this-life-is-such-a-name-part-35 | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

याला जीवन ऐसे नाव भाग ३५

याला जीवन ऐसे नाव भाग ३५

निषेधार्ह पाणी भाग तीन

नाम्बु पेयमशक्त्या वा स्वल्पमग्निगुल्मभिः ।।

पाण्डूदरातिसारार्शोग्रहणीदोष शोथिभिः ।

ऋते शरदन्निदाभ्यां पिबेत्स्वस्थोऽपि चाल्पशः ।।
वैद्यानाम शारदी माता असं ओळखला जाणारा शरद ऋतु आणि अंगाची लाही लाही करणारा ग्रीष्म ऋतु या दोन ऋतुंमधे स्वस्थ माणसाने देखील पाणी अल्पच प्यावे. असं अगदी स्पष्टपणे वाग्भटजी म्हणत आहेत.
आता शरद ऋतु आणि ग्रीष्म ऋतु कोणते ते कधी येतात ? ऋतु सहा असतात, हे तरी आठवते आहे का ? “लहानपणी कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय.” असे आपण म्हणाल. “शरद पोंक्षे माहिती आहे, हा शरद ऋतु कोण?” असं पोरगं विचारेल. विचारून पहा, गंमत म्हणून आपल्या इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या पोरांना. ऋतु म्हणजे काय हेच माहिती नसेल. शरद ग्रीष्म दूर राहिले.
आताच्या दिनदर्शिकेनुसार ऑक्टोबर हीट म्हणजे शरद ऋतुचा कालावधी. आणि एप्रिल मे चा सीझन म्हणजे ग्रीष्म ऋतु समजावा.

जमिनीवर पडलेल्या पावसाच्या पाण्याची सूर्याच्या सरळ आणि तीक्ष्ण किरणांनी परत वाफ व्हायला लागलेली असते. वातावरणात उष्णता वाढलेली असते. तसेच शरीरात देखील पित्ताचा प्रकोप सुरू झालेला असतो. हा काळ म्हणजे रोगांचे माहेरघरच. म्हणूनच सुभाषितकार गंमतीने या शरद ऋतुला वैद्यांची माता म्हणतात. आजच्या भाषेत, अनेक रोगांचा ‘सिझन’ सुरू होतो. वैद्यांचे आर्थिक भरणपोषण सुरू होते.
आणि दुसरा उल्लेखित ग्रीष्म ऋतु. भूगर्भातील पाण्याची पातळी खाली नेऊन पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणारा, तोंडचे पाणी पळवणारा, अंगातून पाण्याचे लोट घामाच्या रूपात बाहेर काढणारा हा ऋतु अगदी पाऽणीऽ पाणीऽऽ करायला लावतो. असं असूनही वाग्भटजी म्हणतात, पिबेत स्वस्थोऽपि अल्पशः
अशा या ऋतुंमधे देखील उष्णता वाढलेली असतानासुद्धा पाणी कमीच प्यावे. असं का म्हणतात ?
जसं वातावरणात उष्णता वाढलेली असते, तशी शरीरातील दोषांची स्थिती बदललेली असते. तिन्ही दोष आपले मूलस्थान सोडून बाहेरच्या दिशेत गेलेले असतात. जठरातील अग्निचे बल देखील प्राकृत नसते. त्यामुळे आधीच व्याधींनी आलेला अशक्तपणा असताना, पाण्यासारखा अग्निविरोधी घटक पोटात ढकलणे म्हणजे आ बैल मुझे मार सारखी अवस्था होते. या रोगग्रस्तांनी तर पाणी पिऊ नयेच. पण ज्यांना आपल्याला रोग होऊ नयेत, अशी इच्छा असणाऱ्यांनी सुद्धा पाणी पिताना साधे पाणी पिऊच नये. उकळलेले पाणी पिताना देखील चार वेळा विचार करून कमीच प्यावे, विचारपूर्वक प्यावे. गरजेपुरते प्यावे. सुसंस्कारीत जल प्यावे. व्याधीनुसार, दोषांच्या अवस्थेनुसार, वैद्य सल्ल्यानुसारच प्यावे. हवेच असेल तर ते सुद्धा काही तरी औषधी घालूनच !
मनुष्य खूपच अशक्त असेल तर प्राणधारण होईल इतके पाणी थोडे थोडे पाणी जरूर प्यावे, कारण पाणी हे जीवन आहे.

पण कोणीतरी सांगतो आहे म्हणून, कोणत्या तरी पुस्तकात वाचले म्हणून, अमुक गुरूजींनी सांगितले म्हणून, मला वाटले म्हणून, चॅनेलवर ऐकले म्हणून, वाॅटसमधील मेसेजमधे वाचले म्हणून, आमचे डाॅक्टर सांगतात म्हणून, आईने सांगितले म्हणून, नॅचरोपॅथीचा उपाय म्हणून, या योगतज्ञाने सांगितले म्हणून, जिममधल्या इन्स्ट्रक्टरने सांगितले म्हणून, मैत्रिणीने सांगितले म्हणून, स्कीन हेल्दी रहाण्यासाठी माझ्या ब्युटीशियनने सांगितले म्हणून, मूतखडा होऊ नये म्हणून, वैदूने सांगितले म्हणून, मुळव्याध भगंदरवाल्याने सांगितले म्हणून, अगदी बायकोने सांगितले तरीसुद्धा……

अ ति

पा णी

पि ऊ

न ये.

वैद्य सुविनय दामले
कुडाळ सिंधुदुर्ग
02362223423

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts