what-is-the-right-time-to-eat-part-13 | Aaplaa Vyaaspith news

Monday, October 21, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

जेवणाची योग्य वेळ कोणती ? भाग १३

जेवणाची योग्य वेळ कोणती ? भाग १३

एवढा सगळा खटाटोप कशासाठी ?…..
गेली चाळीस पन्नास वर्षे झाली, आमची वाढ होऊन, आत्ता कशाला एवढं बदलायचं ?…
आमची अर्धी लाकडं गेली मसणात…..
काय वाढणारे आयुष्य असं वाढून वाढून….
आणि खाव्या लागल्या अॅलोपॅथीच्या गोळ्या म्हणून कुठे बिघडणार आहे ?……
जगात एवढी लोक खातातच आहेत ना या अॅलोपॅथीच्या गोळ्या. ती काय सगळी वेडी आहेत का ?……
विज्ञानावर, त्याच्या नवनवीन शोधांवर, या आयुर्वेदीक वैदूंचा अजिबात विश्वास म्हणून नाही. भोंदूगिरी सगळी…..

असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात आत खदखदत आहेत, हे कळतंय….
आजची टीप त्यांच्यासाठी…

आयुर्वेद सांगतो, निरामय जीवन जगावं. औषधांशिवाय जगावं, दिलखुलास जगावं, आपण निरोगी रहावं, इतरांना निरोगी होण्यास मदत करावी.
औषध कसं असावं यावर आयुर्वेद सांगतो, एक औषध घेताना अन्य कोणत्याही स्वरूपाचा बिघाड शरीरावर दिसू नये, आजच्या भाषेत सांगायचे तर कोणतेही साईड इफेक्ट, म्हणजे दुष्परिणाम नकोत. ज्या कारणासाठी औषध घ्यायचं ते कारण नाहीसे झालं की, औषध बंद व्हायला हवं.

पण आज काय होतंय ? आणि काय चाललंय ? हे सर्व आपल्याला दिसतंय…..
जगण्यासाठी, मरेपर्यंत औषधंच औषध!

त्यापेक्षा जीवनशैलीमधेच थोडेफार बदल केले, विचारामधे थोडी सकारात्मकता आणली की झालं.

काही आजार वंशपरंपरेने येतात, असे सांगितले जाते, हे पण अर्धसत्य आहे. जसे घरात एकाला “ह्रदयरोगी” असा शिक्का बसला की, त्याचे अख्खे घराणे वाताचे रोगी बनून जाते.

कारण ?
डाॅक्टरनी सांगितलेले चुकीचे पथ्यापथ्य.

भीतीने असेल किंवा आमच्यासाठी कुठे वेगळं करत रहाणार, या कारणाने असेल, पण, त्या एकाच्या जेवणातले तेल, तूप, नारळ, शेंगदाणे, आदि सर्व स्निग्ध पदार्थ बंद केल्यामुळे, सगळ्याच्याच जेवणातील स्नेह आटून जातो. (जेवणातील आणि जीवनातील सुद्धा !) आणि अख्खं घराणं चुकीच्या आहाराची शिकार होते. हे तसंच्या तसं पुढच्या पिढीत काॅपी पेस्ट होतं आणि नवीन (वंश /देश )परंपरा सुरू होते.

आपल्या घरात तर अशी चुकीची परंपरा सुरू तर होत नाही ना, याकडे लक्ष ठेवावे, यासाठी आपली वंश परंपरा, देश परंपरा नीट तपासून पहायला हवी. इतिहास आणि पुराणे वारंवार नव्याने अभ्यासायला हवीत.

ही नव्याने निर्माण होणारी चुकीची आहार परंपरा आपल्याला थांबवायची, बदलवायची आहे.

आणि मुख्य म्हणजे आपली (दोन किंवा एक) मुले. ज्यांच्या खांद्यावर आपण आपले भविष्य ठेवणार आहोत, ते सक्षम नकोत का व्हायला ? आम्ही ज्या चुका केल्या, किंवा करतोय त्याची चुकीची फळे त्यांना भोगायला लागू नयेत, मधुमेह, ह्रदयरोग, रक्तदाब, संधीवात, स्थौल्य, पीसीओडी, थायराॅईड सारखे पसरत जाणारे आजार आपल्या घरात येऊ नयेत, यासाठी आपणच वेळीच सावध होऊन, बदलायला हवे.

मुलं आपलं अनुकरण करत असतात. काही गोष्टी न शिकवता आपल्याकडून शिकत असतात. याचे भान पालक म्हणून आपण ठेवायलाच हवे. माझ्या आई वडिलांच्या लहानपणी असलेली सकाळी सायंकाळी जेवायची वेळ एका पिढीने बदलली, आणि चुकीच्या रोगांची मालिका सुरू झाली. असे लक्षात येतेय. म्हणून आपणच जर आपल्या घरातील जेवायची वेळ बदलवायचे सकारात्मक नियोजन केले तर (तथाकथित) पिढीजात आजारापासून आपण आपल्या भविष्याला वाचवू शकतो.
अजूनही वेळ गेलेली नाही.

मी बदललो…
माझे घर बदलले….
असंच प्रत्येकाच्या घरी होत राहिलं तर…
लक्षात येईल…..
मेरा देश बदल रहा है..
सारा देश बदल रहा है……

वैद्य सुविनय दामले
कुडाळ सिंधुदुर्ग
02362223423

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts