simple-living-principles-part-one-hundred-fifty-five | Aaplaa Vyaaspith news

Saturday, February 22, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

जगण्याची साधी सोपी सूत्रे एकशे पंचावन्न

जगण्याची साधी सोपी सूत्रे  एकशे पंचावन्न

सांगेन गोष्टी हिताच्याच चार भाग तेरा

आपले अवयव जरी आपले असले तरी त्या अवयवांना सार्वजनिक ठिकाणी प्रकट करू नये. अशी कृती आपल्याकडून होऊ नये, जी सार्वजनिक क्षेत्रात निंद्य मानली आहे.

जसे सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मल मूत्र विसर्ग करणे, चुकीचे आहे. यासाठी सरकारने तशी बंद व्यवस्था ठिकठिकाणी निर्माण करून देणं, हा सरकारी व्यवस्थापनाचा भाग आहे. मुंबई सारख्या गजबजलेल्या ठिकाणी मल विसर्जनासाठी जीव धोक्यात घालून रेल्वे रुळावर यावे लागते, ही शरमेची बाब आहे.

शरीराच्या मूलभूत गरजा आणि जागेची उपलब्धता यापेक्षा शासनाची पराभूत मानसिकता आणि लोकप्रतिनिधींचे गांधारी धोरण, हे सार्वजनिक स्वच्छता मोहिमेतील मोठ्ठे अडथळे आहेत. केंद्रसरकारचे यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत, ही समाधानकारक बाब आहे.

परदेशात रस्त्यावरून स्वतःचे कुत्रे फिरवताना देखील त्यांनी केलेली शी शू मालकाला उचलावी लागते. पण भारतात मात्र मर्सीडीज गाडीची काच खाली करून रस्त्यावर थुंकणारे महाभाग देखील कमी नाहीत.

जे अवयव झाकले जाणे अपेक्षित आहे, ते जाणुनबुजुन दिसतील आणि अंग प्रदर्शन होईल असे कपडे सार्वजनिक ठिकाणी न घालणे, हा नियम पुरुष आणि महिला दोघांसाठी लागू आहे.

प्रत्येक देशाच्या परंपरा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. ब्राझील सारखा देश, अमेरिकेसारखा देश आणि भारतासारखा देश या देशांच्या सभ्यता आणि परंपरा वेगवेगळ्याच असणार. मुस्लिम महिला बुरखा घालणे ही सभ्यता मानतील, भले ती इतराकरीता कट्टर असेल. मुसलमान तरूण मिशी भादरून टाकतील तीच मिशी भारतात प्रतिष्ठेची गोष्ट ठरते. उत्तर भारतात डोक्यावरून पदर घेणं ही सभ्यता आहे, तर दक्षिण भारतात कमरेखाली महावस्त्र आणि खांद्यावर उपवस्त्र घेणं प्रतिष्ठेची बाब समजली जाते.
भारतातील काही भागात घागरा आणि चोळी हा मुख्य पोशाख आहे तर दक्षिणेकडील काही भागात चोळी वापरलीच जात नाही.

सांगायचे काय तर या संस्कृती सभ्यता ज्या त्या प्रदेशाच्या सांस्कृतिक अस्मितेच्या गोष्टी आहेत. त्या तशाच पाळल्या जाव्यात. जागतिकीकरणाच्या किंवा ग्लोबलायझेशनच्या गोंडस नावाखाली, मोर नाचतो म्हणून लांडोरीने नाचावे का ? हा प्रश्न आहे.

हात, पाय, ओठ, पोट, कंबर, डोळे, छाती अथवा जननेंद्रिये यांचे प्रदर्शन होऊ नये. याकरीता पालकांनी जागरूक राहून आपल्या कुटुंबाच्या हितासाठी काही कठोर निर्णय वेळोवेळी घेणे आवश्यक आहे.

कायदे आणि नियम करून किंवा सेन्साॅर बोर्डची स्थापना करून हे प्रश्न सुटतील, असे वाटत नाही. त्यासाठी आपल्या कुल परंपरा, प्रदेश विचार आणि नीतीच्या मर्यादेचे लहानपणापासूनच प्रशिक्षण गरजेचे आहे.

वैद्य सुविनय दामले
कुडाळ सिंधुदुर्ग
02362223423

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts