simple-living-principles-part-seventy four | Aaplaa Vyaaspith news

Sunday, November 17, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

जगण्याची साधी सोप्पी तत्वे भाग चौऱ्याहत्तर

जगण्याची साधी सोप्पी तत्वे       भाग चौऱ्याहत्तर

जे जे देवासाठी ते ते देहासाठी

        भाग 31
      नैवेद्यम् समर्पयामी 

         भाग पाच

गणेशजी आपल्याकडे येतात. काही जणांकडे दीड दिवस, काही जणांकडे पाच, सात, अकरा, एकवीस दिवस मुक्कामी असतात. जणुकाही घरातलाच एक घटक होऊन जातात. विसर्जनाची वेळ येते तेव्हा सगळ्यांचेच डोळे पाणावतात. ते (तेज) घरातून जाऊ नयेत, असे लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच वाटत असते.

गणेशजी आपल्या घरातील एक ज्येष्ठ आदरणीय व्यक्तीच बनून गेलेले असतात. सर्वगुणसंपन्न असलेली ही सगुण देवता आपल्या अवतीभवती आहे, याचा विलक्षण आनंद यावेळी आपल्या मनात असतो. केवळ एका ज्ञातीचे हे दैवत नसून समस्त समाजाला देशभक्तीच्या एका सूत्रात बांधून ठेवणारे हे सामाजिक आणि राष्ट्रीय स्तरावरील दैवत. जेव्हा गणेशजी येतात, मनातली सर्व सुख दुःख प्रत्येक जण त्यांना सांगत असतात. कोणावर जबरदस्ती नाही, कडक सोवळे ओवळे नाही. घरातली सर्वजण अगदी मनोभावे यथासांग, यथा मिलितोपचार द्रव्यांनी षोडशोपचार पूजा करत असतात.
या निमित्ताने नवीन खरेदी, बाजारात खरेदीला गर्दी, एका घरातील पैसा बाहेर येतो, दुसऱ्याच्या घरात जातो. चलन हलते फिरते राहाते, पैसा फिरला तर देशाचा आर्थिक विकास होतो, हा अर्थशास्त्रातला नियम. सणांच्या माध्यमातून भारतात हा नियम केवळ पुस्तकात राहिलेला नाही तर व्यवहारात उतरवला गेलाय. त्याचा परिणाम म्हणून भारतात इंग्रज येऊन गेल्यानंतर परिस्थिती दुष्काळी असली तरी आर्थिक मंदीची लाट तशी कधी जाणवली नाही, ती या अशा सणांमुळे आणि त्यातल्या कर्मकांडामुळे !
पाच फळं, पाच भाज्या, पाच पक्वान्न, सणाच्या निमित्ताने का होईना, खरेदी होते, सण म्हणून वेगवेगळे पदार्थ. एकत्रित भोजन, एकत्रित भजन, एकमेकांच्या सहवासात येत असतो. घराला जणुकाही देवालय बनवून टाकलेलं असतं. घराघरातील गणेशतत्व जरी एकच असले तरी प्रत्येकाच्या घरी जावून, प्रत्येक घरातील प्रत्येक गणेशाचे दर्शन होते. एक निमित्त असते, लोकसंग्रह वाढवायचे ! नातेसंबंध वाढवायचे, पौष्टिक खायचे, आरोग्य सुधारायचे !
सकाळी लवकर उठून गणपतीची मनोभावे केलेली पूजा, आरती, शंख, घंटा यातून निर्माण होणारे ध्वनी, झांज, टाळ, तबला, पेटी, पखवाज, घुमट इ. अनेक वाद्यांचे गजर, शब्दलहरी, मंत्रलहरी, त्यांचे नाद, सूर, ताल, लय यांनी घरातील वायुमहाभूताची, आकाश महाभूताची शुद्धी होत असते.
काही आठवतंय पहा,

प्रत्येक कार्याच्या प्रारंभी गणेशजीना पहिला नमस्कार.

आपण जेवायला बसलो की गणेशजीना नैवेद्याचे पान पहिल्यांदा. “तुमच्यामुळे आम्हाला मोदक मिळती खायाला, गणपती बाप्पा मोरया” असं म्हणत गणपतीसाठी केलेले सर्व मोदक आपणच खाऊन टाकायचे….
हे पंचपक्वान्नाचे ताट नैवेद्य म्हणून दाखवून परत सगळ्यांनी समान वाटून घ्यायचे. कोणताही भेदाभेद नाही. कोणाशीही भेदभाव नाही.
पण….

हा असा भरलेल्या ताटाचा नैवेद्य फक्त दुपारी दाखवला जातो.( नाव गणेशाचे खातो आपणच ! )

आणि रात्रीची पेटपूजा ?

?????

नैवेद्याला काय असते ?

आठवावं लागतंय ना !

जशी षोडशोपचार पूजा सकाळी केली जाते, तशी सायंपूजा केली जात नाही. सायंकाळी केली जाते, त्या पूजेला सायंपूजा असे म्हणतात.

सायंकाळी फक्त पंचोपचार आणि आरती ! आणि नैवेद्याला काय असतं ?
फक्त एखादा लाडू, किंवा लाह्यांचं गुळखोबरं घातलेलं पंचखाद्य, किंवा एखादा मोदक किंवा एखादी करंजी किंवा नेव्हरी. ( गोवा, कोकण भागात करंजीला नेवरी म्हणतात.)
बास्स बास्स बास् !

संध्याकाळी झालेल्या या पूजेनंतर गणेशजींचा हा जो नैवेद्य असतो, इथे आरोग्य दडलेलं आहे.

जे जे देवासाठी ते ते देहासाठी. या न्यायानुसार आपणही तेवढे आणि तसेच अन्न खायचे असते.

सकाळ दुपार भरपूर जेवायचे आणि सायंकाळी कमी, रात्रीचे तर नाहीच, हा नियम पुनः एकदा सिद्ध होतो.
सकाळी झालेल्या पूजेनंतर पंचपक्वान्न खाल्ली तरी चालतात. आणि सायंकाळी मात्र एखादाच लाडू किंवा लाह्या सदृश्य काही तरी भाजलेलं, फुलवलेलं, पचायला एकदम हलकं असंच अन्न घ्यावं हा त्यामागील आरोग्य संकेत . समजून घेणाऱ्या समंजसांना हा समज समजतो. बाकी सगळे बुद्धीवादी, भक्ती सोडून ज्ञानाची सालपटं काढत रहातात, आणि आपण मात्र लंबोदर होतात.

वैद्य सुविनय दामले
कुडाळ सिंधुदुर्ग
02362223423

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts