main-food-source-part-23 | Aaplaa Vyaaspith news

Sunday, August 18, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

प्रमुख आहारसूत्र भाग 23

प्रमुख आहारसूत्र भाग 23

पाणी जिथे जास्ती काळ साठून राहते, तो प्रदेश म्हणजे आनूप. या प्रदेशात निर्माण होणारे सर्व अन्नधान्य, पालेभाज्या, फळे ही कफाच्या आधिक्यातील असतात. म्हणून यांचा अतिवापर नको, असे शास्त्रकार सांगतात. या अन्नधान्यादि पासून शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते आणि अग्निमांद्य होते, तसे होऊ नये. स्पष्ट उदाहरण द्यायचे झाल्यास कोकणातील लोकांनी सफरचंद खाणे. बर्फाळ प्रदेशातील हे फळ समुद्राजवळ रहाणाऱ्या लोकांनी खाल्ले तर पचन बिघडते. आणि क्लेद वाढतो.

आधीच जमिनीमध्ये, वातावरणात पाण्याचे प्रमाण जास्त अशा प्रदेशातील एखादे फळ आणि तेही रसरशीत असेल तर प्रमेहाला आणखीन पूरक. जसे ऊस. ऊसाचा रस,त्यापासूनची काकवी, गुळ, साखर आणि हे पदार्थ ज्यामधे आहेत, अशा सर्व मिठाया जर खाऊन पचवता आल्या नाहीत तर प्रमेह ठरलेला.

रसदार फळे नकोतच, त्याचा ज्युस काढून पिणे हे आणखीनच खतरनाक. याविषयी सविस्तर आपण वाचले आहेच.

आयुर्वेदातील आणखीन एक संकल्पना म्हणजे नवे धान्य आणि जुने धान्य. आजच्या विज्ञानाला कदाचित हे रूचणार नाही, पटणार नाही, पण जेवढे धान्य नवीन तेवढे ते पचायला जड. जेवढे जुने तेवढे पचायला हलके. धान्य सूर्याच्या किरणांनी संरक्षित करून ठेवायची पद्धत भारतीयच ! किमान एक वर्ष जुने तांदुळ वापरले तर भात मोकळा होतो, हे व्यवहारात आपण बघतोच. मोकळा होणे म्हणजे त्यातील चिकटपणा कमी होणे. दही जसे प्रमेहामधे नको, तसेच दह्याप्रमाणे आंबलेले अन्य पदार्थ देखील क्लेद निर्माण करतात. जसे, आंबोळी, इडली, दहिवडा, मेदूवडा, ढोकळा. या पदार्थांमधे केवळ साखर नाही म्हणजे मधुमेहात चालतील असे नाही. तर आयुर्वेदीय पद्धतीने विचार केला तर चिकटणारे, चिकट असणारे आणि चिकटपणा वाढवणारे जे जे पदार्थ आहेत, ते ते सर्व क्लेद वाढवणारे, प्रमेहाचे कारण जाणावे.

म्हणजे आंबवलेले सर्व पदार्थ बंदच करायचे का ? कधीच खायचे नाही का ?
नाही. एवढं टोकाला जाऊन अर्थ काढण्याची आवश्यकता नाही.

आपल्याला चिकटपणा कमी करायचा आहे. पीठ जरी आंबवलेले असले तरी त्या पीठापासून तयार झालेल्या इडली, दहीवडा, ऑम्लेट, या फुगलेल्या पदार्थापेक्षा, डोसा प्रकार जो खमंग खरपूस भाजलेला असतो, त्यामुळे त्यातील जलीय अंश बऱ्यापैकी कमी करून घेतलेला असतो, त्यातील पोकळपणा तुलनेने कमी असतो, तव्याच्या म्हणजे अग्निच्या जास्ती जवळ असतो, म्हणजेच डोसा, पेपरडोसा, मसाला डोसा, हे पदार्थ इतर आंबवलेल्या पदार्थांच्या तुलनेत, पचायला हलके असतील. जेव्हा आंबवलेलेच पदार्थ खाण्याशिवाय अन्य कोणतेही पर्याय उपलब्ध नसतील तेव्हा हे डोसा आयटम आपल्याला नक्कीच मदत करतील!!!!

चिकटपणा युक्तीने कमी करावा, जेवढा चिकटपणा कमी तेवढे पदार्थ पचायला हलके, चिकटपणा म्हणजे क्लेद. ही सर्व साखळी लक्षात ठेवली तर आपणच ठरवू शकतो, क्लेद कशाने कमी करता येतो ते !
यासाठी शास्त्रकार अनेक प्रकाराने समजावून सांगताहेत, इथे पाणी आहे, इथे चिकटपणा आहे, इथे ओलावा आहे, इथे हवेत आर्द्रता जास्ती आहे, इथे गती कमी आहे, इथे इथे प्रमेहाचा धोका आहे.

तेवढी दृष्टी तयार झाली की, झाले. प्रमेह गेलाच म्हणून समजा !

वैद्य सुविनय दामले
कुडाळ सिंधुदुर्ग
02362223423

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!