simple-living-principles-part-one-hundred-forty one | Aaplaa Vyaaspith news

Saturday, February 22, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

जगण्याची साधी सोप्पी तत्वे भाग एकशे एकेचाळीस

जगण्याची साधी सोप्पी तत्वे     भाग एकशे एकेचाळीस

निरोगी राहाण्यासाठी काय करावे ?
भाग चौतीस

      बाबा सांगतात...

हितकारक, थोडे, गोड, सत्य, आणि प्रसंगोचित संभाषण करावे.

संभाषण कसे असावे तर हितकारक असावे, थोडे कमीच बोलावे, पण सत्य बोलावे, गरज असेल तेव्हा मौन सोडावे.
प.पू.स्वामी स्वरूपानंद म्हणतात त्या प्रमाणे “मित मधु भाषण” असावे.
श्रीकृष्ण बोलतात तसे बोलावे. थोडे गोड, थोडे सत्य ! जिथे जसे आवश्यक असेल तसे. प्रसंगोचित.

कसे बोलावे, याची इतिहासातील काही उदाहरणे लक्षात ठेवण्यासारखी आहेत.
विदुराने सांगितलेली विदुरनीती,
औरंग्याच्या दरबारातील शिवरायांनी दरबाराचा मान कसा राखायचा असतो, याबाबत राजा औरंगजेबाची त्याच्याच दरबारात केलेली कानउघाडणी,
शिवरायांच्या वकीलाने अफजलकडे जाऊन केलेली यशस्वी बोलणी,
रावणाच्या दरबारात जाऊन, सीतामाईना सोडून द्यावे अश्या अर्थाचे अंगदाचे बोलणे,
मुक्ताबाईनी ज्ञानेश्वरांना सांगितलेले ताटीचे अभंग, किंवा चांगदेव पासष्टी,
रामरायांनी वनवासात जाऊ नये याकरीता भरताने केलेली विनवणी आणि त्यावर श्रीरामांनी केलेले खंडन,
युद्ध नको म्हणून सांगायला श्रीकृष्ण कौरवांकडे गेला, ती प्रसिद्ध कृष्णशिष्टाई.
आणि अर्जुनाने युद्ध करावेच यासाठी श्रीकृष्णांनी सांगितलेली गीता
ही सर्व उत्तम संवादाची उदाहरणे आहेत. मुद्दाम सांगण्याचे कारण आता ही उदाहरणे आपल्या शालेय अभ्यासक्रमातून काढून टाकली आहेत. ती मुळातून आपण अभ्यासावी आणि मुलांना शिकवावी.

संवाद शब्दांनी वाढतो. मनात काय आहे, हे सुरांवरून कळते. काय करायला हवे हे देहबोलीतून कळते. आणि याचा एकत्रित परिणाम म्हणून समाधान मिळते.

या सर्वांचा आरोग्याशी संबंध काय, असे मनात येणं साहाजिकच आहे.
पुनः एकदा सांगतो, आपल्याला फक्त शारीरिक संतुलन म्हणजे आरोग्य, या संकुचित कोशातून बाहेर यायचे आहे. त्याही पेक्षा महत्त्वाचे सामाजिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य जपण्यासाठी हे गुण अंगी असावेच लागतात.

आपल्याला काय होतंय, हे जर रूग्णाला सांगताच आले नाही तर, वैद्याला रुग्णाच्या वेदना समजणार तरी कश्या ? जर आपल्याला काय होतंय हे सांगता येत नसेल तर घरी असताना शांतपणे एका कागदावर अथवा वहीत लिहून काढावे. त्यावर तारीख, वेळ लिहावी, शक्य असेल तर त्रास होण्याअगोदर चार पाच दिवस आपण काय काय खाल्ले होते, कुठे फिरलो होतो, त्याचा त्रास झाला होता का, इ. गोष्टी पण लिहून ठेवाव्यात. जर ही सर्व माहिती आपल्याला, वैद्यांना नीट सांगता आली, तर वैद्यांना निदान करणे सोपे होते.
आपल्यालाच नंतर भविष्यात ही आरोग्यवही, (खरंतर अनारोग्यवही) उपयोगी ठरणारी असते.

रुग्णापेक्षा वैद्यांकडे ही संभाषण चातुर्य असले पाहिजे. योग्य प्रश्न विचारून रुग्णाला काय होते आहे, हे त्याच्याच तोंडून वदवून घेणं ही वैद्याची कला आहे.
(म्हणजे रुग्णाला पोपट 😝😝 बनवायचे !! )

विशेषतः पथ्य अपथ्य ठरवताना, रुग्णाचा आधीचा इतिहास समजावून घेणं, वैद्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. ज्या भाषेत वैद्य शिकलेला आहे, त्यापेक्षा रुग्णाची भाषा कोणती आहे, त्याला समजेल अशा भाषेत त्याला त्याचा रोग समजावून सांगता यायला हवा. त्याच्या बरोबर संवाद साधता यायला हवा. आजच्या भाषेत सांगायचे तर रुग्णाचे कौन्सिलिंग म्हणजे संवाद ! बरं हा संवाद साधत असताना आपली देहबोली म्हणजे हावभाव पण महत्त्वाचे असतात.

औषधांपेक्षा शब्द हे जास्ती गुणकारी असतात. कारण औषध फक्त पोटापुरते शरीरापुरते असते. शब्द हे त्यापलीकडील मनापर्यंत पोचतात. स्थूलापेक्षा सूक्ष्म हे जास्ती क्षमतेचे असते.

मनापेक्षा सूक्ष्म आत्मा. त्याच्याशी होणाऱ्या या आत्मसंवादाला शब्दांची पण गरज नसते. तिथे, शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले, ही अनुभुति असते.

वैद्य सुविनय दामले
कुडाळ सिंधुदुर्ग
02362223423

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts