे “पण” हा शब्द वाक्याच्या सुरुवातीला असेल तर वाक्याचा अर्थ होकारार्थी होतो पण तो वाक्याच्या शेवटी असेल तर त्याचा अर्थ नकारार्थी / प्रश्नार्थक होऊ शकतो.  “मी तुझ्याकरिता काहीतरी करीन” या वाक्याच्या सुरुवातीला “पण” हा शब्द लावला गेला तर त्याचा अर्थ होकारार्थी / सकारात्मक / आशादायक होतो.   “पण मी तुझ्याकरिता काहीतरी करीन”  या वाक्यात सकारात्मकता / आशादायकता जाणविते.  या वाक्यात काहीतरी करीन याबद्दल ठामपणा जाणवितो.  परंतु याच वाक्याच्या शेवटी “पण” हा शब्द लावला तर नकारात्मक / प्रस्नर्थक / उदासीनता असे कैक अर्थ निघू शकतात.  “मी तुझ्याकरिता काहीतरी करीन पण” या वाक्यात औदासिन्याची / नाकारात्मकतेची छटा दिसते.  
तसेच “स्वयं” हा शब्द ही वेगवेगळ्या अर्थाने वेगवेगळ्या ठिकाणी वापरला जातो. यात सुद्धा एक मजा आहे ती ही की “स्वयंसिद्ध” किंवा “स्वयंसिद्धा” म्हणजेच ज्याने / जिने सर्व तयारीनिशी स्वतःला सिद्ध केलेले आहे असा किंवा अशी तसेच  “स्वयंघोषित” म्हणजे स्वतः स्वतःलाच घोषित करणारा.  या पठडीतील अजून एक असा “स्वयंचित” हा ही एक शब्द आहे.  ही संज्ञा क्रिकेट मधील आहे.  स्वतःच स्वतःला “बाद” करवून घेणे म्हणजेच बॅट / हात यष्टीला लागणे, बॉलला हात लागणे इत्यादी.   पण “स्वयंवर” यात थोडीशी मेख आहे. “स्वयंवर” तर घोषित केले जाते.  स्वयंवराचा अर्थ एखादे “पण” लावलेले कार्य पूर्ण करणे व ते केल्यावर स्वयंवर जिच्यावतीने घोषित केले आहे ती कन्या ज्याने “पण” पूर्ण केला आहे त्याला “वर” म्हणून स्वीकार करणार.  याचाच अर्थ ती कन्या स्वतःला आवडलेल्या व्यक्तीला “वर” म्हणून निवडत नाही तर जो कोणी तिने लावलेला “पण” पूर्ण करेल त्यालाच ती वर म्हणून स्वीकार करेल.  त्यात तिच्या आवडीचा प्रश्न अलाहिदा असतो असो.  “स्वयंचलित” तसेच “स्वयंघोषित” या शब्दांप्रमाणे “स्वयंवर” म्हणजे स्वतःने निवडायचा वर असा अर्थ इथे निघायला पाहिजे होता पण इकडे वेगळाच अर्थ निघतो.  स्वतःहून सेवा करणाऱ्याला “स्वयंसेवक” म्हणतात. “स्वयं” ने सुरु होणाऱ्या शब्दांमध्ये त्या शब्दातच तो अर्थ चपखल बसलेला असतो पण मग प्रश्न पडतो की “स्वयंवर” या शब्दामागील अर्थ वेगळा कसा निघतो.  ती  स्वतः फक्त “पण” अथवा “कार्य” निवडते पण वर निवडण्याचा अधिकार तिला नसून तो “पण / कार्य” यशस्वी करणाऱ्याला तिला “वर” म्हणून निवडावेच लागते.   
असाच अजून एक वेगळा शब्द म्हणजे “उप”.  याचा सरळ सरळ अर्थ आहे.  “सह” किंवा “मदतनीस” किंवा “सहाय्यक”.  चित्रपटात नायक उपनायक असतात, नायिका उपनायिका असतात, संगीतकार सहाय्यक संगीतकार असतात इत्यादी.   इथे “उप” चा अर्थ सहाय्यक असाघेतला आहे.   कार्यालयात व्यवस्थापक उपव्यवस्थापक असतात,  संस्थेत अध्यक्ष उपाध्यक्ष असतात. खेळात कर्णधार उपकर्णधार असतात, आयुक्त उपायुक्त असतात इत्यादी.   या ठिकाणी “उप” या शब्दाचा अर्थ “सहाय्यक” किंवा “मदतनीस” घेतात.  काही वेळेस अध्यक्ष, व्यवस्थापक, कर्णधार, आयुक्त इत्यादी वेळेवर आले / उपलब्ध नसतील तर हे “उप” त्यांची भूमिका तेव्हढयापुरती पार पडतात.  आणखी काही “उप” या दोन अक्षरी शब्दाने सुरु होणारे शब्द आहेत पण त्याचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे.  असे खूप शब्द आहेत त्यात “उप” याचा अर्थ “सहाय्यक” किंवा “मदतनीस होत नाही.   उपचार म्हणजे चारचा मदतनीस / सहाय्यक नक्कीच नाही.  उपचार यामध्ये औषधोपचार आहे,  वागण्यातील सभ्यता आहे,  पूजेतील षडोपचार आहे,  उपचाराचा उपप्रकार म्हणजे औपचारिकता ही होऊ शकतो.   तसेच उपयोग, उपवास, उपकार, उपवर, उपदव्याप, उपखंड, उपरा, उपक्रम, उपकरण, उपग्रह, उपज, उपजत, उपटसुंभ, उपदिशा, उपनयन, उपनगर, उपायुक्त, उपलब्ध, उपरती, उपमर्द, उपसंहार, उपस्थित ईत्यादि असे अनेक शब्द “उप” ने सुरु होतात पण प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा आहे.  
“अप” हा असाच या पठडीतील शब्द आहे. “अप” ने सुरू होणार प्रत्येक शब्द वेगळा अर्थ घेऊन येतो.  “अप” ने सुरु होणाऱ्या काही शब्दातून नकारार्थी सूर जाणवितात. “अपप्रचार” म्हणजे “खोटा अथवा बदनामीकारक प्रचार”  तसेच “अपरोक्ष” म्हणजे “च्या गैरहजेरीत / च्या पाठीमागे हा आहे.  तसेच अपव्यय, अपचन, अपथ्य,  अपवाद, अपसमज, अपहार, अपकर्ष (खाली / मागे ओढणे), अपमान, अपरे (नाक)  इत्यादी “अप” ने सुरु होणारे शब्द नकारात्मक भावनावाही असतात.  “अपरिमित” / “अपरंपार” या शब्दांचा अर्थ पुष्कळ / भरपूर / रग्गड असा आहे पण त्यापुढें हानी / आनंद / संपत्ती हे शब्द लावले लगेच “अपरिमित” / “अपरंपार” या शब्दांचा अर्थ त्या लावलेल्या शब्दामागील भावनेप्रमाणे बदलतो.  “अप” ने सुरू होणारे काही शब्द म्हणजेच “अपत्य”, “अपरिहार्य” इत्यादी शब्द सोडले तर जवळ जवळ सर्व शब्द मनात नकारात्मक भावना निर्माण करतात किंवा त्याचा अर्थ नकारात्मकतेकडे झुकलेला असतो.  
मराठी भाषेत अजून एक वेगळीच गम्मत आहे.  मराठी भाषेत काही असे शब्द आहेत की त्यातील अक्षरांची अदलाबदल केली अथवा अक्षर रचना बदलली तरी एक नवीन अर्थवाही शब्द तयार होतो,  “रदन” म्हणजे दात पण त्यातील शब्दांची अदलाबदल करून बनणारा शब्द “नरद” म्हणजे सोंगटी.  तसेच “वश (करणे)” म्हणजे कह्यात आणणे पण “शव” म्हणजे कलेवर.  त्याचप्रमाणे “वर” हा शब्द ही तसाच आहे.  “वर” म्हणजे नवरा मुलगा तर “रव” म्हणजे आवाज.  “दिवा” व “वादी” तसेच “नदी” व दीन”  या दोन्ही शब्दातील अक्षरेही परस्परांशी निगडित आहेत पण दोन्हीचे अर्थ वेगळे आहेत.   मराठी भाषेची अजून एक वेगळीच किमया आहे.  अक्षरांचा क्रम बदलून शब्दाचा अर्थ बदलतो हे निर्विवाद सत्य आहे.  परंतु त्याचप्रमाणे काही शब्द असेही आहेत की त्यातील अक्षरांची संख्या तसेच अक्षरांचा क्रम अगदी समसमान आहे.   पण एखाद्या अक्षरावर “अनुस्वार” दिला असता लगेच त्याचा अर्थ बदलतो.  “सदेह” आणि “संदेह” या शब्दजोडीत अक्षरांची संख्या व क्रम दोन्ही सारखेच आहे फक्त एका शब्दात “स” या एका अक्षरावर अनुस्वार दिल्यामुळे अर्थ बदलला. “सदेह” म्हणजे देहासह आणि “संदेह” म्हणजे संशय. याच प्रवर्गातील शब्दद्वय पाहणे मनोरंजक ठरेल.   “गज (हत्ती)” आणि “गंज (गोशाळा)” किंवा “अजन (निर्जन)” आणि “अंजन (काजळ)” अथवा “अचल (पर्वत)” अंचल (पदराचा काठ)”  किंवा “भजक (उपासक)” आणि “भंजक (तोडणारा)”  त्याचप्रमाणे “यात्रिक (प्रवासी)” आणि “यांत्रिक (यंत्रवत) तसेच “रजक ( धोबी)” आणि “रंजक (मनोरंजन)”  त्याचप्रमाणे “वदन (तोंड)” आणि “वंदन (नमस्कार) इत्यादी.  अशा शब्दांची यादी खूप मोठी आहे. 
अशी ही भाषेची गम्मत खरोखरच मनोरंजक वाटावी अशीच आहे. आपली मराठी भाषा ही काना, वेलांटी, मात्रा, उकार, जोडशब्द इत्यादी अलंकार लेऊन सजून बसली आहे.  यातच आपल्या भाषेचे थोरपण आहे. 
मिलिंद कल्याणकरनेरुळ, नवी मुंबई 

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!