simple-living-principles-part-one-hundred-Twelve | Aaplaa Vyaaspith news

Sunday, December 15, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

जगण्याची साधी सोप्पी तत्वे भाग एकशे बारा

जगण्याची साधी सोप्पी तत्वे                  भाग एकशे बारा

निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? भाग सहा

नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही, हे सत्य ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्य टिळकांनी, कृष्णानी सांगितलेल्या भगवतगीतेवर गीतारहस्य लिहिले आहे.
कृष्णाच्या सत्यवचनावर लोकमान्यांचा पण विश्वास होता. सत्य बोलावे, पण अप्रिय होईल असे बोलू नये. आणि जर सत्य स्थापन होणार असेल तर खोटे जरूर बोलावे.
अकबर बिरबलाची एक गोष्ट आहे. अकबराकडे एक पोपट पाळला होता. राजाचा खूप आवडता होता. उत्तम बडदास्त आणि काळजी घेतली जात होती. एक दिवस बादशहाने आदेश देऊन सांगितले, ” हा पोपट मेला, असं जो मला सांगेल, त्याचं मुंडकं उडवलं जाईल.”
एक दिवस पोपट मरतो. पण ‘पोपट मेला’ हे बादशहाला कोणीच सांगत नाही. सगळेच घाबरतात. पण हुशार बिरबल सांगतो, “महाराज, आपल्या पोपटाने ध्यान लावले आहे. पाय पोट वर करून शांत झोपून, पंखांची सुद्धा हालचाल न करता, तो पिंजऱ्यात पहुडला आहे. डोळ्यांच्या पापण्यादेखील हलवत नाहीये, आपण येऊन प्रत्यक्ष पहावे.”
बादशहाने जेव्हा येऊन प्रत्यक्षात पाहिले, तेव्हा तो हसून म्हणाला,
“अरे, एवढा बुद्धिमान तू ! हे ध्यान वगैरे काही नाही, तो मेलाय, हे अनुमान तुला कसं कळलं नाही ?” त्यावर बिरबल म्हणतोय. पोपट मेला हे आम्ही सर्वांनीज जाणले होते, त्याच्या मरण्याच्या कसोट्या आम्हाला आमच्या पूर्वजांनी म्हणजे आप्तलोकांनी शिकवून ठेवल्या होत्या, पण आपल्या आदेशाची अंमलबजावणी करणं हा आमचा धर्म होता.
तो मेलाय, ते आम्हाला सर्वांनाच ठाऊक होतं. पण हे सत्य सांगितले असते तर, कायद्याने आमचे मुंडके उडणार होते. म्हणून सत्य तेच सांगितले पण “प्रियं ब्रूयात् ” आपल्याला ज्या भाषेत हवे तेच सांगितले.”
व्यवहारात ही युक्तीचिकित्सा महत्त्वाची !
सत्यमेव जयते हे तर आपल्या देशाचे ब्रीदवाक्य आहे, मुण्डक उपनिषदातील हे वाक्य ही खरंतर एका मंत्राची सुरवात आहे. याचा अर्थ असा आहे, की शेवटी विजय सत्याचाच होतो.
झेकोस्लोव्हाकिया या देशाचे ब्रीदवाक्य देखील जवळपास याच अर्थी आहे.
सत्य याचेच दुसरे नाव धर्म आहे. “यतो धर्मस्ततो जयः “। गीतेतील हे वचन तर सर्वानाच माहिती आहे. अर्थात धर्म या नावाचीच अॅलर्जी ज्यांना आहे, ते सत्याच्या जवळपास कसे जातील ?
सत्याची एवढी आठवण करून द्यावी लागत आहे, इतके सत्यापासून आपण लांब गेलो आहोत.
एक असत्य जर अनेक वेळा सांगितले तर ते सत्य वाटायला लागते. हा मानसशास्त्रातील एक महत्त्वाचा सिद्धांत आहे.
अमुक रोग कधीच बरा होणार नाही, यावरील औषधे ही आता कायमस्वरूपी, म्हणजे मरेपर्यंत घ्यावीच लागणार. हे धडधडीत असत्य देखील आम्ही वारंवार ऐकल्यामुळे सत्य वाटू लागले आहे. रोगाच्या मुळापर्यंत विचारशक्ती न पोचल्यामुळे, अशी असत्य विधाने त्रिकालाबाधीत सत्य असल्याप्रमाणे, फेकली जातात. रोग होण्याची प्रमुख तीन कारणे सांगितलेली आहेत. एक शरीर, दुसरे मन आणि तिसरा आत्मा! ( for kind information हे जागतिक आरोग्य संघटनेने देखील मान्य केले आहे.) एका ठिकाणी उत्तर नाही मिळाले तर अन्य पर्यायांचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर आपण सत्यापासून लांब जात आहोत.
आज विज्ञानाचा आधार घेऊन शरीर शास्त्राची उकल करणे सोपे झाले आहे. अर्थात विज्ञान सांगते तेच अंतिम सत्य नाही, हे पण विज्ञानच सांगते. विज्ञानाचा आधार घेऊन, सत्याच्या जास्तीत जास्त जवळ जाता येते, पण अंतिम सत्य त्यापासून आणखी दूर जाते. मृगजळासारखे !
शरीराला किती पाणी हवे हे विज्ञानाने सांगितले, पण आपल्याला तहान किती लागली, हे विज्ञान नाही सांगू शकत !
वजन मोजता येईल पण, मनाची शक्ती मोजता येत नाही. तापमान मोजता येईल, पण राग मोजता येणार नाही. हे सत्य आहे. तहान, भूक, झोप, ताकद, इच्छा, भावना या गोष्टी अनुभवता येतात, पण दाखवता येत नाहीत, हे पण सत्य आहे.
प्रत्यक्षाच्या कक्षा विस्तारत गेलो तरी सत्य समजेल असं नाही, अशावेळी अनुमान आणि आप्तोपदेश यांची मदत घ्यावीच लागते, हे आयुर्वेदात सांगितलेले अंतिम सत्य आहे.

वैद्य सुविनय दामले
कुडाळ सिंधुदुर्ग
02362223423

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts