what-is-the-right-time-to-eat-part-11 | Aaplaa Vyaaspith news

Monday, October 21, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

जेवणाची योग्य वेळ कोणती ? भाग ११

जेवणाची योग्य वेळ कोणती ? भाग ११

“आम्हाला हे असं लवकर जेवणं अजिबात शक्य नाही, हो!” असं सांगणाऱ्या करीता खास टीप….
सक्काळी सकाळी उठायचं, भराभरा आवरायचं डब्बा बनवायचा, पोरांना शाळेत हाकलायचं, नवरा कामाला पाठवलं की कसाबसा चहात पाव बुचकळून खायचा, म्हणजे झाला नाश्ता. वर पाणी ढोसायचं, आपला डबा करायचा, धावधाव करीत ऑफीस गाठायचं, बाॅसची बोलणी खायची, परत घरी येताना मार्केट मार्गे खरेदी करून, येऊन कंबर कसून परत कामाला लागायचं, टीव्ही समोर बसलेल्यांना तिथे नेऊन चहा बिस्कीट खायला द्यायची, कपबशासुद्धा आपणच घरात न्यायच्या. रात्रीच्या जेवणाचं बघायचं, हे करत असताना, तू आज कशी चुकलीस, हे समोर खुर्चीवर ढेंग टाकून निवांत बसलेल्याकडून निमूटपणे ऐकून घ्यायचं. तोंडातून एकही अवाक्षर न काढता, जेवणाचा कार्यक्रम पार पाडायचा, आपणच डाॅक्टरकडे जाऊन आणलेल्या गोळ्या आपणच घ्यायच्या आणि कधी एकदा पडता येतंय याची वाट बघायची ……

हे सर्व कशासाठी करताय ?
दोन घास सुखानं खाता यावेत म्हणून ना…..

खाल्लेलं अंगाला लागण्यासाठीच ना…..
पण जरं या व्यस्त दिनचर्येतून जर शेवटच्या दोन ओळी साध्य होणार नसतील तर ? सगळा खटाटोप कशासाठी करताय ?

कशासाठी ? पोटासाठी !
एकच बदल करून पहा,

फक्त जेवणाची वेळ बदला…
आता असं करता येतं का बघा.

सकाळचा नाश्ता कॅन्सल.

नाश्त्याऐवजी थेट पोटभर जेवण.

दुपारचं जेवण / डबा कॅन्सल.

सायंकाळी घरी आल्यावर पोटभर जेवण.

( जे सातला घरी पोचू शकत नाहीत, त्यांनी सायंकाळचा डबा सोबत न्यावा.)

दोन वेळा जेवण बनवायचंच नाही. फक्त सकाळी एकदाच जेवण बनवण्यात वेळ खर्च करायचा. एक पदार्थ फक्त सायंकाळी नवीन करायचा. बाकीचे तीन प्रकार सकाळचेच.
सूर्य असल्यामुळे सकाळचे तयार अन्न सायंकाळ पर्यंत नासत नाही. सायंकाळी बनवलेले मात्र सकाळी फुकट जाते.
दुपारचा डबा अगदी भुकेपुरताच. सायंकाळच्या भूकेची जाणीव ठेवणारा.

दुसरे मुख्य जेवण सायंकाळी सात वाजता.
बाकी जेवणात कोणतेही पथ्य करायचे नाही.

सूर्योदय ते सूर्यास्त सगळं खायचं, पोटभर खायचं, मनसोक्त खायचं…. कावळ्यासारखं !
पथ्य एकच ….

खाताना भीती न बाळगता खायचं. आणि खाल्ल्यानंतर खाल्लेलं सगळं विसरून जायचं. खाल्लेलं आठवायचं नाही, मनात साठवायचं नाही.
बायकांचा स्वयंपाकघरात जाणारा आणि “रांधा वाढा उष्टी काढा” मधे खर्च होणारा वेळ वाचेल.

सायंकाळी साडेसातनंतर स्वयंपाकघर बंद.

सहकुटुंब सहपरिवार कुठेतरी शाॅपिंग, देऊळ, बाग…. थोडं मोकळे वाटेल.

स्वयंपाकघरातला वेळ वाचेल,

फॅमिली लाईफ एन्जाॅय करता येईल, हौस, मौज करता येईल…. आणि बरंच काही…

मुख्य म्हणजे निरर्थक औषधांशिवाय, निरामय जीवन जगत सगळं जेवण घेता येईल.

नाहीतर……

डोंबिवली फास्ट पकडत, दिवसभर धांगड धिंगा करत, ज्या पोटात आहार टाकल्यानंतर त्याचे रूपांतर उर्जेमधे होते, त्याऐवजी, त्याच पोटात रोज न चुकता, जन्मभर पुरणारी औषधं टाकायची आहेतच…

आणि डाॅक्टरच लिहून देतात हल्ली…

वरील सर्व औषधे पांडुरंगाच्या चरणी विलीन होईपर्यंत सुरू ठेवावीत……

वैद्य सुविनय दामले
कुडाळ सिंधुदुर्ग
02362223423

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts