what-is-the-right-time-to-eat-part-7 | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

जेवणाची योग्य वेळ कोणती ? भाग ७

जेवणाची योग्य वेळ कोणती ? भाग ७

आधी पोटोबा मग विठोबा ही म्हण का पडली असेल ?
दिव्यात वात तोंडात हात, अशी एक म्हण आपल्याकडे रूढ आहे. म्हणजे सूर्यास्त झाल्यावर देवाकडे दिवा लावला की लगेचच जेवून घ्यावे.

काहीजण म्हणतात, दिव्यात जेव्हा वात लावली जाते, तेव्हा तोंडात हात नको. ते पण बरोबरच आहे. अगदी त्यावेळी नको. पण त्यानंतर दहा पंधरा मिनीटात, दिवसा उजेडी जेवण घ्यावे. म्हणजे पचनाला पुरेसा वेळ मिळतो.
आधी पोटोबा मग विठोबा

आधी स्वार्थ मग परमार्थ

या म्हणी केव्हा तयार झाल्या असतील ? कोणत्या परिस्थितीमधे तयार झाल्या असतील, त्याचा परत एकदा विचार करायला हवा. एका पिढीपूर्वीची मुलाखत घेतली तर याचा उलगडा होत जाईल.
ती माणसे सांगतात, आमच्यावेळी सूर्यास्ताचे अग्निहोत्र झाले की लगेचच दिवसाउजेडी एकाने देवाकडे, अंगणात तुळशीकडे दिवा लावायचा, ( घरात येणारी लक्ष्मी काळोखातून कशी येणार ? म्हणून अंगणात तुळशीकडे दिवा लावायचा. ) तर दुसरीने स्वयंपाकघरात दिवा लावून पाटपाणी घ्यायचे. आधी स-अवकाश भोजन करून नंतर सावकाऽश भजन करीत बसायचे…… मग परमार्थ !
तेव्हा सारवलेल्या जमिनीवर ताट पाट मांडून खाली बसून, मांडी घालून पंगत वाढून जेवायचे. घरात कुटुंब नियोजन नव्हते, गोकुळ होते. दहा पंधरा माणसे एकमेकांशी बोलायची, शुभंकरोती एका सुरात म्हटली जायची,पाढे पावकी निमकी, सर्व श्लोक स्तोत्रे यांची उजळणी व्हायची.
चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी आपल्या घरातील परिस्थिती आठवली तर टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हता. करमणुकीचे एकमेव साधन म्हणजे रेडीओ आणि सिनेमा थिएटर. थिएटरमधे जाऊन हौस म्हणून सिनेमा पहाणे त्या तिकिटासाठी तब्बल दोन ते अडीज रूपये खर्च करणेदेखील परवडत नव्हतं. एवढा श्रीमंत काळ आपण अनुभवला आहे.
त्याआधीची फक्त वीसेक वर्षे आता आठवून पहा. म्हणजे आपल्या बाबांच्या लहानपणीचा काळ सुखाचा……
रेडिओ ही अत्यंत प्रतिष्ठेची चीज होती, गावातील एखाद्या घरीच तो असायचा, बिनाका गीतमाला ऐकायला दर्दी गर्दी जमायची, तेव्हाच्या काळातील जेवणाच्या वेळा आठवून बघा, त्या काळातील ज्येष्ठ माणसांना आजही विचारून पहा. तेपण सांगतील, ” आमच्या तारूण्याच्या सुवर्ण युगात आमची जेवणे दिवसाउजेडी संपायची. लाईटपण नव्हता तेव्हा. रात्री साडेआठ नऊ वाजता झोपी जात होतो.”
विज्ञानयुग आले, विद्युतीकरण झाले, प्रगती झाली, विकास झाला. कोपऱ्यात टीव्ही आला. करमणुकीचे साधन बदलले, दूरदर्शनवर बातम्या देणारी माणसे, त्यांच्या अवतीभवती फिरणाऱ्या माशा देखील पहाता यायला लागल्या. मालिका पहायला वेळ कमी पडू लागला. त्याच दरम्यान स्वयंपाकघरात कुकर आला, मिक्सरपण आला. मनोरंजन ही गरज बनली. खाना खान्यातला (म्हणजे स्वयंपाकघरातला) वेळ दिवाणखान्यात जाऊ लागला.

गोजिरवाण्या घरात लाजीरवाण्या सिरीयल सुरू झाल्या. बातम्यांपेक्षा जाहीरातीमधे जास्ती वेळ जाऊ लागला. आणि हळुहळू सगळंच बदललं. सुखाच्या कक्षा वाढत गेल्या आणि…..

विठोबा मागं गेला आणि पोटोबा पुढे आला……..
कसं बदलत गेलं? कोण बदलत गेलं ? कोणी बदललं हे सगळं? कधी कळलंच नाही.
मुठीत घट्ट धरून ठेवलेल्या वाळूसारखं दोन्ही बाजूने ते बाजूला कधी पडत गेलं लक्षातही आलं नाही. आरोग्याची मूठ कधी रिकामी झाली, ते कधी समजलं देखील नाही.

वैद्य सुविनय दामले
कुडाळ सिंधुदुर्ग
02362223423

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts