arogydut-dietary-changes-part-50 | Aaplaa Vyaaspith news

Friday, December 13, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

आहारातील बदल भाग ५०

आहारातील बदल भाग ५०

चवदार आहार -भाग 11


आपल्याकडे तिखट म्हणजे फक्त मिरचीच असा समज आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत, जे तिखट आहेत जसे सुंठ, मिरी, पिंप्पळी, आले, इ.इ.

सर्व तिखट पदार्थ हे तेज म्हणजे अग्निमहाभूत प्रधान द्रव्य असतात.
आपल्याकडे म्हणजे भारतात दोन प्रकारचे मसाले आढळतात.

गोडा मसाला आणि यातच मिरचीपूड घातली की बनतो, तिखट मसाला. प्रदेशानुसार यांची नावे कदाचित बदलतील.
भारतीय आहारात पंधरावीस प्रकारचे मुख्य पदार्थ मसाला बनवण्यासाठी वापरले जातात. मुख्यत्वेकरून मिरी, दालचिनी, लवंग, बडिशेप, खसखस, तमालपत्र, जायफळ, जायपत्री, धने, मोहोरी, हिंग, हळद, यासारखे सुके पदार्थ वापरले की सुका मसाला आणि कांदा, लसूण, नारळ, शेंगदाणे वापरून केलेला ओला मसाला होतो.
मसाल्यातील एक दोन पदार्थ कमी जास्त केले की, मसाल्याचा स्वाद बदलत जातो. जिरे जास्ती वापरले की तो पावभाजीचा मसाला होतो, धनेपावडर जास्त वापरली की सांभार मसाला होतो. त्यामुळे प्रत्येक तिखट पदार्थ कमी जास्त प्रमाणात आपले परिणाम दाखवतात.
गंमत अशी आहे, हे मसाल्याचे पदार्थ तर सर्वच गृहिणी वापरतात, पण हे सर्व मसाल्याचे पदार्थ, आयुर्वेदीय औषधी आहेत, त्यांचे वेगवेगळे गुणधर्म आहेत, त्यांचा युक्तीने वापर केला तर आपला आहार हेच परिपूर्ण औषध होऊ शकतो, हे ज्या गृहिणींना समजले, त्या सुगृहिणी !
या प्रत्येक मसाल्यामधे एकतरी उडनशील तेल असते, जे त्या पदार्थाला विशिष्ट सुगंध, आणि विशिष्ट चव देते. हे तेल औषधी असते, औषध म्हणून पोटात जाणे अपेक्षित आहे.
पण जीभेच्या चोचल्याच्या मागे लागून आपण खमंगपणा वाढण्यासाठी मसाले भाजून वापरायला सुरवात केली आणि मूळ औषधापासून, आहार लांब होत गेला.
काही औषधी बनवताना भाजावी लागतात, शिजवावी लागतात, तळावी लागतात, त्यातील काही पदार्थांचे गुण वाढवायचे असतात तर काहींमधले दोष काढावयाचे असतात, जसे हिंग हा तुपात भाजून वापरावा, मोहोरी तेलात तडतडल्यावर शुद्ध होते. म्हणजे त्यातील उष्णतीक्ष्ण गुण थोडे कमी होतात.
त्यामुळे हा अग्निसंस्कार करणे आवश्यक असते. पण काही ठिकाणी मात्र हे मसाले औषध पूर्ण तयार झाल्यावर कच्च्या स्वरूपात वरून घालायला सांगितले आहे. याला आयुर्वेदीय औषधांच्या परिभाषेतमध्ये प्रक्षेप म्हणतात.
मसाल्याचे पदार्थ भाजले की त्यातील उडनशील तेल उडून जाते, जे पोटात जाणे अपेक्षित असते, त्यामुळे मसाला न भाजता आहारात वापरला तर आपले जेवणच औषधी होईल. म्हणजेच युक्ती वापरली तर आहार हेच औषध बनते.
”आम्हाला वगळा गतप्रभ जणु होतील तारांगणे” च्या धर्तीवर हे मसाल्याचे पदार्थ वापरायचे नाहीत, असे ठरवले तर जेवणातील औषधी भाग जवळपास संपूनच जाईल.
तिखट खाऊच नका, असे म्हणण्यापेक्षा युक्तीने तिखट खा, असे म्हणणे जास्त गोड वाटते ना !

@ वैद्य सुविनय दामले
कुडाळ सिंधुदुर्ग
02362223423

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts