Dear calidoscope | Aaplaa Vyaaspith news

Tuesday, October 22, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

प्रिय कॅलिडोस्कोप

कोलिडोस्कोप सहज डोळ्यांसमोर धरला…आणि आतल्या काचांमधून उमटणाऱ्या रंगावर्तात हरवून गेले. लेकीची खेळणी आवरताना तो सापडला अन् सगळे विखूरले गेले.मन भूतकाळात चौकटी मांडू लागलं…..
माझं गाव तळकोकणातलं एक छोटसं खेडेगाव होतं.वनराईच्या कुशीत लपलेलं. एकत्र कुटूंब असलेलं , भोवतीनं आंब्याफणसाची अन् माड – सुपारीची छानशी वाडी असलेलं माझं चौसोपी घर..घराच्या मागे असलेला गोठा दुभत्या अन लेकुरवाळ्या गायी म्हशींनी गजबजलेला असायचा.त्यांची नावही मजेदार असायची.चंद्री , भैरी , काळी अशी…आमचा म्हादू नावाचा गडी म्हशींच्या धारा काढायचा.अन् धारा काढताना तो घोरीपातल्या ” ताटको
( त्राटिका ) इलो रे इलो चा प्रवेश रंगवायचा .मग धारा काढता काढता गोठ्यातच आमचे घोरीप रंगायचे , पण हे सगळं बाबांना नकळत हा…! नाहीतर गचांडी वळली गेलीच म्हणून समजा….
घराच्या पुढे छोटे अंगण , ज्यात छोटे तुळशीवृदांवन , छोटा आड होता .त्याचे नाव तुळशीचे अंगण.त्याच्याही पुढे मोठे अंगण होते.मोठ्या अंगणात डाव्या बाजूला खळं होतं . आमच्या शेतातल्या भाताची झोडपणी , मळणी वगैरे काम तिथं चालायची . उन्हाळ्यात आम्हा मुलांचा रात्रीचा मुक्काम खळ्यातच असायचा.रंगत्या गप्पांत कधी वाघोबा अवतरायचा तर कधी गावाशी जोडलेल्या दंतकथा..तर कधी जुगाई – सोमजाई या गावदेवींचा पराक्रमाच्या गोष्टी….कधी कधी तर आमच्या जुन्या घरातला मुळपुरूष किंवा पिंपळावरचा मुंजा देखील डोकावून जायचे. .जाम धमाल यायची.गप्पांच्या नादात वाकळीमधे कधी झोप लागायची कळायचेच नाही…या सगळ्यात गुंगले असतानाच नकळत कॅलिडोस्कोप फिरवला गेला अन् दुसरी चित्रसंगती डोळ्यांसमोर आली..
मी घरातली मोठी मुलगी.या मोठेपणाबरोबरच आईबाबांच्या अपेक्षाही वारशाने मिळाल्या…तेव्हा मला गाणं म्हणायला फार आवडायचं.पण आमच गाव लहान होतं आणि त्यातून मुलगी गाणं शिकणार म्हणजे आक्रितच…इच्छा असूनही पुढे शिकता आलं नाही..पण घरात आरती म्हणताना किंवा आजीबरोबर काकड्याची भजनं म्हणून मी माझी गाण्याची हौस भागवायचे. तेव्हा..गाणं अर्धच राहिलं….पण ही गाण्याची हौस मी घरात एकटी असताना मोठमोठ्याने गाणी म्हणून भागवून घेते.
गावात एक मोठा तलाव आहे , देवीच्या मंदिरामागे . त्या तळ्यात निळ्या रंगाची कमळं फुलायची.नवरात्रात चढाओढ असायची मुलांमध्ये , की सर्वात जास्त कमळं कोण मिळवतो ? मला ही कमळं हवी असायची;पण पोहायला येत नव्हतं..मग मनधरणी करावी लागायची कोणाचीतरी . ती निळी कमळं खुणावायची , स्वप्नात यायची…एका वर्षी मे महिन्यात मी महिन्यात मी चंगच बांधला की या वर्षी पोहायला शिकायचंच.मग बाबांच्या मागे टुमणं लावून , प्रसंगी हट्ट करून , उपाशी राहून ..सुट्टीत इंग्रजीचा सराव करेन या अटीवर अस्मादिकांना पोहायला शिकवण्यात आलं . त्या वर्षीच्या नवरात्रात स्वतः तलावात उतरून मिळवलेली कमळं आज ही डोळ्यांसमोर फुलतात.
माझा मामा औरंगाबादला रहात होता आणि तिकडे जायचे म्हणजे पुर्ण रात्रीचा प्रवास असायचा. खिडकीतून दिसणाऱ्या चांदण्या मोजायची कोण हौस होती मला..त्या चांदण्या मोजण्यातच प्रवास संपायचा.गावात खंडोबाचे मोठे पुरातन मंदिर आहे.दर रविवारी तिथे दर्शनासाठी लोकांची गर्दी असायचीच.आरतीनंतर खंडोबावर रेवड्या – खोबऱ्याची उधळण व्हायची.मग काय आम्हा मुलांचा मुक्काम दर रवीवारी मंदिरातच असायचा.
एकेका रेवडीसाठी भांडताना जाम धमाल यायची.मंदिरामागे आंब्याची बाग होती.गुरवाची नजर चूकवून त्या बागेतले आंबे चोरताना सामुहिक दरोडा टाकला जायचा बागेवर अन् फ्राॅकच्या ओच्यात कैऱ्या गोळा करून कोणाची तरी खोपी गाठली जायची.तिखटमिठाच्या बरोबर मस्त ताव मारला जायचा त्या कैऱ्यांवर ….!! नकळत हातातला कॅलिडोस्कोप फिरवला गेला.
आयुष्यात पहिल्यांदा रेल्वेत बसले तो प्रसंग आठवला.शाळेच्या एकांकिका स्पर्धेसाठी मिरजेला जायचे होते . तेव्हा मिरज रेल्वेचे जंक्शन होते , म्हणूनच सरांनी मिरजेला रेल्वेने जायची टूम काढली होती. आम्ही सगळेजण हरखलो..सर्व सामानासहीत ( आई बाबा ) रेल्वेस्टेशनवर पोचलो…गाडी आली , साग्रसंगीत गाडीत चढण्याच्या अभुतपुर्व गोंधळानंतर आम्ही गाडीत जागा पकडून बसलो.जयसिंगपूर पास झाले आणि लक्षात आले की नाटकाच्या नैपथ्याचे साहित्य तर शाळेतच राहिले.आता आली का पंचाईत. .!! पण आमचे सर खरच खूप क्रिएटिव्ह होते.त्यांनी शक्कल लढवून टि.सीं . ना विनंती केली व सामानाच्या पॅकींग चे काही पुठ्ठे मिळवले. ते पुठ्ठे , आमच्या ओढण्या असे साहित्य वापरून आमचा नाटकाना मंच सजवण्यात आला. गंमतीची गोष्ट म्हणजे त्या स्पर्धेत आम्हाला नैपथ्याचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
आहे ना गंमत …!!
हे असो किंवा माझा पहिला इंटरव्ह्यू , माझे लग्न , माझ्या मुलांचे जन्म , माझी पहिली कविता , अटलजी – सुधा मुर्ती अशा दिग्गज्जांची प्रत्यक्ष भेट असे अनेक प्रसंग आले…परिस्थिती बदलत गेले..पण हा आयुष्याचा कॅलिडोस्कोप प्रत्येकवेळी नवे डिझाईन बनवत राहिला….
आज लेकीचा कॅलिडोस्कोप बघताना माझ्याही आयुष्याचा कॅलिडोस्कोप दिसला अन् मस्त रिफ्रेश झाले.प्रत्येकाकडेच असावा असा कॅलिडोस्कोप …..वेगवेगळे दृष्टीकोन अन् नवनवे आयाम देणारा..
प्रिय कॅलिडोस्कोप थॅन्क्स आ लाॅट..

@मानसी चिटणीस
चिंचवडगाव
पुणे – 33
फोन : 9881132407

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts