arogydut/simple-living-principles-part-Twenty | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

जगण्याची साधी सोप्पी तत्वे भाग वीस

जगण्याची साधी सोप्पी तत्वे भाग वीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार
जगण्यासाठी औषधं काम करत नाही.
भाग अकरा
आयुर्वेदीय औषधांना लवकर गुण का येत नाही ?
इंग्लिश औषधांप्रमाणे आयुर्वेदीय औषधांना झटपट गुण दिसत नाही, हा एक मोठ्ठा गैरसमज आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या वेधन, अग्निकर्म, यासारख्या काही चिकित्सा इतक्या जलद काम करतात, की अॅलोपॅथीमधील, कोणतेही वेदनाशामक वा भूल देणारे द्रव्य देखील एवढ्या जलद काम करत नसावे. आश्चर्य वाटण्याएवढ्या चमत्कारिक चिकित्सा ग्रंथात वर्णन केल्या आहेत. याचा प्रत्यक्ष अनुभव जवळच्या वैद्याकडून घेणे महत्त्वाचे आहे.
आयुर्वेद म्हणजे एक जीवनप्रणाली असल्याने, त्यात औषधांपेक्षा, आहार विहार जास्ती महत्त्वाचा ! तहान लागल्यावर विहीर खणण्यापेक्षा आधीच पाणी शोधून ठेवावे, तसे रोग झाल्यानंतर उपाय शोधत बसण्यापेक्षा, रोग होऊ नये यासाठी काळजी घ्यावी, असे सांगणारे हे शास्त्र !
आयुर्वेद ही कोणतीही ‘पॅथी’ नाही. हे पुनः एकदा लक्षात घ्यावे. त्यामुळे ‘औषधे’ हा चिकित्सेतील गौण भाग आहे. औषधे ही पूरक म्हणून वापरली जातात. ( तशी वापरली जावीत. )
जसजसा काळ बदलत गेला तसे आयुर्वेदातील औषधांमधे भर पडत गेली. सुरवातीला केवळ वनौषधींनी समृद्ध असलेली ही संपदा रसौषधींनी आणखीनच बहरत गेली. शरीरातील दोष ( पंचकर्माचा वापर करून ) काढून टाकून नंतर औषधांचा वापर केला गेला तर औषधे कमी पुरतात, हे अभ्यासले गेले. किंवा औषधे पुनः लागतच नाहीत, हे पण लक्षात आले. आणि रोग पुनः उद्भवू नयेत, यासाठी आहारविहारातील पथ्यापथ्य सांगितले गेले. व्यवस्थित पथ्यापथ्य पाळले तर औषधांची गरज कमी होते.
औषधे मग ती कोणत्याही पॅथीची असोत, ती विकतच घ्यावी लागतात, दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागते. पण पथ्यापथ्याचे तसे नसते. माझा माझ्या मनावर विशेषतः जीभेवर संयम आणता आला की, बाहेरील अन्य घटकांवर अवलंबून रहावे लागत नाही. बाहेरील सर्व परिस्थितीवर मनःस्थितीने नियंत्रण आणता येते.
काही वेळा औषधांची मात्र कमी पडते, काही वेळा अनुपान चुकते. अनुपान म्हणजे औषध ज्याच्या बरोबर घ्यायचे ते द्रव्य. अनुपानासोबत जर औषध घेतले की औषधांची क्षमता वाढते. आजच्या भाषेत सांगायचे तर कॅटेलिस्ट. जसे, कफाच्या आजारात मधासोबत, पित्ताच्या आजारात तुपाबरोबर, आणि वाताच्या आजारात तेल हे पूरक औषध म्हणून वापरले तर रोगाची लक्षणे झपाट्याने कमी होताना दिसतात. काही वेळा तर औषधांची गरजच उरत नाही, अनुपान हेच औषध ठरते. पित्तामुळे डोके दुखते, या आजारात केवळ सकाळी रिकाम्या पोटी तूप खाऊन वर दोन घोट गरम पाणी पिणे, हा घरगुती उपाय देखील चमत्कार घडवतो. (तूप म्हणजे गाईचे. आणि गाय म्हणजे भारतीय, हे पण विसरायचे नाय्ये हं. ) प्रकृतीनुसार किती काळपर्यंत हे घृतपान सुरू ठेवावे लागेल, याचा सल्ला अर्थातच वैद्य चांगला देऊ शकेल. { वैद्य म्हणजे सरकारी नोंदणीकृत आयुर्वेद पदवीधारक, ज्याचा अनुभव आणि ग्रंथाचा अभ्यास देखील उत्तम आहे, असा आप्त (आप्त म्हणजे ओळख असलेला, घरचा. पैशासाठी औषधांचा व्यापार न करणारा ) ही व्यक्ती देखील योग्य सल्ला देऊ शकतो. आज हे मुद्दाम सांगावेसे वाटते कारण वाॅटसपच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे असे आरोग्याचे संदेश देणाऱ्या स्वयंघोषित वैद्यांचे पेव खूप आलेले आहे. त्यात विश्वास कसा आणि कोणावर ठेवायचा, असा प्रश्न निर्माण होतो. मग तो नागरमुन्नळीचा असो वा मुरगुडचा, कोल्हापूर सारख्या शहरातला असो वा अन्य कोणत्याही खेड्यातला. }
आपली प्रकृती काय आहे, कोणते औषध, कोणते अनुपान, किती दिवसांसाठी, कधी घ्यायचे आहे, त्याचे पथ्यापथ्य काय आहे, हे हे जाणकार वैद्यच चांगलं सांगू शकेल ना !
नाहीतर घेतलेल्या औषधाचे साईड इफेक्ट कमी करण्यासाठी पुनः दुसरा वैद्य असे व्हायला नको !

वैद्य सुविनय दामले
कुडाळ सिंधुदुर्ग
02362223423

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts