main-food-source-part-20 | Aaplaa Vyaaspith news

Sunday, August 18, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

प्रमुख आहारसूत्र भाग २०

प्रमुख आहारसूत्र भाग २०

प्रमेहामधे नुसता जिभेवर संयम ठेवून चालत नाही. झोपेवर पण संयम ठेवावा लागतो. आपल्या मूळ श्लोकातील आस्यासुख शब्दानंतरचा दुसरा शब्द स्वप्नसुख.
स्वप्न या शब्दाचा अर्थ निद्रा, झोप. नेहेमीची शांत झोप लागणे वेगळे आणि लोळतलोळत पडणे वेगळे!
नेहेमीची शांत झोप आवश्यकच आहे. आरोग्याच्या प्रमुख घटकामधे ती आहार आणि ब्रह्मचर्याबरोबर स्विकृत झालेली आहे.
झोप अशी हवी की, तिला अन्य गोळी, अभ्यास, अंथरूण पांघरूण, उशी, अंगाई, कोणाचीही गरज नसावी. पडल्या पडल्या ती आली पाहिजे. दिवसभर एवढे श्रम व्हावेत, की कधी एकदा आडवे टेकतोय असे व्हावे, आणि पाठ टेकताक्षणी ती प्रसन्न व्हावी. जसं झोपून उठून मलविसर्जनाला गेल्यावर पाच मिनीटात परत बाहेर यावेसे वाटले पाहिजे. आणि झोप पूर्ण झाल्यावर आणखी थोडावेळ झोपूया, असे न वाटणे म्हणजे झोप पूर्ण होणे. मुख्य म्हणजे या झोपेचे समाधान मिळाले पाहिजे.
झोपेचा आणखी हव्यास वाटू लागणे म्हणजे प्रमेहाकडे वाटचाल सुरू होणे.

अर्थात हे लहान मस्तीखोर मुले जी दिवसभर फक्त धावपळच करतात आणि झोपतात, त्यांच्यासाठी नाही सांगितलेले !
ज्यांची झोप पूर्ण झालेली आहे आणि ज्यांना नुसते अंथरुणात लोळत पडायला आवडते, त्यांना थोडे लवकर अंथरूणातून उठून बाहेर पडायला हवे. ही जास्तीची झोप शरीरातील कफ दोष वाढवते.
दोषांची प्राकृत कर्मे ही शरीरात होतच असतात पण या प्राकृत कामापेक्षा, गरज नसताना, आणखी जास्त कार्य घडून येणे म्हणजे प्रकोप होणे आणि गरजेपेक्षा काम कमी होणे हा दोषांचा क्षय मानावा. अतिरिक्त झोपेमुळे सुस्ती, येते. शरीर आळसावते. पचन मंदावते. अग्नि कमी होतो.
आपण कसं रात्री झोपताना खोलीतील मोठा बल्ब कमी करून झिरोचा बल्ब सुरू ठेवतो, तसेच झोपल्यावर शरीरातील अग्निदेखील कमी केला जातो. म्हणूनतर झोपेपूर्वी पचन पूर्ण होऊन मगच झोपणे अपेक्षित आहे. म्हणून कामा निमित्त (वा असेच वाॅटसपसाठी) जागरण करणाऱ्या मंडळींना पचनाच्या विकृतींना सामोरे जावे लागते. पचनाचा आणि झोपेचा, झोपेचा आणि अग्नीचा खूप जवळचा संबंध आहे.

अग्नि कमी झाला की स्थित्यंतर, बदल होणे कमी होते. स्थिरता येते. मेद वाढतो. जाडी वाढते. म्हणजेच प्रमेहाकडे वाटचाल सुरू होते.
हे निरीक्षण फक्त आयुर्वेदात वर्णन केले आहे. ऋषींची ही दृष्टी आपल्याला आत्मसात होणे अपेक्षित आहे.
मी या स्वप्नसुखमचा आणखी एक शब्दशः अर्थ लावतो, तो म्हणजे झोपेत स्वप्नातदेखील सुख बघणे. झोपेतदेखील सुखाचाच विचार करणारी स्वप्ने बघणे म्हणजे स्वप्नसुख.
काही जणांना वाईट स्वप्न पडतात ते किंचाळत ओरडत उठतात, दुसऱ्यांची झोपमोड करतात. काही जणांना ही स्वप्ने आठवतात, तर काहींना अजिबात आठवत नाहीत. ही वाताची स्वप्ने.
काहींना आपल्याला स्वप्न पडले होते एवढे आठवते, भानावर येतात आणि खुदकन हसतात आणि लगेचच परत झोपतात.ही स्वप्ने त्यांच्या लक्षात राहातात, ही पित्ताची स्वप्नप्रकृती.
तर काहीजण या स्वप्ननगरीतून बाहेरच पडत नाहीत. जागे झाले तरी याच स्वप्नधुंदीत राहातात. झोपेतच हसतात, बोलतात, चालतात सुद्धा. पण भान नसते की आपण अजून झोपेतच स्वप्न बघत आहोत. पूर्ण भानावर येतात, तेव्हा जाग येऊन पुनः झोपतात. ही कफाच्या स्वप्नाची दुनिया असते.
आणखीन एक झोप ही फक्त रात्रीच घ्यायची असते. दिवसाचे झोपणे हे शंभर टक्के वर्ज्य.

वामकुक्षी वेगळी. आणि भरपेट जेवून, पंखा किंवा एसी लावून अंथरूण घालून, डोक्यावरून पांघरूण घेऊन, ‘चला आता मस्त झोपतो’, असे म्हणत जे झोपणार, त्यांचा सोबतीला प्रमेह नक्की येणार.

वैद्य सुविनय दामले
कुडाळ सिंधुदुर्ग
02362223423

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!