याला जीवन ऐसे नाव भाग ३४

याला जीवन ऐसे नाव भाग ३४
           निषेधार्ह पाणी भाग दोन

नाम्बु पेयमशक्त्या वा स्वल्पमग्निगुल्मभिः ।।

पाण्डूदरातिसारार्शोग्रहणीदोष शोथिभिः ।

ऋते शरदन्निदाभ्यां पिबेत्स्वस्थोऽपि चाल्पशः ।।
वाग्भटजी अध्याय क्र.5 मधील श्लोक 13/14 मधे अगदी स्वच्छ आणि स्पष्टपणे परत परत म्हणतात, आणि ते सुद्धा रोगांची नावे सांगायच्या अगोदरच सांगताहेत, न अम्बुपेयम्….पाण्याचा अतिरेक टाळा.

यापूर्वी, न पिबेत् सूर्येन्दु पवनम् अदृष्टम् । या श्लोकाची सुरवात त्यांनी “न” ने केली होती. या श्लोकाची सुरवात पण “न” ने केली आहे.
या उल्लेखित रोगांनी जे अशक्त झालेले रोगी आहेत, त्यांनी पाणी टाळावे.

अशक्त होण्याचे कारण यांची चयापचय प्रक्रिया बिघडलेली असते. शरीरातील दोषांच्या तरतम भावाने निर्माण झालेली रोगाची अवस्था, समान करण्यासाठी शरीर देखील काही तरी प्रयत्न (compensation) करीत असते.
सर्व रोग होण्यामागे मन्द झालेला अग्नी हेच कारण असते. अग्नी मंद झाला की, पाचनकर्म बिघडते. खाल्लेल्या अन्नाचे शरीराला अपेक्षित असलेले रूपांतरण, जे अग्निमहाराज करत असतात, ते बिघडते. पाचन बिघडले की, अन्नाचे पुढील शोषण पोषण बिघडते.
मोठ्या टोपात भात शिजवायचा असेल तर गॅस बारीक असून चालणार नाही. बर्नर मोठाच हवा तरच तांदुळ शिजतील, नाहीतर टोपात जे काही तयार होईल, त्याला भात असे म्हणता येणार नाही.
एक सुभाषित आठवतेय का, विद्येविना मति गेली….

तसं आहे, हे सर्व अनर्थ एका अग्निने केले. ज्या अग्निचा पाणी हा शत्रू आहे. म्हणून पाणी कमी (गरजेपुरतेच) प्यावे.असं वाग्भटजी सांगताहेत.
कोणताही रोग व्हायला लागला कि शरीर खबरदारीचा उपाय म्हणून तोंडाची चव बिघडवून टाकते. चव बिघडली की, पाणी पण बेचव लागते. आणि खाण्या पिण्याची इच्छाच नाहीशी होते. शरीर जे सांगतेय, ते दीर्घकालीन विचार केला तर नेहेमी फायद्याचेच असते.
वाहातुक पोलीस शिटी मारून, बोलावून कसे सांगतो,

“पुढे अपघात झाला आहे. तातडीचे काम सुरू झाले आहे. इथून पुढे वाहाने नेऊ नका.अगदी स्कूटी सुद्धा जाणार नाही. जरा त्रास झाला तरी चालेल, पण आपली गाडी या मार्गाने नेऊ नका. वळवा. आणि परत मागे न्या. वाटलं तर दूरच्या पर्यायी मार्गाने जा”

तसं पोटात जेव्हा गडबड सुरू झालेली असते, तेव्हा “त्याचा” इंद्रियरूपी ट्रॅफिक अंमलदार मनामार्फत आतून सूचना देतो, ”आतमधे किरकोळ दुरूस्तीचे काम सुरू आहे. कोणालाही, कोणत्याही कारणासाठी आत पाठवू नका. अगदी पाण्याला सुद्धा ! उगाच त्रास करू नका, त्रास देऊ नका. उगाच जबरदस्ती करू नका. थांबा थोडी विश्रांती घ्या.आणि द्या.”

शरीराची ही अवस्था लंघन करण्याची असते. ही विशिष्ट अवस्था ओळखता यायला हवी. यावेळी फक्त जिभेवर संयम ठेवता यायला हवा. की पुढचे सगळं ट्रॅफीक जाम टाळता येते. नाहीतर टाळक्याला ताप होतो.

वैद्य सुविनय दामले
कुडाळ सिंधुदुर्ग
02362223423

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!