A mother's heart! | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

एका आई (आजी ) चे ह्रदय !

एका आई (आजी ) चे ह्रदय !

एक आजी अन आजोबा होते. कुटुंब मोठे होते. कुटुंबात आईवडील आणि सहा भावंडे होती. आजोबा व्यवसायाने वकील होते.घरी शेतीवाडी नसल्याने संपूर्ण कुटुंब वकीली व्यवसायावर निर्भर होते. मोठा मुलगा दहावीत असतांना अचानकपणे एके दिवशी आजोबांची एग्झीट झाली. संपूर्ण कुटुंबाचा भार मोठ्या मुलावर पडल्याने मोठ्या मुलाचे शिक्षण खोळंबले.अर्धवट शिक्षण सोडून मोठ्या मुलाने मिळेल ती नौकरी करने पसंद केले.कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी हे करणे आवश्यक होते. भावंडांचे शिक्षण करून आपला संसार सांभाळणे ही तारेवरची कसरत होती. वडीलांनी बांधलेले स्वतःचे घर कसे कां असेना असल्याने तेवढाच आसरा होता. किरायाचे पैसे वाचत असल्याने ती एक प्रकारची बचतच होती. 
            दक्षिणेकडील एलटीसी टूर वर असतांना अचानक आजीचे हार्ट अटॅक ने देहावसान झाल्याचे कळले. सर्व भावंडे स्थिरस्थावर झालेली असतांनाच अचानक झालेला आजीचा आघात हा धक्का देणारा होता. एकत्र कुटूंब हे आजीमुळेच टिकून होते. आजी गेली अन कुटूंबातील लोकांची वाताहात झाली. दोन्ही मुलींचे कुटुंब हे वेगवेगळ्या ठिकाणी होते. त्यापैकी मोठ्या मुलीला मुलं होवून गेल्याने ती दुःखी होती दुसऱ्या मुलीच्या परिवारात पती, मुलगा, सुन व एक नातू होता.संसार चांगला चालला होता. तिचा मुलगा पुणे सारख्या शहरात एका कंपनीत इलेक्ट्रिशियन चे काम करीत होता. वेगवेगळ्या पाळीत काम करावे लागत होते. कधीकधी ओवर टाईम काम करावे लागत असल्याने त्याची घरी येण्याची वेळ निश्चित नव्हती.त्याला पत्ते,जुगार खेळण्याची, लाॅटरी मध्ये पैसे लावायची सवय जडली होती. मित्रांची संगत चांगली नसल्याने त्याचे पाय वेश्या गृहाकडे केंव्हा वळले हे त्याला कळले सुध्दा नाही. घरी सुंदर पत्नी, एक गोड बाळ, आई वडील असतांनाही तो समाधानी नव्हता. 
              इलेक्ट्रिशियन असलेल्या मुलाच्या अंगात बारीक ताप येणे चालू झाले. संपूर्ण अंगातून घाम जात असल्याने अशक्तपणा वाढीस लागला. अनेक उपाय करूनही तो ताप जात नसल्याने व दिवसेंदिवस वजन कमी होत असल्याने डाॅक्टरांना शंका आली. डाॅक्टरांनी  ब्लड टेस्ट करण्यास सांगितले असता रिपोर्ट पाॅझिटीव्ह आलेत. एड्स होवून तो थर्ड स्टेजला गेला असल्याचे कळले.हे ऐकून आई-वडील व बायकोच्या पायाखालची वाळूच घसरली. ही बातमी नकळत चाळीत पसरल्याने घर मालकांनी घर खाली करण्याचा तगादा लावला. दवाखान्यातील उपचार चालू असतानांच एके दिवशी मुलगा गेल्याची बातमी कानावर आली. नातू इतका लहान होता की त्याला काही कळत सुध्दा नव्हते.मुलाला दवाखान्यातूनच परस्पर स्मशानभूमीत नेवून अंत्यसंस्कार करण्यात आले. 
                तरूण वयात नवरा गेल्याने आणि मातृत्व पदरात पडल्याने सुनेचे अंधःकारमय आयुष्य सासु सास-यांना पहावत नव्हते. त्यांनी उदार अंतःकरणाने सुनेचे दुसरे लग्न करून देण्याचे ठरविले. नातवाला आपल्या पदरात घेण्याचे ठरवून सुनेसाठी नविन स्थळ पहाणे चालू केले. काही अवधी गेल्यानंतर एक स्थळ जुळून आले. त्या मुलाची सुध्दा लग्नाची दुसरपणीची वेळ होती.त्याला मुंबईत एका कारखान्यात नौकरी होती. मुलाच्या स्वभावाची व वर्तणूकीची खात्री करुन मुलीचे आईवडील नसल्याने सुनेचे पालकत्व स्विकारून तीचा पुनर्विवाह करून दिला. आज ती आपल्या संसारात सुखी आहे.सुनेचे लग्न करून दिल्यानंतर एका वर्षातच सुनेचे पालकत्व स्विकारलेल्या सास-यांचे ह्रदय विकाराने निधन झाले.
         आता सासु आणि नातू दोघेच एकत्र राहू लागलेत. पुण्या सारख्या ठिकाणी नातवा सोबत एकटे राहणे हे धैर्याचेच काम होते. आता नातू जवळपास अठरा वर्षाचा झालेला आहे. तुटपुंज्या पेंशन मध्ये कसेतरी आयुष्य जगत आहेत. लग्न करून दिल्यानंतर काही दिवस नातवाच्या आईचे येणे जाणे चालू होते. आता तिलाही मुल झाले असावे असे वाटते. कारण आता तिचे येणे जाणे बंद झालेले आहे. तिच्या मुलाला तीचा विसर पडलेला आहे. आजीनेच आता संपूर्णतः आईची जागा घेतलेली आहे. नातू आजीलाच आता ‘ आई ‘ म्हणतो व आई म्हणूनच तीची काळजी घेतो आहे. आजीला आता नातवाच्या भविष्याची काळजी लागलेली आहे. आजीचे माहेरचे वडिलोपार्जित जुने घर पाडून जागा विकावयास काढल्याने जागेच्या विक्रीतून आपल्या हिस्साचे काहीतरी पैसे पदरी पडले तर त्याच पैशातून पुण्यासारख्या ठिकाणी नातवाला राहण्यासाठी स्वतःच्या हक्काचा एखादा छोटासा फ्लॅट असावा या आशेवर दिवस काढणे चालू आहे.आता नातूच आजीचा आधार (मुलगा) झालेला आहे. 
                    © मिलिंद गड्डमवार, राजुरा
                        भ्र. क्र. ९५११२१५२००

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts