याला जीवन ऐसे नाव भाग ६

याला जीवन ऐसे नाव भाग ६

वेगान् न धारयेत

न प्रवृत्तयेत

वेगांचे धारण करू नये अगर मुद्दाम प्रवर्तन करू नये.

म्हणजे शास्त्रकार असे सांगतात की, शरीराकडून आतून जे सांगितले जाईल तेवढे त्या वेळी करावेच. आणि जर केले नाही तर त्रास होणार हे शंभर टक्के सत्य आहे.
तहान, भूक, उलटी, संडास, लघवी इ. असे एकुण तेरा वेग आहेत, ज्यामधे त्याला विसरून चालत नाही.
जसे, उलटी होते, शिंक येते, लघवी होते, ही शरीराच्या चांगल्यासाठीच असते. पण उलटी होत नसताना उगाच सुके ओकांबे काढणे म्हणजे निव्वळ दमछाक करून घेणे आहे.
शिंक आल्यावर जरूर शिंकावे. पण उगाचच टा. पा. (टाईमपास) म्हणून नाकात काड्या घालतात, ते नाकाला हुळहुळ निर्माण करण्यापलीकडे काही करत नाही.
तशीच तहान लागणे आणि पाणी पिणे हे करावेच. तसेच तहान लागली नसताना पाणी पिणे म्हणजे किडनींची निव्वळ दमछाक होते. जेव्हा शरीराला पाण्याची गरज लागेल तेव्हा, शरीर तहान हे लक्षण निर्माण करतेच. तहान कळलीच नाही तर घश्याला कोरड पडेल, लघवीला पिवळसर होईल, लालसर होईल, जळजळ होईल, अर्थात अशावेळी सुद्धा साधे पाणी पिऊ नये तर, धने जिरे घालून उकळलेले पाणी थोडे थोडे घोटघोट प्यावे.
तहान लागणे आणि सारखी तहान लागणे, यातील सूक्ष्म फरक समजला पाहिजे. मधुमेहासारख्या आजारात जी वारंवार तहान लागते ती, रोग स्वरूपात असते. ती पाणी पिऊनदेखील थांबत नाही, भागत नाही, अशावेळी तो वेग नसून रोग आहे असे समजावे. ( ज्यावेळी पाणी पिऊन त्याचे समाधान होते, त्यावेळी तो शरीराकडून निर्माण झालेला वेग असतो. आणि तहान लागून पाणी पिऊनही जेव्हा त्याचे समाधान होत नाही, असे जेव्हा तोआपल्याला सांगतो, तेव्हा “आता वैद्याला दाखवून घ्या” असे तो, आपल्याला सूचित करतो. हे समजले पाहिजे.)
जसे कफ झाला असता उलटी होणे वेगळे आणि रोग म्हणून उलटी होणे वेगळे आणि तज्ञ वैद्याच्या मार्गदर्शनाखाली वमन म्हणजे पंचकर्मातील उलट्या करवणे वेगळे !
यातील फरक, पुस्तक वाचून किंवा वाॅटसप मेसेज वाचून कळणार नाही. याकरीता पूर्वीचा आपला स्वतःचा किंवा तज्ञ वैद्याचा अनुभव महत्वाचा आहे.
हे सर्व करवून घेणारा तो असतो.
दैनंदिन दिनचर्येतील त्याचे महत्व, त्याचे अस्तित्व, त्याचा आपल्याशी होणारा सुसंवाद,

हे समजून घेणाऱ्याला, नक्कीच समजून येईल. हे जो समजून घेईल, त्याला दुःख कधीच होणार नाही.

कारण तो म्हणजे फक्त सत् चित् आनंद !

वैद्य सुविनय दामले
कुडाळ सिंधुदुर्ग
02362223423

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!