post-ayurvedic-approach-part-five | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन भाग पाच

आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन            भाग पाच

नाॅर्मल कोणाला करायचे आहे?

रिपोर्टला की रूग्णाला ?
जो तो येतो तो रिपोर्ट ची भेंडोळं बाहेर काढून अभिमानानं दाखवतो.

“बघा, एवढे रिपोर्टस केले पण कुठेच काही मिळालं नाही. आता तुम्ही शोधा.”

उगाचच आपण सीआयडी वगैरे असल्याचा भास सुरू होतो.

एखाद्या रूग्णाला विचारलं, कि तुला काय होतंय ? तर तो निःशब्द होतो. कारण खरं तर त्याला काहीच होत नसतं. कधीतरी ‘फ्री मेडीकल चेकअप कॅम्प’ मधे खाजवून खरूज काढल्यासारखं, एखाद्या रोगाचे (अ)मंगलसूत्र कायमचे गळ्यात अडकवून घेतले जाते. आयुष्यभरासाठी त्या रोगाला निमंत्रण देऊन, बोलावले जाते. आणि नंतर रोग परवडला पण औषध नको, अशी अवस्था होऊन जाते. पंधरा सोळा औषधांनी सजलेला औषधांचा डबा पिशवीतून बाहेर येतो आणि रुग्ण विचारतो,

“ही सगळी औषधे सुरू आहेत. तुमची आणखी किती असणार ?”

तेव्हा त्याची केविलवाणी अवस्था बघून हसावं की रडावं कळत नाही.
औषधं खाण्यासाठी जगायचं आणि सगळे रिपोर्टस् नाॅर्मल ठेवायचे, म्हणजे आरोग्य अशी आरोग्याची नवी व्याख्या रूढ झाली आहे.
रुग्ण वारंवार सांगतो,

माझी साखर वाढली आहे ती नाॅर्मल करायची आहे,

थायराॅईड वाढलं आहे ते कमी करायचंय,

हिमोग्लोबिन कमी झालंय ते वाढवायचंय,

कोलेस्टेरॉल वाढलंय ते कमी करायचंय.

कॅल्शियम कमी झालंय ते वाढवायचंय,

रक्तदाब कमी जास्ती होत रहातो, त्याला नाॅर्मल करायचंय………
इसी उलझन मे वो जिंदगीभर रहता है, उसे मालूमही नही है, की ये सब रिपोर्टस् नाॅर्मल आने परभी वो नाॅर्मल नही हो सकता ।
अशी कितीतरी मंडळी असतात, ज्यांचे सर्व रिपोर्टस् नाॅर्मल आहेत पण त्यांना आजार आहेत, आणि अशीही मंडळी दिसतात, की जी एकदम नाॅर्मल आहेत, पण रिपोर्टस् ‘नाॅर्मल’ नाहीत.
खरं सांगायचं तर हे मायाजाल आहे. यात एकदा अडकला की अडकला. अज्ञानात सुख असतं, अशी एक म्हण होती, जोपर्यंत माहिती नव्हतं तोपर्यंत सर्व काही सुखेनैव, ऑल इज वेल, चाललेलं असतं, आणि जेव्हा एखाद्या तपासणीच्या, मायेच्या लाटेत सापडतो, तेव्हा त्याच्या दुर्दैवाचे दशावतार सुरू होतात. आणि पुरवून पुरवून ठेवलेला पैसा, शिल्लक राहिलेला प्राॅव्हिडंट फंड हळुहळू संपायला लागतो.
आणि ज्याच्यासाठी हे सर्व चाललंय, ते आपलं आरोग्य मात्र आपल्यापासून खूप लांब जातंय. हे त्याला जेव्हा कळतं तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो, कारण वर्षानुवर्ष नको ती औषधे घेत राहिल्याने त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. कोलेस्टेरॉलची गोळी डायबेटीस करते, डायबेटीस नाॅर्मल करण्याचा प्रयत्न केला की, क्रियाटीनीन मार खाते, ते नाॅर्मल करेपर्यंत रक्तदाब कमी जास्ती होत रहातो, रक्तदाबावरील गोळ्या खाऊन खाऊन आणि नको ते पथ्य पाळून, यकृत, किडनी, सांधे स्नायु कमजोर होत जातात. आणि कर्मभोग सुरू होतात.
डाॅक्टरांच्या बाजूने विचार केला तर, ग्राहक या व्याख्येमधे रूग्णाला बसवल्यानंतर, स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी, डाॅक्टरनी सर्व तपासण्या करून, कायद्याने जे रिपोर्टस् लिखित स्वरूपात हातात येतील तेच ग्राह्य आणि योग्य गृहीत धरून पुढील सल्ले देणे सुरू केले. यात डाॅक्टर मंडळीची पण चुक म्हणता येत नाही.
सुक्याबरोबर ओलंही जळतं, त्याप्रमाणे खरोखरच ज्याला रिपोर्टस करायची काहीही गरज नसते, त्याला सुद्धा पॅथोलॅबच्या खेपा घालणे भाग पडू लागले.
एखादी चुकीची गोष्ट अनेक वेळा करीत राहीलो तर ती चुकीची आहे, हे नंतर लक्षातच येईनासे होते, आणि मग माझे आरोग्य चांगले आहे की नाही, हे समजण्यासाठी मात्र, यंत्रावर अवलंबून रहाणे सुरू झाले.
आणि माझ्यातला जो मी, त्याला मात्र पूर्णपणे विसरले गेले……..

वैद्य सुविनय दामले
कुडाळ सिंधुदुर्ग
02362223423

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts