अनन्या -एका जिद्दी आणि तडफदार मुलीची कहाणी

अनन्या -एका जिद्दी आणि तडफदार मुलीची कहाणी

नाट्य परीक्षण

सुयोग निर्मित “अनन्या” या नाटकाचा २३२ वा प्रयोग ठाण्याच्या गडकरी रंगायतनला शुक्रवार १९ एप्रिलला पाहण्याचा योग आला.

या नाटकात प्रताप फड यांनी “अनन्या” या एका खूप जिद्दी, मेहनती आणि अतिशय आत्मविश्वास असलेल्या मुलीचा जीवनप्रवास दाखवला आहे.

अनन्या एक हुशार मुलगी असते. तिला C.A. व्हायचं असतं. एका उद्योगपतीचा मुलगा अनन्याला पाहतो आणि त्याच तिच्यावर प्रेम जडतं. तो वडीलांकरवी तिला मागणी घालतो. अनन्याच्या वडिलांना खूप आनंद होतो आणि ते लग्नाला होकार देतात. आधी अनन्याला ते पसंद पडत नाही पण नंतर ती लग्नाला होकार देते. एके दिवशी अनन्याला अपघात होतो आणि त्यात तिचे दोन्ही हात निकामी होतात. हे पाहून तो मुलगा अनन्याशी लग्न करण्यास नकार देतो. त्यातच तिचे वडील आणि भाऊसुद्धा तिच्याकडे हवे तसे लक्ष देत नाहीत. ते असे का वागतात ते नाटकातच बघायला हवं.

पण तिची खास मैत्रीण अनन्याच्या पाठी उभी राहते. ती अनन्याला आपल्या पायावर उभी करते. पुढे अनन्या जिद्दीने सर्व कामे पायाने करायला शिकते असं या नाटकात दाखवलं आहे. त्या सर्व प्रसंगात जिवंतपणा येण्यासाठी ऋतुजा ने जीवापाड मेहनत घेतली आहे. त्याचा सराव होण्यासाठी ती घरी सुद्धा सर्व कामे पायाने करत होती.
पुढे तिच्या जीवनात “जय दीक्षित” नावाचा एक तरुण येतो. याच्या प्रवेशानंतरचे प्रसंग दिग्दर्शकाने हलके फुलके दाखवले आहेत. त्या दोघांचे प्रेम सफल होते का तसेच तिचे बाबा आणि भाऊ अनन्याशी पुन्हा पहिल्यासारखे वागायला लागतात का हे जाणून घेण्यासाठी “अनन्या” हे नाटक बघायलाच हवे.

नाटकात अनन्या पायाने केक कापते, laptop पायाने वापरते, file पायाने उचलते. चादरीची घडी पायाने घालते असं सर्व दाखवलं आहे. ती घरात एकटी असताना शॉर्ट सर्किट मुळे घरात लागलेली आग विझवते हा प्रसंग तर जबरदस्त आहे. शेवटही अप्रतिम केला आहे. अश्या कितीतरी गोष्टी आहेत ज्या नाटकातच बघायला हव्यात. कारण ते प्रसंग त्या वेळच्या visual lights आणि sound track मुळे अतिशय प्रभावी झाले आहेत. हे सर्व करताना ऋतुजाला किती त्रास झाला असेल. त्यासाठी Physically, emotionally आणि mentally खूप strong असावं लागतं. ऋतुजाने हे सर्व आपल्या समर्थ अभिनयाने तसेच शारीरिक हावभावांनी आणि हालचालींनी उत्तमरीत्या दाखवलं आहे. त्याशिवाय या नाटकाचे २३२ प्रयोग झाले नसते.

नाटकासाठी दिग्दर्शकाने आणि इतर कलाकारांनी खास करून ऋतुजा बागवे हिने प्रचंड मेहनत घेतली आहे.
प्रमोद पवार, सिद्धार्थ बोडके, विशाल मोरे, करण बेंद्रे आणि अनघा भगरे यांनी सुद्धा सुंदर अभिनय केला आहे.

नाटकाची अजून एक उजवी बाजू म्हणजे नेपथ्य आणि प्रकाश योजना.
प्रसंगानुरूप नेपथ्यकाराने ४/५ सेट उभे केले आहेत आणि अगदी थोड्या अवधीत बदलले आहेत. तसेच योग्य प्रकाशयोजना आणि पार्श्वसंगीतामुळे सर्व प्रसंग उठावदार झाले आहेत.
उध्योगपतीचा मुलगा अनन्याला कुठे बघतो याचा उलगडा मात्र होत नाही. तेव्हढे एक सोडले तर नाटक शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवते.

एक निराळे आणि दर्जेदार नाटक बघायचं असेल तर हे नाटक बघायलाच हवं.

-अजित महाडकर, ठाणे
भ्रमणध्वनी – +९१ ९९६७५ ८९९४०

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!