main-food-source-part-21 | Aaplaa Vyaaspith news

Sunday, August 18, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

प्रमुख आहारसूत्र भाग २१

प्रमुख आहारसूत्र भाग २१

जेवणानंतर लगेच झोपल्याने कफ वाढतो. कफ वाढतो, म्हणजे खोकल्यातून बाहेर येतो तो कफ नव्हे हो! हे एव्हाना आपल्या लक्षात आलं असेलच !
हा कफ म्हणजे विकृतरीत्या वाढलेला कफ दोष. जो प्रमेहाचे मुख्य कारण आहे. मधुमेह हा ज्याचा एक उपप्रकार आहे, त्याला प्रमेह म्हणतात.

ग्रीष्म ऋतु सोडला तर दुपारची झोप वर्ज्य सांगितली आहे. ग्रीष्मात बाहेर उष्णता खूप असते. अग्नि वाढलेला असतो. त्यामुळे दुपारच्या झोपेने वाढणारा कफ कमी व्हायला मदत होते. पण ही झोप आडवे राहून घ्यायची नाही. तर बसल्या बसल्या डुलकी या स्वरूपाची असावी. आणि लवंडताना डाव्या कुशीवर असावे. यालाच वामकुक्षी असे म्हणतात.

वाम म्हणजे डावी बाजू. डाव्या बाजुला लवंडून झोपल्याने डावी नाडी, चंद्र नाडी बंद होते. आणि उजवी सूर्यनाडी सुरू होते. सूर्य म्हणजे अग्नि. उजवी नाडी म्हणजे योग शास्त्रानुसार पचन प्रक्रिया वाढवणारी, सुधारणारी नाडी. वामकुक्षीचा हा फायदा होतो.

पोटात या डाव्या बाजूलाच आमाशय असते. त्याच्याखाली ग्रहणी नावाचा अवयव असतो.या ग्रहणी अवयवामधेच पचनाचे म्हणजे अग्निचे काम सुरू असते. आपण आपल्याला जसे हवे तसे खात असतो, ग्रहणी या खाल्लेल्या अन्नाला, त्याला हवे तसे रूपांतरीत करीत असते.

आणि आमाशयाच्या वरच्या बाजुला ह्रदय असते. म्हणजे ही रचना जणुकाही खाली चुल, वर पातेले अशी असते. अग्नि व्यवस्थित असेल तर रूपांतरण नीट होत असते. चुल नीट पेटली असेल तरच अग्नि चांगला प्रज्वलीत असतो.

जेवल्यानंतर लगेचच झोपल्याने ही चुल थंड होते आणि पचन मंदावते. म्हणून जेवणानंतर झोपू नये.

मग आमच्या दुपारच्या झोपेचं काय ?
त्याला एक पळवाट सांगतो. जेवणानंतर झोपू नये हा नियम झाला. पण ज्यांना झोप अनावरच होत नाही किंवा रात्रौचे जागरण करावेच लागते, अशा महाशयांनी जेवणापूर्वी झोप घ्यायला काही हरकत नाही. झोपून उठावे आणि जेवून परत कामाला लागावे.

पण
हे केवळ नियमाला अपवाद म्हणून.
अपवाद हा नियम होऊ नये !

वैद्य सुविनय दामले
कुडाळ सिंधुदुर्ग
02362223423

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!