simple-living-principles-part-eighty-nine | Aaplaa Vyaaspith news

Sunday, November 17, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

जगण्याची साधी सोप्पी तत्वे भाग एकोणनव्वद

जगण्याची साधी सोप्पी तत्वे      भाग एकोणनव्वद

जे जे देवासाठी ते ते देहासाठी

       भाग 46
   विडा घ्या हो नारायणा 

       भाग आठ

बडिशेप, लवंग आणि वेलची म्हणजे वात पित्त आणि कफ असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. जसं वाताच्या शमनासाठी तेल, पित्तशांतीसाठी तूप आणि कफ कमी होण्यासाठी मध, अनुपान म्हणून किंवा थेट स्वरूपात वापरले जाते. तसेच पानामधले हे तीन घटक तीन दोषांना शांत करण्यासाठी वापरले जातात.
बडिशेप लवंग आणि वेलची वापरताना ती कधी भाजून वापरू नयेत. मसाल्याच्या पदार्थामधे जे विशिष्ट तेल असते, ते उडनशील प्रकारचे असते. भाजल्यावर ते तेल उडून जाते म्हणून त्याचा वास बाहेर येतो. जे तेल औषधी आहे जळून गेल्यावर शिल्लक काय राहणार ?
आयुर्वेदात बहुसंख्य औषधामध्ये हे असे मसाल्याचे पदार्थ “प्रक्षेप” म्हणून वापरले जातात. विशेषतः अवलेह स्वरूपात जी औषधे आहेत, ( म्हणजे बोटांनी चाटून खाता येण्याजोगी. उदा. च्यवनप्राश.) त्या अवलेहावर हे प्रक्षेप विशेष स्वरूपात घातले जातात.
प्रक्षेप म्हणजे मुख्य औषध तयार झाल्यावर वरून काही औषधांचे चूर्ण टाकणे. त्या मूळ औषधाचे गुण वाढवण्यासाठी आणि काही औषधांना आपले स्वतंत्र गुण दाखवण्यासाठी जी औषधे वापरली जातात, त्यांना प्रक्षेप द्रव्य असे म्हणतात. आणि बहुतेक वेळा ही प्रक्षेप द्रव्ये हे मसाल्याचेच पदार्थ असतात.
याचाच अर्थ असा होतो की मूळ औषध सिद्ध करत असताना, काही मसाल्यांवर भाजणे, शिजवणे हे अग्निचे संस्कार मुद्दाम टाळले जातात. मसाल्यातील औषधी तेलं अग्निने जळून जाऊ नये, यासाठी ही खबरदारी घेतलेली असते.

आणि औषध पूर्ण तयार झाल्यावर, गार झाल्यानंतर, बरणीत भरल्यावर, नंतर त्यावर हे प्रक्षेप घातले गेल्याने मूळ औषधांचे गुण तसेच राहून प्रक्षेपांचे स्वतंत्र गुण व्यक्त होतात.
औषध खाताना, मूळ औषध जेव्हा जीभेवर जाते तेव्हा प्रथम चव लागते ती या प्रक्षेपांची. ही औषधे जीभेवर पडताक्षणी त्यांची औषधी क्रिया सुरू होते. मागून येणारे औषध पचवण्यासाठी, ”आम्ही पुढे जाऊन थोडीफार तयारी करून ठेवतो,” अशी मदत करण्यासारखे काम, ही प्रक्षेप द्रव्ये करीत असतात.

प्रायः सर्व प्रक्षेप द्रव्ये ही उत्तम दीपन पाचन असतात. म्हणजे भूक वाढवणारी, पचनाला मदत करणारी, ह्रदयाला अत्यंत हितकर, आमाचे पाचन करणारी, स्रोतसांना म्हणजे वहन करणाऱ्या नलिकांच्या आत असलेला चिकटपणा काढणारी, आपल्या स्वतःच्या उष्ण तीक्ष्ण विषद गुणांनी नलिकांचा मार्ग मोकळा करणारी, असतात. ज्यामुळे मुख्य औषध आत आल्यावर त्याला आपले काम करायला सोपे जाते……

……. कोणी मोठे थोर लोक जेव्हा आपल्या समोरील रस्त्यावरून जायचे असतात, तेव्हा कसं, रस्त्यावरील खड्डे बुजवणे, बाजूची झाडी तोडणे, नाक्यानाक्यावर पोलीस ठेवणे, आधी एखादी भोंगा वाजवत जाणारी गाडी वगैरे जसं असत ना, तसं हे प्रक्षेपाचं काम.
पानातील ही प्रक्षेप द्रव्ये या स्वरूपातच थोडंफार काम करतात. फक्त पुढे गेलेल्या अन्नस्वरूपी महाराजांपैकी कोणी अवशेष मागे रेंगाळत राहाणारे असतील, त्यांना अन्न महाराजांच्या मुख्य पचनयात्रेमधे सामिल करून घेण्यासाठी…..

वैद्य सुविनय दामले
कुडाळ सिंधुदुर्ग
02362223423

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts